

Satara News : सातारा आणि सांगली जिल्ह्यातील सहकारी संस्थांमधील महत्त्वाची यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीच्या तयारीला सर्वच नेत्यांनी कंबर कसली आहे. अशातच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज यांच्या गोटात अद्यापही वातावरण थंड आहे. त्यांची भूमिका काय असणार याकडे सर्वांच्या नजर लागल्या असताना शांत भूमिका हीच त्यांची रणनीती आहे की काय? असा सवाल उपस्थित होत आहे.
कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीच्या सगळ्या गदारोळात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेसचा मुख्य गट शांत आहे. मात्र, त्यांच्यात ती कमालीची शांतता धोरणात्मक आहे का? उघडपणे कोणाचेही नाव न घेता कार्यकर्त्यांना थोपवून ठेवण्याची ही रणनीती आहे का? अशी चर्चा आहे.
मैदानात उतरून शक्ती वाया घालवण्यापेक्षा, तगडे आव्हान देऊ शकणाऱ्याला पडद्यामागून ताकद द्यायची नीती पृथ्वीराज चव्हाण गटाकडून आखली जाण्याची शक्यता असल्याचा अंदाज बांधला जात आहे.
सत्ताधारी डॉ. सुरेश भोसले यांचे जयवंतराव भोसले सहकार पॅनेल विरुद्ध माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांचे ‘कृषिमहर्षी आबासाहेब मोहिते संस्थापक पॅनेल यांच्यात थेट लढत होत आहे. असे असताना कराड दक्षिण मधून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची व त्यांच्या काँग्रेसची भूमिका काय असणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.
बदलले राजकीय समीकरण आणि प्रचंड ईर्षा यामुळे सर्वच नेत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय खल सुरू आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यात प्रचंड चुरस असताना काँग्रेस नेत्यांमध्ये अंतर्गत फाटाफूट व पारंपरिक मित्रांची रणांगणातील अनुपस्थिती यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांच्या शिलेदारांसमोर दिशाहीनतेचे संकट आहे.
कृष्णा कारखान्याच्या निवडणुकांचा इतिहास पाहता, कऱ्हाड दक्षिणेतील काँग्रेस आणि पृथ्वीराज चव्हाण यांची ताकद कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या ‘रयत पॅनेल’च्या पाठीशी ठामपणे उभी राहिली आहे. २०२१ व त्या पूर्वीच्या निवडणुकांतही तीच स्थिती होती. मात्र सध्याची परिस्थिती पाहता अद्याप पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेस कार्यकर्त्यांची भूमिका अस्पष्ट आहे.
यापूर्वी पक्षाचे ज्येष्ठ विचारवंत यशवंतराव मोहिते यांच्या विचारांचा वारसा आणि काँग्रेसची पारंपरिक मतपेटीच्या जोरावर मोहिते गट व काँग्रेसची समीकरणे जुळत होती. मात्र, यावेळी निवडणूक रणांगणातून डॉ. मोहिते आणि त्यांचा गट पूर्णपणे बाजूला आहे. त्यामुळे काँग्रेसला मानणाऱ्या सभासद वर्गात कमालीची अस्वस्थता आहे.
जो पारंपरिक नेता कालपर्यंत सोबत होता, तोच कृष्णेच्या मैदानात नसल्याने निर्णय घेताना संभ्रमावस्था दिसून येत आहे.त्यामुळे आता चव्हाण गटाची आणि काँग्रेसची भूमिका काय असणार? याकडे लक्ष लागले आहे.
राजकीय वर्तुळात सर्वाधिक चर्चा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटात झालेल्या फाटाफुटीची आहे. काही वर्षांत कऱ्हाड दक्षिणेतील काँग्रेसच्या किल्ल्याला मोठी गळती लागली आहे. अनेक मातब्बर स्थानिक नेते, तळागाळातील कार्यकर्ते आणि सत्ताकेंद्रे बदलली आहेत. कारखान्याच्या निवडणुकीतही काही गट भोसले तर, काही गट अविनाश मोहिते गटासोबत राहिले, तर काही ठिकाणी अंतर्गत संपर्कात गेले आहेत.
त्यामुळे सध्या तरी, काँग्रेसची स्थानिक फळी विस्कळीत आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री चव्हाण यांच्याकडे शिल्लक राहिलेल्या निष्ठावंतांची मोट बांधण्याचाच पर्याय असल्याची चर्चा होत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत माजी मुख्यमंत्री चव्हाण शिलेदारांना काय आदेश देतात, त्यावर सर्वकाही अवलंबून आहे. त्यामुळे त्यांचे समर्थक सध्या तरी ‘वेट ॲण्ड वॉच’च्या मोडवर आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.