
Mumbai News : आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरु केली असल्याने वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दुसरीकडे उद्धव-राज ठाकरे एकत्र येणार याची चर्चा जोरात सुरु आहे. गेल्या महिनाभरापासून या दोन पक्षाचे मनोमिलन अंतिम टप्प्यात आली असल्याची चर्चा आहे. त्यातच आता मनसे व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाची युती येण्यासाठी 'ही' अट अडचणीची ठरत आहे.
गेल्या महिन्यात राज-उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) बंधू विदेश दौऱ्यावर जाण्याच्या आधीपासून एकत्र येणार असल्याचा चर्चाना उधाण आले आहे. दोन्ही नेते विदेश दौऱ्यावर येऊन 15 दिवसापेक्षा अधिकचा काळ झाला असला तरी युतीची चर्चा पुढे सरकत नसल्याचे दिसत असतानाच आदित्य ठाकरे, अमित ठाकरे यांनी मात्र सकारात्मकता दर्शवली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चानी गेल्या दोन दिवसापासून जोर धरला आहे.
या दोन पक्षाच्या एकत्र येण्याबाबत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत यांनी देखील सूचक संकेत दिले आहेत तर दुसरीकडे आतापर्यंत दोन बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर एकही शब्द न बोलणारे मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी ट्विटरवर संजय राऊत यांचे 'नरकातील स्वर्ग' हे पुस्तक वाचत असल्याचे ट्विट केले आहे. त्यामुळे दोन पक्षात राजकीय चर्चा सुरु झाले असल्याचे संकेत त्यातून मिळत आहे. तर दुसरीकडे संजय राऊत यांनी उद्धव व राज ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाली असावे असे सांगत आणखी एक बॉम्ब फोडला आहे. त्यामुळे नक्कीच आता दोन पक्षाच्या एकत्र येण्याविषयी पुन्हा चर्चाना वेग आला आहे.
येत्या काळात मनसे व शिवसेना उद्धव ठाकरे यांचा पक्ष एकत्र येणार असला तरी या युतीमुळे कोणत्या पक्षाचे काय होणार याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. दोन्ही भाऊ एकत्र आल्यास महाविकास आघाडीचे काय होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे तर दुसरीकडे या सर्व घटनाक्रमाचा महायुतीवर काय परिणाम होणार याचा देखील अंदाज राजकीय विश्लेषकाकडून बांधला जात आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा या ठाकरे बंधू काय निर्णय घेणार? याकडे लागल्या आहेत.
दोन्ही बंधूंनी एकत्र येण्यापूर्वी एकमेकांना काही अटी घातल्याचे समजते. या पूर्वीच उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने मनसेला महायुतीसोबतचे संबंध तोडण्याची अट घातली होती, याची चर्चा होती. तर आता मनसेने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला काँग्रेससोबतची साथ सोडण्याची अट घातली असल्याचे समजते. मात्र, ठाकरे यांच्या शिवसेनेला काँग्रेससोबत जाण्याचा फायदा झाला होता. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाने ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान केले होते. त्यामुळे काँग्रेसला सोडायचे म्हटल्यानंतर राज ठाकरे यांच्या मतामुळे दूर जात असलेल्या मताची भरपाई होणार का? याचे गणित मांडले जाणार आहे. त्यामुळेच या दोन पक्ष एकत्र येण्याची चर्चा रखडली असल्याचे समजते.
दुसरीकडे ठाकरे बंधू ऐकत आल्यास कोणाचा फायदा व कोणाचे नुकसान होणार? याचा हिशोब देखील केला जात आहे. त्यातच ठाकरे बंधू एकत्र येणार असल्यास भाजपकडून येत्या काळात काय पावले उचलली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हे दोन बंधू एकत्र आल्यास भविष्यात एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची मोठी अडचण होणार आहे. सध्या महायुतीकडे मोठ्या प्रमाणात होत असलेल्या इनकमिंगला त्यामुळे आळा बसण्याची शक्यता आहे.
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या निर्णयाचा सर्वच राजकीय पक्षावर परिणाम होणार आहे. त्यामुळेच सर्वच पक्ष या युतीबाबत आता तरी काहीच बोलत नाहीत, सर्वच जण सध्या तरी ताक फुंकून पित आहेत. एकीकडे भाजपला शिंदे शिवसेनेच्या वाढत्या वर्चस्वाला यामुळे आळा घालणे शक्य होणार आहे तर दुसरीकडे काँग्रेस व शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसपुढे ठाकरे गट आपल्याला वाऱ्यावर सोडण्याची भीती सतावत आहे. त्यामुळे येत्या काळात काय होणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.