मुंबई : क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला (Aryan Khan) एनसीबीने (NCB) ताब्यात घेतल्यानंतर त्या रात्री साक्षीदार किरण गोसावी व अभिनेता शाहरूख खानची मॅनेजर पूजा ददलानी (Pooja Dadlani) यांच्यात तडजोड झाल्याचा गौप्यस्फोट दुसरा साक्षीदार प्रभाकर साईल याने केला आहे. गोसावीने हा आरोप फेटाळून लावला होता. पण या प्रकरणच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकाच्या हाती महत्वाचे पुरावे हाती लागले आहेत.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोसावी व ददलानी यांची भेट लोअर परेल येथे झाली होती. यावेळी गोसावीसोबत साईल व सॅम डिसूजा ही व्यक्तीही होती. या भेटीवेळचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. यामध्ये ददलानी हिच्या मर्सिडीज कारचे फुटेजही आहे. त्यामुळे या भेटीबाबतची सत्यता समोर येणार आहे. याअनुषंगाने प्रभाकर साईलच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्याच्यावर मुंबईत खंडणीचा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.
दरम्यान, सॅम डिसोझाने (Sam D'Souza) बुधवारी उच्च न्यायालयात (High Court) धाव घेतली. अटकपूर्व जामिनासह अटकेपासून संरक्षण मिळावे, अशी मागणी त्याने केली आहे. आता या प्रकरणात डिसोझाने नवीन गौप्यस्फोट केला असून, अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना क्लिनचिट दिली आहे.
आर्यनच्या सुटकेसाठी सॅम डिसोझाने मध्यस्थी केली होती. त्याने शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी आणि किरण गोसावी यांच्यात समझोता घडवून आणला होता. या प्रकरणी गोसावीने आता नवीन गौप्यस्फोट केला आहे. या प्रकरणातील पंच प्रभाकर साईलने केलेल्या आरोपांना त्याने पुष्टी दिली आहे. आर्यनला सोडण्यासाठी 50 लाख रुपये देण्यात आले होते, असा दावा त्याने केला आहे. नंतर त्याने हे पैसे ददलानीकडे तिच्या पतीच्या मार्गे परत पोचतील, याचीही काळजी घेतली होती, असेही म्हटले आहे.
डिसोझाने समीर वानखेडे यांनाही क्लिनचिट दिली आहे. किरण गोसावी आणि साईल हे फसवणूक करणारे आहेत, असा आरोप त्याने केला आहे. आर्यनला सोडण्यासाठी वानखेडेंना पैसे देण्यात आल्याचा दावा साईलने केला आहे. याचबरोबर वानखेडे यांनी कोऱ्या कागदांवर सह्या करण्यास सांगितल्याचेही साईलने म्हटले होते. किरण गोसावीने प्रभाकर साईलचा मोबाईल नंबर एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नावाने सेव्ह केला होता, असा दावा आता डिसोझाने केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.