
Shinde Group News : बंडखोरी करणाऱ्यांचा उल्लेख शिवसेनेच्या भाषेत गद्दार असा केला जातो. एकनाथ शिंदे ४० आमदारांसह शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर त्या सर्वांचाही उल्लेख वारंवार गद्दार असा केला जाऊ लागला. त्यात ५० खोके एकदम ओके या घोषणेची भर पडली. ती घोषणा राज्यातील गावोगावी पोहोचवण्यात आली. आम्हाला गद्दार म्हणू नका, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा शिंदे गटातील काहीजणांनी देऊन पाहिला, मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. आता शिंदे गटातीलच दोन दिग्गज नेते एकमेकांचा उल्लेख गद्दार असा करत आहेत.
राजकारणी लोकांना सत्तेचा मोठा हव्यास असतो. त्यातून काहीजण वेडीवाकडी पावले टाकतात. मतदारांना गृहीत धरून वाट्टेल ते करत सुटतात, हे अलीकडच्या काळात उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. उभी हयात शिवसेनेत घालवलेल्या, सत्तेची विविध पदे उपभोगलेल्या नेत्यांनी पक्षाचा त्याग केला. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांवरती टीका केली, विविध आरोप केले. महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडून भाजपसोबत सत्तेत सहभागी होताना त्यांनी दिलेली कारणे फोल, हास्यास्पद होती हे वर्षभरानंतर सर्वांच्याच लक्षात आले. दोन्ही बाजूंनी वाचाळवीरांची वक्तव्ये अजूनही सुरूच असतात. एकमेकांवर टीका करताना रोज नवी पातळी गाठली जात आहे. आता ऐन दिवाळीत शिंदे गटात फटाके फुटू लागले आहेत. फटाके फोडणारे दोन्ही दिग्गज नेते असून त्यांच्यात बेताल आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मराठा आरक्षण आंदोलन, त्यात पुन्हा आता ओबीसींची आक्रमक भूमिका, सरकारमध्ये अजितदादांची एंट्री अशा कसरती करत महायुती सरकार चालवताना हैराण झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर हे नवीन संकट निर्माण झाले आहे. माजी मंत्री रामदास कदम (भाई) आणि खासदार गजानन कीर्तिकर (भाऊ) यांच्यात हा कलगीतुरा सुरू झाला आहे. एकमेकांना गद्दार म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मुंबई पश्चिम लोकसभा मतदारसंघावरून हा वाद सुरू झाला. कीर्तिकर याच मतदारसंघातून निवडून आले आहेत. आपल्या मुलासाठी रामदास कदम यांना हा मतदारसंघ हवा असल्याची कुणकुण लागल्यामुळे कीर्तिकर यांनी कदमांवर टीकेचे बाण सोडले. त्यांनी कदम यांचा उल्लेख थेट गद्दार असा केला आहे. कदम यांनीही कीर्तिकरांना गद्दार म्हटले आहे. दोन्ही नेत्यांची भाषा पाहता हा वाद विकोपाला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खासदार कीर्तिकरांनी पत्रकाद्वारे कदम यांच्यावर कठोर शब्दांत टीका केला आहे. माझ्यावर गद्दारीचा आळ घेणाऱ्या रामदास कदमांनी मालाड विधानसभा मतदारसंघातून १९९० च्या निवडणुकात मला आणि लोकसभेच्या निवडणुकीत अनंत गीते यांना पाडण्यासाठी प्रयत्न केले होते. रामदास कदम यांच्या गद्दारीचा इतिहास मोठा आहे. त्यानंतर खेड ते पुणे हा प्रवास त्यांनी शरद पवार यांच्या वाहनातून त्यांच्यासोबत केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याबाबत त्यांनी पवारांशी चर्चा केली होती, असा पूर्वी झालेला गौप्यस्फोट कीर्तिकर यांनी पत्रकाद्वारे पुन्हा एकदा केला आहे. त्यानंतर रामदास कदम यांनीही खासदार कीर्तिकर यांना त्याच भाषेत उत्तर दिले आहे. गजाभाऊंचे वय झाले आहे. त्यांना उपचारांची गरज आहे. आपल्याच पक्षाच्या नेत्याविरुद्ध बोलण्यापूर्वी त्यांनी पक्षप्रमुखांशी चर्चा करणे गरजेचे होते. कीर्तिकर हेच शिवसेनेसोबत (शिंदे गट) गद्दारी करत आहेत. ते आणि त्यांचे पुत्र अमोल कीर्तिकर (ठाकरे गट) एकाच कार्यालयात बसत आहेत. आपला खासदार निधी ते मुलाच्या मतदारसंघात विकासकामांसाठी देत आहेत, असा घणाघात रामदास कदम यांनी केला.
शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर या नेत्यांवर ठाकरे गट आणि समाजमाध्यमांतून टीकेची झोड उठली होती. त्यांचा उल्लेख गद्दार असा केला जाऊ लागला. त्यामुळे शिंदे गटातील आमदारांचे पित्त खवळले होते. अनेक आमदारांनी कायदेशीर कारवाईचा इशारा दिला होता. हे सगळे सुरू असताना कालांतराने अजितदादा पवार सरकारमध्ये सहभागी झाले. मंत्रिपदाकडे डोळे लावून बसलेल्या शिंदेंच्या अनेक शिलेदांरांचा अजितदादांच्या एंट्रीमुळे भ्रमनिरास झाला. पालकमंत्रिपदे मिळवतानाही अजितदादांनी बाजी मारली. १६ आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीला वेग आला आहे. मराठा आरक्षण आंदोलन पेटलेले आहे. आता ओबीसीही आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. धनगर समाजाचेही आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. राज्यात दुष्काळी स्थिती आहे. आगामी काळात पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपचे मिशन ४५ तडीला नेण्याची जबाबदारी मुख्यमंत्री शिंदे यांनाही पेलावी लागणार आहे. अशा या संकटकाळात आता शिलेदारांनीच मुख्यमंत्री शिंदेंच्या अडचणीत भर टाकायला सुरुवात केली आहे. भाई आणि भाऊ या दिग्गजांची समजूत शिंदे कशी घालणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.