Latur Political News : लातूरमध्ये राष्ट्रवादीच्या घड्याळाचा गजर,भाजपसाठी धोक्याची घंटा; काँग्रेसचा हातही झाला दुबळा!

Local Body Elections 2025 Results: नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीत आमचाच पक्ष नंबर वन ठरणार असा दावा राज्यातील महायुतीतील भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मराठवाड्यात केला गेला. नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांनी आपली ताकद दाखवत तिथे भाजपचे कमळ फुलवले खरे, पण तिथेही त्यांना मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तगडे आव्हान असल्याचे दिसून आले.
Bjp-Congress-Ncp
Bjp-Congress-NcpSarkarnama
Published on
Updated on

BJP-NCP Politics News : नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीत आमचाच पक्ष नंबर वन ठरणार असा दावा राज्यातील महायुतीतील भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मराठवाड्यात केला गेला. नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांनी आपली ताकद दाखवत तिथे भाजपचे कमळ फुलवले खरे, पण तिथेही त्यांना मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) तगडे आव्हान असल्याचे दिसून आले. तिच परिस्थिती लातूर जिल्ह्यातही दिसली. भाजपने पाच नगरपालिकेवर सत्ता मिळवत झेंडा फडकवला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यात सर्वाधिक नगरसेवक निवडून आले आहेत. राष्ट्रवादीच्या घड्याळाचा हा गजर भाजपसाठी धोक्याची घंटा मानला जात आहे.

आगामी महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या दृष्टीने आजच्या निकालाचे आकडे बरेच सूचक आहेत. कधी काळी लातूरवर काँग्रेसच्या पंजाची मजबूत पकड होती, ती आता नुसतीच ढिली झाली नाही तर सुटू लागली आहे. जिल्ह्यात या पक्षाला फक्त अठरा जागांवर समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वावर आत्मचिंतनाची वेळ आली आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.

जिल्ह्यातील चार नगरपालिका, एक नगरपंचायतीच्या निवडणुकीत चार ठिकाणी नगराध्यक्षपदाची माळ भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या गळ्यात पडली आहे. जिल्ह्यात 128 पैकी 53 जागा जिंकत राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यात सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. काँग्रेसला औसा, अहमदपूरमध्ये खातेही उघडता आले नाही. जिल्ह्यात फक्त 18 जागा जिंकल्याने या पक्षावर नामुष्कीची वेळ आली आहे.

निलंगा, उदगीर, अहमदपूर नगरपालिका, रेणापूर नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकला. औसा नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा वर्चस्व कायम राखले आहे. जिल्ह्यातील 128 जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस 53, भाजप 47, काँग्रेस 18 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष चार, शिवसेना एक, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष दोन, एमआयएम दोन व एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे.

Bjp-Congress-Ncp
Sangli Election Result : जयंत पाटलांकडून भाजपचा धुव्वा, पण आरआर आबांच्या लेकाला धक्का; पडळकर, कदमांनी दाखविली ताकद

निलंग्यात भाजपच, पण काँग्रेसचे नगरसेवकही वाढले

निलंगा नगरपालिकेवर भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांचाच दबदबा राहिला आहे. येथे काँग्रेसचे माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी निलंग्यात जाऊन चुचकारण्याचा प्रयत्न केला. पण निलंगेकर भाजपच्याच पाठीशी राहिले आहेत. नगराध्यक्षपदासह 23 पैकी 15 जागा जिंकत भाजपने पुन्हा एकदा विजयाचा झेंडा फडकवला आहे. काँग्रेसला आठ जागा मिळाल्या. गेल्या निवडणुकीचे संख्या बळ पाहता काँग्रेस सहा जागा अधिकच्या जिंकल्या, हीच पक्षासाठी जमेची बाजू आहे. इतर पक्षांना मात्र निलंगेकरांनी थारा दिला नाही.

