Riteish Deshmukh Latur Speech : राज्यातील अनेकांच्या मनात असलेली भावना अभिनेते, दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र रितेश देशमुख यांनी लातुरात बोलून दाखवली. राज्यातील राजकीय वातावरण कधी नव्हे इतके किळसवाणे झाले आहे. सत्तेसाठी काहीही करायची तयारी असल्याचे काही नेत्यांनी दाखवून दिले आहे. यासाठी त्यांनी नात्यांचाही विचार केला नसल्याचे दिसते आहे.
एकमेकांवर असभ्य भाषेत आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. काही पक्षांतील ठराविक नेते मतांसाठी विशिष्ट समुदायाला टार्गेट करत आहेत, असा अराजकसदृश गोंधळ सुरू असताना रितेश देशमुख यांनी केलेली सुसंस्कृत राजकारणाची अपेक्षा कौतुकास्पद, दिलासादायक आहे.
निवळी येथे विलास साखर काऱखान्यावर दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्यावेळी रितेश यांनी राजकीय नेत्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारे भाषण केले. यशवंतराव चव्हाण, शरद पवार, विलासराव देशमुख आदी नेत्यांच्या काळातील महाराष्ट्र परत आणावा लागेल, असे सांगत आजच्या राजकीय परिस्थितीला कंटाळलेल्या लोकांच्या मनालाच त्यांनी हात घातला आहे.
दिलीपराव देशमुख यांना उद्देशून, काका मी तुमच्यावर जिवापाड प्रेम करतो... असे म्हणत रितेश यांनी राज्यातील काही पुतण्यांच्या डोळ्यांत अंजन घातले. कदाचित रितेश देशमुख यांचा तसा उद्देश नसेलही, मात्र राज्यात गेल्या काही महिन्यांपासून घडत असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या काकांप्रति दाखवलेला जिव्हाळा, आदर हा कौतुकाचा विषय ठरला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राज्य, देशातील राजकीय परिस्थिती संवेदनशील माणसाला अस्वस्थ करणारी आहे. विरोधकांना संपवून टाकायचे, असा जणू चंगच सत्ताधाऱ्यांनी बांधला आहे. विरोधकांना शासकीय यंत्रणांचा गैरवापर करून जेरीस आणले जात आहे. केंद्रात काँग्रेस सत्तेत असतानाच्या काळातील अर्थव्यवस्थेबाबत भाजपने नुकतीच श्वेतपत्रिका काढली. त्यात विविध गैरव्यवहारांचा उल्लेख होता.
अशोक चव्हाण मुख्यमंत्री असतानाच्या काळात आदर्श घोटाळा झाला होता. त्याचाही उल्लेख श्वेतपत्रिकेत होता. त्यानंतर तिसऱ्या की चौथ्याच दिवशी अशोक चव्हाण(Ashok Chavan) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांना राज्यसभेत प्रवेश मिळाला. राजकीय नैतिकता कधी नव्हे इतक्या खालच्या थराला गेली, हे दाखवून देण्यासाठी काँग्रेसच्या काळात दोन वेळा मुख्यमंत्री बनलेल्या अशोक चव्हाण यांचे उदाहरण बोलके आहे.
शिवसेना फुटली, त्यासाठी विविध कारणे देण्यात आली. ती किती हास्यास्पद होती, हे कालांतराने राज्याने पाहिले आहे. फुटिरांनी दिलेल्या कारणांपैकी एक कारण होते शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut). राऊत हे रोज सकाळी येऊन भाजपवर टीका करायचे, त्यामुळे शिवसेना फुटली, असे कारण देण्यात आले होते. राऊत हे शिवसेनेचे प्रवक्ते आहेत. त्यामुळे त्यांच्यावर पक्षाची भूमिका मांडण्याची जबाबदारी आहे. राऊत यांनी भाजपवर टीका केली म्हणून आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलो, हे कारणही तसे हास्यास्पदच म्हणावे लागेल. आता तसेच कारण राष्ट्रवादीच्या फुटिरांनीही शोधले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील हजारो कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्याचा उल्लेख जाहीर सभेत केला आणि त्याच्या काही दिवसांनंतर अजितदादा पवार 40 आमदारांसह बाहेर पडून सत्तेत सहभागी झाले, उपमुख्यमंत्री झाले. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यामुळे पवार कुटुंबीयांत फूट पडली, अशी टीका कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केली होती. शिवसेनेतून बाहेर पडलेल्यांनी जसे संजय राऊतांना लक्ष्य केले होते.
तसाच प्रयोग मुंडे यांनी जितेंद्र आव्हाड( Jitendra Awhad) यांच्यावर केला होता. मात्र, शरद पवार यांनी मुंडे यांचे मनसुबे उधळून लावले. आव्हाड यांनी काय बोलावे, हे दुसरे कुणी सांगू शकत नाही, अशा सुसंस्कृत भाषेत शरद पवार यांनी मुंडे यांच्या टीकेचा समाचार घेतला होता. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर आमदार आव्हाड हे फुटिरांविरुद्ध आक्रमक झाले आहेत. त्यामुळे मुंडे यांनी त्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता.
एकंदर अशा वातावरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण किळसवाणे झाले आहे. टीका करताना मर्यादेचे पालन केले जात नाही. एका विशिष्ट समुदायाविरुद्ध बेछूटपणे मन मानेल तसे आऱोप केले जात आहेत. यासाठी काही नेत्यांना कामाला लावण्यात आले आहे. अशा प्रकारांना पायबंद घालण्याऐवजी सत्ताधारी नेत्यांनी डोळे मिटून घेतले आहेत.
जो आपल्यासोबत नाही, त्यांचे सत्ताधाऱ्यांकडून चारित्र्यहनन केले जात आहे. महागाई, बेरोजगारीची समस्या भयंकर झालेली असतानाही आमचाच नेता निवडून येणार, आमचीच सत्ता येणार असे दावे केले जात आहेत आणि दुसरीकडे विरोधकांनी आपल्या पक्षात यावे, यासाठी पायघड्या अंथरल्या जात आहेत, विरोधकच संपले तर देशात हुकूमशाही येणार, हे सांगायला कुण्या तज्ज्ञाची गरज नसावी.
या अशा एकंदर वातावरणात रितेश देशमुख यांनी व्यक्त केलेले विचार शांतताप्रेमी नागरिकांना दिलासा देणारे आहेत. यशवंतराव चव्हाण, शरद पवार, विलासराव देशमुख यांच्या काळातील महाराष्ट्र परत आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. रितेश यांचे बंधू अमित देशमुख हे भाजपमध्ये जाणार, अशी चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. रितेश यांचे आवाहन आणि त्यासाठी पुढाकार घेण्याची विनंती त्यांनी अमित देशमुख यांनाही केल्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना तूर्त तरी पूर्णविराम मिळाला आहे. राज्यातील दिग्गज नेत्यांना जे जमले नाही ते अभिनेता रितेश यांनी करून दाखवले आहे.
(Edited by _ Mayur Ratnaparkhe)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.