Election News : बरोब्बर एक वर्षापूर्वी (6 मे 2023) माझे कोकण वाचवा अशी साद घालत राज ठाकरे यांनी बारू रिफायनरीला विरोध केला होता. उद्धव ठाकरे (Uddhav Thackear) यांनीही विरोध केला होता. मात्र आता राज ठाकरे (Raj Thackeray) महायुतीच्या बाजूने आले आहेत आणि दोन दिवसांपूर्वी कणकवणी येथील नारायण राणेंच्या (Narayan Rane) प्रचारसभेत बारसूला विरोध केल्याच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांना घेरले आहे. अशा विसंगतींसाठी ही लोकसभा निवडणूक कायम लक्षात ठेवली जाईल.
लोकसभेच्या 2024 च्या निवडणुकीत प्रचाराच्या अनेक गंमतीजमती पाहायला मिळत आहेत. घाऊक पक्षांतरांमुळे कोण कुठे आहे, हे नीट तपासून घ्यावे लागत आहे. पक्षांतरे केल्यामुळे किंवा आघाड्या बदलल्यामुळे नेत्यांच्या भाषणांमध्ये मोठ्या विसंगती आढळून येत आहेत. कधी कधी त्या हास्यास्पदही ठरत आहे. चोहीकडे नुसता गोंगाट, गोंधळ आहे. आपण गेल्या पाच वर्षांपूर्वी काय बोलत होतो आणि आता काय बोलत आहोत, याचेही भान अनेक नेत्यांना राहिलेले नाही. अत्यंत महत्वाच्या प्रश्नांवर तरी किमान विसंगत भूमिका नेत्यांनी घेऊ नये, ही अपेक्षाही या निवडणुकीत फोल ठरली आहे. (Raj Thackeray News)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे कोणती भूमिका घेणार, असा प्रश्न निवडणुकीपूर्वी लोकांना पडला होता. अपेक्षेप्रमाणे त्यांनी भाजपसोबत जाणे पसंत केले. हे काही अचानक घडलेले नाही. त्यांचे चुलतबंधू उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांना मशिदींवरील अनधिकृत भोंगे आणि त्याच्या आवाजाचा मुद्दा उपस्थित केला होता.
एकेकाळी महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार आहे म्हणणारे राज ठाकरे मशिदींच्या भोंग्यापर्यंत आले. उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रिपद गेले आणि राज ठाकरे यांना या प्रश्नाचा विसर पडला. त्यापूर्वी त्यांना ईडीने नोटीस बजावली होती. त्याच्यापूर्वी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी राज्यात ठिकठिकाणी फिरून केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात जाहीरपणे भूमिका मांडली होती.
त्यावेळी त्यांचा लाव रे तो व्हिडीओ, हा प्रयोग अत्यंत लोकप्रिय झाला होता. त्याची चर्चा अजूनही होत असते. हे सगळे करत असताना लोकसभेसाठी त्यांनी त्यांच्या पक्षाचा एकही उमेदवार उभा केला नव्हता. त्यांच्या सभा प्रचंड गाजल्या होत्या, मात्र त्याचा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला अजिबात फायदा झाला नव्हता. शिवसेना - भाजप युतीच्या 41 जागा निवडून आल्या होत्या.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पाच वर्षांत राज ठाकरे यांनी यू टर्न घेतला आहे. या निवडणुकीत ते महायुतीसोबत गेले आहेत. विशेष म्हणजे, याही निवडणुकीत त्यांच्या मनसेचा एकही उमेदवार रिंगणात नाहीत. असे असले तरी महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. त्यांच्यासाठी जाहीर सभा घेत आहेत. अशीच एक जाहीर सभा त्यांनी दोन दिवसांपूर्वी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील भाजपचे उमेदवार नारायण राणे यांच्यासाठी घेतली. कणकवली येथे झालेल्या प्रचारसभेत त्यांनी चुलतबंधू, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
उद्धव ठाकरे अडीच वर्षे मुख्यमंत्री होते, त्यापूर्वी 2014 ते 2019 पर्यंत ते सत्तेत होते. त्यावेळीही राज्यातून अनेक उद्योग बाहेर गेले. उद्धव ठाकरे यांनी आधी नाणारला आणि नंतर बारसू रिफायनरीलाही विरोध केला. भाभा अणुकेंद्र मुंबईत आहे, हे उद्धव ठाकरे यांनी लक्षात घेतले पाहिजे. उद्धव ठाकरे यांना मुळात कोकणचा विकास नको आहे. येथे विकास झाला तर लोकांना कामाच्या शोधात बाहेर जावे लागणार नाही.
