
Telangana News : चाहत्यांना वेड लावलेल्या ‘पुष्पा’ चित्रपटात ‘झुकेगा नहीं’ म्हणणाऱ्या अल्लू अर्जुनच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. एका महिलेच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर तेलंगणा पोलिसांनी चौकशीचा फास आवळला आहे. त्यामुळे दक्षिणेतील लोकप्रिय अभिनेता असूनही मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी त्याला झुकवल्याची चर्चा आहे.
काही दिवसांपूर्वी तेलंगणातील संध्या थिएटरमध्ये ‘पुष्पा 2’ चित्रपटाचे प्रमोशन होते. यावेळी चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. यादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर अल्लू अर्जुनचे ‘स्टार’ फिरले आहेत. तेलंगणा पोलिसांनी त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून चौकशीला वेग दिला आहे.
अल्लू अर्जुनला पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी अटक केली होती. कोर्टाने त्याची जामिनावर सुटका केली आहे. त्यामुळे त्याची पोलिसांच्या तावडीतून सुटका झाली, असे चित्र निर्माण झाले होते. पण रेवंथ रेड्डी यांनी तसे होऊ दिले नाही. आज लगेचच पोलिसांनी त्याला चौकशीसाठी थेट पोलिस ठाण्यात बोलावले होते. जवळपास तीन-चार तास चौकशी सुरू होती.
चेंगराचेंगरीच्या ठिकाणीही अल्लू अर्जुनला पोलिस घेऊन जाणार असल्याचे समजते. तो दक्षिणेतील सुपरस्टार आहे. चेंगराचेंगरीमध्ये मृत्यू झालेल्या महिलेच्या प्रकरणात त्याचा थेट संबंध नसली तरीही पोलिसांनी या प्रकरणात चांगलेच लक्ष घातले आहे. पहिल्यांदाच एखाद्या सुपरस्टारला अशा केसमध्ये थेट पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले होते. त्याआधी त्याला पोलिसांनी अटकही केली होती.
या प्रकरणाचे रेवंथ रेड्डी यांच्याकडून राजकारण केले जात आहे, असेही प्रश्न उपस्थित राहू लागले आहेत. दक्षिणेत अभिनेत्यांना मिळणार मान-सन्मान इतर ठिकाणी पाहायला मिळत नाही. अल्लू अर्जुनचे लाखो चाहते आहेत. त्यांचा रोषाला रेवंथ रेड्डींना निश्चितच सामोरे जावे लागण्याची भीती असेल. पण त्यानंतरही त्यांनी अल्लू अर्जुनला थेट पोलिस ठाण्यात बोलावून चौकशी करण्याची रिस्क घेतली आहे.
रेड्डींनी या प्रकरणातून जनतेला एक संदेश देण्याचाही प्रयत्न केला आहे. पुष्पामुळे प्रसिध्दीच्या झोतात असलेल्या अल्लू अर्जुनला अटक केली, पोलिस ठाण्यांत बोलावले, त्यामुळे कायद्यासमोर सर्व समान आहेत, असा मेसेज जनतेत देण्याचा रेड्डींचा प्रयत्न असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. सर्वसामान्य नागरिक असो किंवा कोणतीही मोठी व्यक्ती, या राज्यांत सर्वजण समान असल्याचे चित्र निर्माण करण्याचा रेड्डींचा प्रयत्न आहे. पण हे प्रकरण बॅकफायर न होऊ देण्याची काळजीही त्यांना घ्यावी लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.