
Rahul Gandhi’s Strategic Gains from Party Unity : काँग्रेससाठी 2014 नंतर तब्बल 10 वर्षांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालाने सर्वाधिक आनंद झाला होता. या निवडणुकीतील अनपेक्षित निकाल काँग्रेस आणि विशेषत: राहुल गांधी यांच्यासाठी सुखद ठरला. अनेक निवडणुकांमध्ये पराभव, बड्या नेत्यांनी सोडलेली साथ यामुळे पक्षाची दयनीय अवस्था झाली होती. त्यातच आणखा काही नेत्यांमध्ये निर्माण झालेले वितुष्टही राहुल यांच्यासाठी डोकेदुखी ठरली होती. पण पुन्हा एका राहुल यांना सुखद धक्का दिला आहे.
राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत व माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट, हे दोन नेते काँग्रेस आणि राहुल यांच्यासाठीही अत्यंत महत्वाचे. केवळ राजस्थानच नव्हे तर संपूर्ण देशात पक्षाची रणनीती राबविणे, जुन्या-नव्या नेत्यांना एकसंध ठेवण्यासाठी अन् गांधी कुटुंबावरील सामान्य कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा विश्वास अधिक बळकट करणाऱ्या नेत्यांपैकी हे दोन नेते आहेत. पण मागील पाच वर्षांत या दोन नेत्यांमधून विस्तवही जात नव्हता. या दोन्ही नेत्यांची शनिवारी अनेपक्षित भेट झाली अन् चर्चांना उधाण आले.
पायलट यांचा मंत्रिपदाचा राजीनामा, त्यांच्या समर्थक आमदारांचा सरकारवरील दबाव, फोन टॅपिंगचे प्रकरण, पायलट यांच्या वरिष्ठ नेत्यांशी भेटीगाठी, भाजपकडून काँग्रेस फोडण्यासाठी सुरू असलेली छुपी रणनीती अशा अनेक घडामोडी राज्यात घडल्या. गेहलोत अन् पायलट हे सार्वजनिक कार्यक्रमांसह कुठेही फारसे एकत्रित दिसलेच नाही. राजस्थान विधानसभेच्या प्रचारसभांमध्ये त्यांच्यातील दुरावा स्पष्टपणे दिसत होता. पक्षाच्या बैठकांमध्येही त्यांचा संवाद नसायचा. भाजपकडून या दोन्ही नेत्यांमधील हा दुरावा अधिक वाढविण्यासाठी अटोकाट प्रयत्न केले. पण त्यांचे सर्व प्लॅन फेल ठरले.
उलट दोन्ही नेत्यांमधील दुरावा आता दूर झाला की काय, अशी सुखद बातमी देणारी घटना शनिवारी (ता. 8) घडली. सचिन पायलट हे गेहलोत यांच्या घरी गेले होते. निमित्त होते, पायलट यांचे वडील राजेश पायलट यांच्या 25 व्या स्मृती कार्यक्रमाचे. या कार्यक्रमाचे विशेष निमंत्रण पायलट यांनी गेहलोत यांना दिले. विशेष म्हणजे पायलट यांनी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतल्याने दोघांमधील दुरावा संपल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. दोन्ही नेत्यांनी सोशल मीडियातून या भेटीची माहिती दिली. पायलट यांनी भेटीचा हस्तांदोलन करतानाचा फोटोही पोस्ट केला.
अशोक गेहलोत यांनी भावनिक पोस्ट करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी म्हटले आहे की, एआयसीसीचे महासचिव सचिन पायलट यांनी राजेश पायलट यांच्या 25 व्या पुण्यातिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी आमंत्रित केले. मी आणि राजेश पायलटजी 1980 मध्ये पहिल्यांदा सोबतच लोकसभेत पोहचलो आणि जवळपास 18 वर्षे खासदार होतो. त्यांच्या आकस्मिक निधनाचे दु:ख आजही आहे. त्यांच्या जाण्यामुळे पक्षावरही मोठा आघात झाला, असे गेहलोत यांनी म्हटले आहे. त्यांनी सचिन पायलट यांच्यासोबतचा निवास्थानातील व्हिडीओही पोस्ट केला आहे.
दोन्ही नेत्यांची ही कृती काँग्रेस आणि प्रामुख्याने राहुल यांच्यासाठी सुखद ठरली आहे. या दोन्ही नेत्यांचे मनोमिलन होणे, हे केवळ राजस्थान काँग्रेस नव्हे तर संपूर्ण देशातील पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसाठी आनंददायी असेल. कारण 2014 नंतर काँग्रेसमधील अनेक युवा, ज्येष्ठ नेत्यांनी पक्ष सोडला आहे. त्याचा मोठा फटकाही पक्षाला सहन करावा लागला. पक्ष अजूनही गटांगळ्या खात आहे. अनेक राज्यांमध्ये पक्षाचे अस्तित्व नसल्यात जमा आहे. काही राज्यांमध्ये ते औषधापुरते उरले आहे. तीन राज्ये वगळता देशांत कुठेही स्वबळावर सत्ता नाही. आगामी काळात होऊ घातलेल्या काही राज्यांमध्येही तशी स्थिती नाही. अशावेळी जुन्या-नव्या नेत्यांमधील मनोमिलन, पक्षातील एकजुट काँग्रेससाठी नवसंजीवनी देणारी ठरणार आहे.
पक्षातील गटबाजी संपविण्याचे आवाहन राहुल यांच्यासह पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून सातत्याने केले जात आहे. गेहलोत आणि पायलट यांची ही कृती निश्चितच या प्रयत्नांना पुरक ठरणारी आहे. 2018 मध्ये पक्षाने राजस्थानमध्ये विजय मिळविल्यानंतर पायलट यांना मुख्यमंत्रिपद हवे होते. पण त्यांना उपमुख्यमंत्रिपदावर समाधान मानावे लागले. दोन वर्षांतच गेहलोत यांच्यासोबत वाद झाल्याने पायलट यांनी उपमुख्यमंत्रिपदासह प्रदेशाध्यक्ष पदाचाही राजीनामा दिला. 2020 मध्ये गेहलोत यांनी थेट पायलट यांच्यावर गंभीर आरोप केले. भाजपच्या मदतीने सरकार पाडण्यासाठी प्रयत्न केल्याचा दावा त्यांनी केला अन् पक्षात वादळ उठले. राहुल, प्रियांका गांधी यांनाही हे वाद मिटवता आला नाही. मागील पाच वर्षे या दोन्ही नेत्यांची तोंडे दोन दिशांना होती. पण शनिवारी ते पुन्हा एकत्रित दिसल्याने काँग्रेसचा जीव भांड्यात पडला असेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.