उद्धव ठाकरे यांच्यावर अशी टीका करत असताना त्यांनी नारायण राणे यांचे तोंडभरून कौतुक केले. आता गंमत अशी आहे, राज ठाकरे डिसेंबर 2022 मध्ये कोकणात गेले होते. त्यावेळी त्यांनी बारसू रिफायनरीला कडाडून विरोध केला होता. दोन वर्षांच्या आतच त्यांना या भूमिकेचा विसर पडला आहे. अशा अनेक सर्वपक्षीय गंमतीजमती या निवडणुकीत पाहायला मिळत आहेत. त्यातल्या त्यात कोकणचा विकास आणि बारसू रिफायनरीची गंमत थोडी ठळकपणे उठून दिसत आहे.
डिसेंबर 2022 मध्ये रत्नागिरी येथे पत्रकार परिषदेत राज ठाकरे म्हणाले होते, की विनाशकारी प्रकल्प कोकणात नको, मात्र राज्यातून उद्योग बाहेर जाणे हेही योग्य नाही. कोकणातील जमिनी खरेदी करण्यासाठी भुरटे लोक येत असतात, त्यावेळी काळजी घेतली पाहिजे. बाहेरचे लोक येऊन एकदाच हजारो एकर जमीन खरेदी करतात, अशावेळी संशय येत नाही का? मतदानाच्या माध्यमातून कोकणातील जनतेने राग व्यक्त करायला हवा, मात्र तसे होताना दिसत नाही. त्यानंतर 6 मे 2023 म्हणजे बरोब्बर एक वर्षापूर्वी राज ठाकरे यांनी रत्नागिरीत जाऊन माझे कोकण वाचवा, अशी साद घालत जमीन न विकण्याचा सल्ला लोकांना दिला होता. म्हणजेच बारसू रिफायनरी प्रकल्पाला त्यांनी विरोध केला होता. सत्ताधाऱ्यांसह उद्धव ठाकरे यांच्यावरही त्यांनी त्यावेळी टीका केली होती.
त्यावेळी राज ठाकरे यांनी कोकणवासियांच्या मनाला हात घालणारे भाषण केले होते. ते म्हणाले होते, येथील लोकप्रतिनिधींना तुमच्याबद्दल काहीही वाटत नाही. त्यामुळे कोकणवासियांनी आतातरी जागे व्हायला हवे. छत्रपती शिवराय म्हणायचे की, आपले शत्रू समुद्रमार्गे येतील, त्यामुळे डोळ्यांत तेल घालून लक्ष ठेवा. 26/11 चा हल्ला करणारे अतिरेकी समुद्रमार्गेच आले होते.
1992 च्या बॉम्बस्फोटांत वापरलेले आरडीएक्सही समुद्रमार्गेच आले होते. शिवरायांच्या सांगण्याकडे आपण दुर्लक्ष केले, म्हणून असे झाले. बारसूमध्ये युनेस्कोला कातळशिल्प सापडले आहेत. जगभरातील अनेक हेरिटेज वास्तूंचे युनेस्कोकडून जतन केले जाते. युनेस्कोच्या परवानगीशिवाय हेरिटेज वास्तूच्या परिसरात मोठे बांधकाम करता येत नाही.
एक वर्षापूर्वीच आपण काय बोललो होतो, याचा विसर राज ठाकरे यांना कसा पडला असेल? बारसू रिफायनरीला राज यांनीही कडाडून विरोध केला होता. उद्धव ठाकरे यांनीही विरोध केला होता. आता त्यासाठी राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांना धारेवर धरत आहेत, त्यांना विकासाचे विरोधी ठरवत आहेत, ही गंमतच म्हणावी लागेल. अशा अनेक गंमतीजमती या निवडणुकीच्या निमित्ताने अनुभवायला मिळत आहेत. राजकीय नेते फक्त आपला स्वार्थ पाहतात, त्यापलीकडे त्यांना काहीही दिसत नाही, असे मत समाजातील एका मोठ्या वर्गाचे बनले आहे. या मताला आणखी खतपाणी मिळेल, अशा घटना या निवडणुकीच्या प्रचारात घडत आहेत.
(Edited By : Sachin Waghmare)