Raj Thackeray MNS : मनसेचा 'एकला चलो'चा नारा! विधानसभेत कुणाचा फायदा अन् कुणाचा तोटा..

Eknath Shinde VS Uddhav Thackeray : विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीची साथ सोडत 'एकला चलो' अशी भूमिका घेतली आहे. त्यांच्या या निर्णयाचा फटका कोणाला बसणार, फायदा कोणाला होणार, अशी चर्चा सुरू झाली आहे.
Raj Thackeray
Raj ThackeraySafrkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : अगदी काही महिन्यांपूर्वीच लोकसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढणार आहे. स्वतः राज ठाकरे यांनी तसे जाहीर केले आहे. त्यांचा पक्ष राज्यातील 225 जागांवर उमेदवार उभे करणार आहे.

राज ठाकरे यांनी निर्णय जाहीर केला आणि चर्चा सुरू झाली ती फटका कोणाला बसणार याचीच. महायुतीला, शिवसेना शिंदे गटाला की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला? लोकसभा निवडणुकीत महायुतीला राज ठाकरे यांचा किती फायदा झाला, हे पाहिल्यास ढोबळमानाने या प्रश्नाचे उत्तर मिळू शकेल.

महायुती आणि महाविकास आघाडीतील जवळपास सर्वच पक्ष आता स्वबळावर लढण्याची भाषा बोलू लागले आहेत. भाजपने स्वबळावर लढावे, असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. अजित पवार यांनी तर सर्व 288 मतदारसंघांत सर्वेक्षण केल्याचे सांगितले जाते.

काँग्रेस, शिवसेना ठाकरे गटाचीही स्वबळाची भाषा करून झालेली आहे. महायुती, महाविकास आघाडीत आपले स्थान वरचढ राहावे, आपल्याला हव्या तितक्या जागा मिळाव्यात यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाने डाव टाकण्यास सुरूवात केलेली आहे.

आता प्रश्न आहे मनसेचा. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे Raj Thackeray यांना महायुतीला, विशेषतः भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता. राज्यातील लोकसभेची किमान एक जागा ते मागू शकले असते, मात्र त्यांनी तसे केले नाही. त्याचे कारण काय असेल? मुंबईतील पाच जागा महाविकास आघाडी जिंकणार, असे सर्व्हे आले होते.

मनसेचा नाशिकमध्येही प्रभाव आहे. लोकसभा निवडणुकीत तेथेही तो दिसून आला नाही. राज ठाकरे यांचा प्रभाव दिसला आणि महायुतीला फायदा झालाच असेल तर तो रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात. तेथे भाजपचे नारायण राणे विजयी झाले. शिवसेना ठाकरे गटाचे विनायक राऊत यांचा पराभव झाला.

Raj Thackeray
Nilesh Lanke : लंकेंनी 'LCB'च्या हप्त्यांचं रेटकार्ड केलं जाहीर; भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आल्यानं 'LCB' पुरती घायाळ

मुंबईत शिवसेनेते वर्चस्व आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर मुबईतील शिवसेनेचा मतदार उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांच्या बाजूने असल्याचे लोकसभा निवडणुकीच्या निकालाने दाखवून दिले. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडले, बाळासाहेबांचे विचार सोडले, अशी टीका शिंदे गटाकडून नेहमी केली जाते. मनसेची स्थापना मराठी माणसाच्या मुद्द्यावर झाली होती. तो मुद्दा बाजूला सारून राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा स्वीकार केला आहे.

उद्धव ठाकरे हे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेल्यामुळे मनसेकडूनही त्यांच्यावर वेळोवेळी निशाणा साधण्यात आला आहे. त्यामुळे शिंदे गट आणि मनसे यांचा डोळा एकाच मतदारावर आहे, असा निष्कर्ष निघू शकतो. राज ठाकरे स्वबळावर लढले तर त्याचा फटका एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बसू शकतो, असे काही राजकीय निरीक्षकांना वाटते.

मनसेचा फटका शिंदेसेनेला बसत असल्याचे पुढे येत असेल तर महायुतीने राज ठाकरे यांना का सामावून घेतले नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महायुतीत तीन पक्ष आहेत. त्या तीन पक्षांचे अपक्ष मित्र आहेत, काही छोटे मित्रपक्ष आहेत. आधी तीन पक्षांना किती जागा मिळतील, हा गुंता सोडवावा लागणार आहे. त्यानंतर त्यांचे मित्रपक्ष, अपक्षांचा विचार करावा लागेल.

