मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याकडून सातत्याने एनसीबीचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) हे मुस्लिम असल्याचा दावा केला जात आहे. खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे त्यांनी नोकरी मिळवल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. तर वानखेडे यांना राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष अरूण हलदर (Arun Haldar) यांनी क्लिनचिट दिली आहे.
हलदर यांचाही एक फर्जीवाडा बाहेर काढणार असल्याचा दावा मलिक यांनी केला आहे. मलिक यांनी ज्येष्ठ पत्रकार बरखा दत्त यांना दिलेल्या मुलाखतीत धक्कादायक दावा केला आहे. मुलाखतीत वानखेडे यांना हलदरांनी क्लिनचिट दिल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना मलिक यांनी हलदर हे भारतीय नागरिक नसल्याचा दावा केला आहे. त्याबाबत माहिती गोळा केली जात असून लवकरत ती पुढे आणली जाईल, असंही मलिक म्हणाले आहेत.
मलिक यांनी यापूर्वीच हलदर यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. समीर वानखेडे यांनी जातीचे प्रमाणपत्र राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने दिलेले नाही. वानखेडे यांचे जात प्रमाणपत्र मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील आहे. त्यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे ते मिळवले आहे. या विरोधात काही वकिलांना पोलीस ठाण्यात तक्रारीही दाखल केल्या आहेत. प्रमाणपत्राची वैधता ठरवण्यासाठी महाराष्ट्र सरकारची विभागवार समिती आहे, असे मलिक म्हणाले होते.
शासकीय नोकरीतील 2019 पूर्वीच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना जात पडताळणी बंधनकारक आहे. आता केंद्र सरकारमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची जात पडताळणी करणे आवश्यक आहे. सामाजिक न्याय विभाग आणि जात पडताळणी समितीकडे या संदर्भात तक्रारी दाखल होती. आयोगाचे उपाध्यक्ष हलदर हे भाजप नेते आहेत. त्यांनी पदाची प्रतिष्ठा राखावी. त्यांनी प्रमाणपत्राची पडताळणी करण्याचा अधिकार नाही, असाही टोला मलिक यांनी लगावला होता.
समीर वानखेडे यांच्या पहिल्या विवाहाचे प्रमाणपत्र म्हणजेच निकाहनामा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सार्वजनिक केला होता. तसेच लग्नावेळी ते मुस्लिम होते, असा दावाही त्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर समीर वानखेडे यांनी आज राष्ट्रीय अनुसूचित आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांची भेट घेतली. त्यांनी हलदर यांच्याकडे एक अर्जही केला आहे. यानंतर हलदर यांनी वानखेडे यांना लगेचच क्लिनचिट दिली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.