Sharad Pawar Vs Ashok Chavan: सूर्यकांता पाटलांचा पक्षप्रवेश; चव्हाणांना शह देण्याचा शरद पवारांचा मोठा डाव

Nanded NCP Politics News : अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसमध्ये मोठा गट नाराज आहे. लोकसभा निवडणुकीत हे दिसून आले आहे. अशा नाराजांना सूर्यकांता पाटील यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीत खेचण्याचा प्रयत्न येणाऱ्या काळात होऊ शकतो.
Sharad Pawar-Ashok Chavan - Suryakanta Patil
Sharad Pawar-Ashok Chavan - Suryakanta Patil Sarkarnama

Nanded Political News : पुतणे अजित पवार यांच्यासह पक्षातील तीसहून अधिक आमदारांनी बंड पुकारल्यानंतर काका शरद पवार यांनी मराठवाड्यात राष्ट्रवादी पक्ष नव्या ताकदीने उभा करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बीड मतदारसंघातून बजरंग सोनवणे यांचा झालेला विजय हा त्याच प्रयत्नांचा परिणाम असल्याचे बोलले जाते.

बीडमध्ये भाजपला धोबीपछाड दिल्यानंतर शरद पवारांनी आपला मोर्चा माजी मुख्यमंत्री व आता भाजपकडून राज्यसभेवर खासदार असलेल्या अशोक चव्हाण यांच्या नांदेड जिल्ह्याकडे वळवला आहे.

दहा वर्षांपूर्वी शरद पवारांनी (Sharad Pawar) माझा केसाने गळा कापला असा आरोप करत भाजपमध्ये दाखल झालेल्या सूर्यकांता पाटील यांची मंगळवारी (ता.25) राष्ट्रवादीत पुन्हा घरवापसी झाली. झालेल्या चुका पोटात घेऊन शरद पवारांनी पुन्हा आपल्याला पक्षात संधी दिल्याबद्दल सुर्यकांता पाटील यांनी त्यांचे आभार मानले. नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात अगदी दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्या काळापासून सूर्यकांता पाटील आणि काँग्रेस म्हणजेच चव्हाण कुटुंबाशी कधीच पटले नाही.

जिल्ह्यातील काँग्रेसची सूत्र अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या हाती गेल्यानंतर आणि ते राज्याचे दोनवेळा मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी सूर्यकांता पाटील यांची कधी दखलच घेतली नाही. समुद्रात राहून मगरीशी वैर नको, याप्रमाणे पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यांचा पक्षात योग्य सन्मान राखत शरद पवारांनी त्यांना मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये राज्यमंत्री केले होते.

पण राजकीय महत्वाकांक्षा म्हणा, की मग नेत्यांशी बिघडलेले संबंध यातून त्यांनी दहा वर्षांपूर्वी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. पण आपला हा निर्णय चुकला हे सूर्यकांता पाटील यांना भाजपने दहा वर्ष अडगळीत ठेवल्यानंतर कळाले. भाजपमध्ये हदगांव विधानसभा मतदारसंघाचे संयोजक पद देवून पाटील यांना भाजपने थोपवून धरले होते.

Sharad Pawar-Ashok Chavan - Suryakanta Patil
Rahul Gandhi is Leader of Opposition : राहुल गांधींची लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड; I.N.D.I.A आघाडीकडून शिक्कामोर्तब!

पण 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तीन महिन्याआधी मिशन 45 डोळ्यासमोर ठेवत राज्यातील भाजप नेत्यांनी अशोक चव्हाण यांना भाजपमध्ये प्रवेश दिला. ज्या अशोक चव्हाण यांच्याविरोधात जिल्ह्यात गेली अनेक वर्षापासून सूर्यकांता पाटील यांनी राजकारण केले, तेच अशोक चव्हाण पक्षात आले अन् राज्यसभेवर खासदारही झाले. चव्हाणांची भाजपमधील एन्ट्री ही सूर्यकांता पाटील यांच्यासाठी एक्झिट ठरणार हे जवळपास निश्चित होते.

दरम्यान, मराठवाड्यात पक्ष फुटीनंतर राष्ट्रवादीची पाळेमुळे पुन्हा घट्ट करण्याच्या प्रयत्नात असलेल्या शरद पवारांनी सूर्यकांता पाटील यांच्या मनातील तगमग अचूक हेरली. मागचं सगळं विसरून त्यांना पक्षात घेण्याची तयारी दाखवली आणि त्यातून सूर्यकांता पाटील यांचा भाजपला रामराम आणि दोन दिवसांत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश झाला.

Sharad Pawar-Ashok Chavan - Suryakanta Patil
Sanjay Jadhav Oath : तिसऱ्यांदा खासदारकीची शपथ घेताना संजय जाधवांचं परभणीकरांना मोठं वचन

परभणी, हिंगोली, नांदेडमध्ये प्रभाव..

सूर्यकांता पाटील यांचा राजकीय अनुभव, कारकीर्द चाळीस वर्षांची आहे. हदगावमधून विधानसभेवर निवडून जात राजकारणाचा श्रीगणेशा करणाऱ्या सूर्यकांता पाटील यांना काँग्रेस, राष्ट्रवादीकडून अनुक्रमे राज्यसभा आणि तीन वेळा लोकसभेवर जाण्याची संधी मिळाली. हिंगोली आणि नांदेड या दोन्ही लोकसभा मतदारसंघाचे सूर्यकांता पाटील यांनी प्रतिनिधित्व केले असल्यामुळे त्यांचा या भागात चांगला प्रभाव आहे.

परभणी जिल्ह्यातील वसमत, हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, नांदेड जिल्ह्यातील हादगाव, उमरखेड, किनवट या भागात सूर्यकांता पाटील यांचा चांगला संपर्क आहे. आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाला सूर्यकांता पाटील यांच्या पक्ष प्रवेशामुळे नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील काही भागात आपला जम बसवण्यासाठी मदत होऊ शकते.

Sharad Pawar-Ashok Chavan - Suryakanta Patil
Sushma Andhare On Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदे सूट काय, त्यांची खुर्चीही हिंदुत्वासाठी कुर्बान करतील, अंधारेंची टीका

विशेषतः नांदेड जिल्ह्यात अशोक चव्हाण यांच्या भाजपमध्ये जाण्यामुळे काँग्रेस पक्षात निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्याची संधी शरद पवारांनी हेरली आहे. सूर्यकांता पाटील यांना मात्र जोमाने कामाला लागावे लागेल तेव्हाच नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांच्या वर्चस्वाला राष्ट्रवादी धक्का देऊ शकते.

अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसमध्ये मोठा गट नाराज आहे. लोकसभा निवडणुकीत हे दिसून आले आहे. अशा नाराजांना सूर्यकांता पाटील यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीत खेचण्याचा प्रयत्न येणाऱ्या काळात होऊ शकतो. पाटील यांना पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश देत शरद पवारांनी अशोक चव्हाण यांना शह देण्यासाठी मोठा डाव टाकला आहे. आता तो कितपत यशस्वी होतो हे येणारा काळच ठरवेल.

Sharad Pawar-Ashok Chavan - Suryakanta Patil
VIDEO Amol Mitkari Big Statement: '...तर प्रत्येक पक्षाला स्वबळावर लढावं लागेल!'; मिटकरींचा दावा,मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com