अभिमन्यू स्वतःच्याच चक्रव्युहात अडकले

औसा येथे भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांचा विकासाचा पॅटर्न शहरवासीयांनी नाकारला. येथे विकासापेक्षा जातीची गणिते अधिक प्रभावी ठरले. त्यात निष्ठावंताना डावलल्याचा भाजपला फटका बसला. अल्पसंख्याक समाजातील सात उमेदवार देऊन केलेली खेळीही भाजपला तारू शकली नाही. उलट यामुळे जवळचेही दूर गेले. गेल्या निवडणुकीसारखेच सहाच जागांवर भाजपला समाधान मानावे लागले. या उलट माजी नगराध्यक्ष अफसर शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा दबदबा कायम ठेवला. नगराध्यक्षासह 23 पैकी 17 जागांवर त्यांनी विजय मिळवत एकहाती सत्ता आणली.

Bjp-Congress-Ncp
Jamkhed Nagar Parishad Result : राम शिंदेंनी गुलाल उधाळला,पराभवाने रोहित पवार निराश; म्हणाले, 'कसा विश्वास ठेवायचा...'

बाबासाहेब पाटलांना भाजपचे चेकमेट

अहमदपूर पालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचे वर्चस्व असते. या निवडणुकीत त्यांना अनपेक्षित धक्का बसला आहे. 'गड आला पण सिंह गेला'अशी त्यांची अवस्था झाली. 25 पैकी 16 जागा त्यांनी जिंकल्या. पण नगराध्यक्षपद मात्र भाजपकडे गेल्याने त्यांच्या या विजयावर पाणी फिरले आहे. भाजपने तीन जागाही जिंकल्या आहेत. येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला तीन, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला दोन जागा मिळाल्या आहेत.

उदगीरमध्ये महायुतीच 'बाहुबली'

उदगीर नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री, आमदार संजय बनसोडे यांनी भाजपशी युती केली होती. अगदी त्यासाठी नगराध्यक्षपदही भाजपला देवू केले होते. याचा परिणाम भाजपचे नगराध्यक्षपदासह १३ उमेदवार विजयी होण्यात झाला. तर राष्ट्रवादी काँग्रेसनेही सर्वाधिक 20 जागा जिंकल्या. 40 पैकी 33 जागा जिंकत उदगीरमध्ये महायुती बाहुबली ठरली आहे. काँग्रेसला पाच जागांवर समाधान मानावे लागले. तर दोन जागा जिंकत एमआयएमनेही खाते उघडले.

Bjp-Congress-Ncp
Shirur Election Results: शिरुरच्या नगराध्यक्षपदावर राष्ट्रवादीचा झेंडा,आमदार कटकेंची 'कॉलर' झाली टाईट; अशोक पवारांच्या पॅनेलचा धुव्वा

रेणापूरमध्ये कराडअप्पांचे वर्चस्व

रेणापूर नगरपंचायतीवर आपलेच वर्चस्व असल्याचे भाजपचे आमदार रमेश कराड यांनी दाखवून दिले आहे. कराडांनी पहिल्यापासून प्रभावी यंत्रणा राबवली. त्याचे फळ त्यांना मिळाले. नगराध्यक्षपदासह 17 पैकी दहा जागा भाजपने जिंकल्या आहेत. तुलनेत काँग्रेसचे अस्तित्व दिसून आले नाही. माजी आमदार धीरज देशमुख पहिल्यापासून फिरल्याचे दिसले नाहीत. कार्यकर्त्यांनाच एकाकी झुंज द्यावी लागली. काँग्रेसला पाच जागा मिळाल्या.

असे आहे चित्र

नगराध्यक्षपद ः भाजप 4

राष्ट्रवादी काँग्रेस - 1

नगरसेवकपदांची संख्या- 128

भाजप - 47

राष्ट्रवादी काँग्रेस- 53

काँग्रेस- 18

शिवसेना- 1

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष- 4

शिवसेना (उबाठा) - 2

एमआयएम- 2

अपक्ष- 1

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com