महायुतीतील प्रमुख पक्षांचा जास्तीत जास्त जागा मिळवण्याचा प्रयत्न असेल. या साठमारीत आणखी एक पक्ष, म्हणजे मनसे वाढला असता तर गुंता आणखी वाढला असता. शिवाय, मनसेला सोबत घेऊन लोकसभेला किती फायदा झाला, असाही विचार भाजपने केला असणार. महायुतीत काय शिजत आहे, याचा अंदाज मनसेला आला असणार. त्यामुळेच त्यांनी 'एकला चलो'चा निर्णय घेतला असावा.

Raj Thackeray
Pune Rain Update : पुणेकरांनो सतर्क रहा! पुराचा धोका आणखी वाढणार; लष्कर दाखल

मुंबई आणि नाशिक हे मनसेचे प्रभावक्षेत्र आहे. महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे गट आणि महायुतीतून शिंदे गट मुंबईतील विधानसभेच्या सर्वाधिक जागांवर दावा करण्याची शक्यता आहे. मुंबईत मनसेच्या उमेदवारांचा उद्धव ठाकरे यांना फटका बसणार आणि एकनाथ शिंदे Eknath Shinde यांच्या उमेदवारांना फायदा होणार, असाही एक मतप्रवाह आहे.

म्हणजे उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीची मते मनसे मिळवणार, असा त्याचा अर्थ आहे. मात्र लोकसभा निवडणुकीचा निकाल आणि राज ठाकरे यांच्या बदलत्या भूमिका लक्षात घेतल्यास त्याचे उत्तर मिळून जाईल.

मुंबईत मनसेचा प्रभाव आहे, असे गृहीत धरले तर राज ठाकरे यांनी लोकसभेची किमान एक तरी जागा पदरात पाडून घेतली असती. मुंबईतील सहापैकी चार लोकसभा मतदारसंघांत महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले. एका जागेवर शिवसेना ठाकरे गटाचा निसटता पराभव झाला.

एकला चलो ही भूमिका जाहीर करताना राज ठाकरे यांनी महायुती सरकारच्या लाडकी बहीण या योजनेवर प्रश्न उपस्थित केला. महिलांना दरमहा दीड हजार रूपये मिळणार आहेत. मात्र ते देण्यासाठी सरकारकडे पैसे आहेत का? असे राज यांनी विचारले. लाडकी बहीण योजनेवर विरोधी पक्षांकडून सावधगिरी बाळगली जात आहे. त्यांनी थेट टीका करण्याचे टाळले आहे. राज ठाकरे विरोधकांची ती स्पेस भरून काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

मूळ प्रश्नांकडे महायुती सरकारचे दुर्लक्ष होत आहे, अशीही टीका त्यांनी केली. यापुढे ते सरकारवरील टीका आणखी तीव्र करू शकतात. त्यामुळे सरकारवर नाराज असलेली मते मनसेने खेचली तर मात्र महाविकास आघाडीला त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. वातावरण लोकसभा निवडणुकीसारखे राहिले तर मात्र त्याचाही उपयोग होणार नाही.

Raj Thackeray
Rashtrapati Bhavan : मोठा निर्णय : राष्ट्रपती भवनातील अशोक आणि दरबार हॉलची नावं बदलली!

मनसेच्या MNS पक्षसंघटनेवर मरगळ आली आहे. मुंबई, नाशिक, पुणे आदी शहरी भाग वगळला तर उर्वरित महाराष्ट्रात पक्षाची संघटना कमकुवत आहे. कार्यकर्त्यांमध्ये निरुत्साह आहे. 225 जागा स्वबळावर लढण्याच्या मनसेच्या निर्णयामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह वाढणार आहे. पक्षाने निवडणूकच नाही लढवली तर कार्यकर्ते कसे टिकणार, असा प्रश्न निर्माण होतो. कार्यकर्त्यांना कुणी वाली राहत नाही.

लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतरही महायुतीकडून मनसेच्या कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक दिली जात नाही, अशा तक्रारी अनेक ठिकाणांवरून आल्या होत्या. जय, पराजय वेगळी बाब आहे, पक्षाने निवडणूक लढवली तर कार्यकर्त्यांना संधी मिळते. संघटन मजबूत होते. या अर्थाने मनसेची एकला चलो ही भूमिका योग्य म्हटली पाहिजे.

राज्यभरातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर राज ठाकरे यांनी गुरुवारी हा निर्णय जाहीर केला. यावेळी त्यांनी पवार कुटुंबीयांवर टोला लगावण्याची संधी सोडली नाही. लाडका भाऊ आणि लाडकी बहीण Ladki Bahin एकत्र राहिले असते तर दोन्ही पक्ष टिकले असते, असा टोला त्यांनी सुप्रिया सुळे, अजित पवार यांच्यावर त्यांचे नाव न घेता लगावला. महाराष्ट्रात राजकारण करायचे असेल तर शरद पवार किंवा त्यांच्या कुटुंबीयांवर टीका करावीच लागते, हे अर्थातच राज ठाकरे यांनाही माहीत आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com