Latest Update News : राजकारणात बड्या नेत्यांची हुजरेगिरी करत विरोधकांना धमकावण्याची बाबी आता नव्यानेच घडत आहेत असे नाही. मात्र आता जे घडत आहे ते सर्वांची काळजी वाढवणारे आहे. विरोधात असणारे सर्व जण भ्रष्टाचारी आहेत, त्यांना फक्त भीती दाखवून न सोडता तुरुंगात घातले पाहिजे, असे वादग्रस्त विधान रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी काही दिवसांपूर्वी केले आहे. काही नेत्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे भाजपची आधीच अडचण झाली आहे. आता सदाभाऊ खोत यांच्यासारखे भाजपच्या सहयोगी पक्षाचे नेतेही वादग्रस्त विधाने करत आहेत.
राजकीय नेत्यांच्या काही वादग्रस्त विधानांकडे प्रत्येकवेळी सर्वांचेच लक्ष जाईल, असे नसते. सध्या निवडणुकीचा हंगाम आहे. नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असतात, वादग्रस्त बोलत असतात, हास्यास्पद विधानेही करत असतात. सदाभाऊ खोत हे शेतकरी नेते समजले जातात. मात्र गेल्या काही वर्षांपासून त्यांचा नूर पालटला आहे. ते शेतकऱ्यांच्याच नव्हे तर भाजप (BJP) नेत्यांच्या संरक्षणासाठी सातत्याने समोर येत असल्याचे दिसत आहे. टीका, आरोप सभ्य भाषेतही केले जाऊ शकतात. महाराष्ट्रात भाषेची मर्यादा न पाळणाऱ्या सर्वपक्षीय नेत्यांची एक फळी निर्माण झाली आहे. त्यात सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांचाही समावेश होतो.
राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
विरोधात असणारे सगळे भ्रष्टाचारी आहेत, एकेकाला तुरुंगात घाला, भीती दाखवून सोडू नका, असे वादग्रस्त विधान सदाभाऊ यांनी केले होते. अशा विधानांचा भाजपला फायदा न होता नुकसानच होण्याची शक्यता अधिक आहे. विरोधकांवरच मुद्दाम ईडीचा वापर केला जातो, असा संदेश आता ग्रामीण भागातील लोकांपर्यंतही पोहोचला आहे. अशा परिस्थितीत ऐन निवडणुकीत असे बोलणे भाजपसाठी हानिकारक ठरू शकते. भाजपचे कर्नाटकातील नेते अनंत हेगडे (Anant Hedge) यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाने भाजपची डोकेदुखी प्रचंड वाढवली आहे. राज्यघटना बदलण्यासाठी भाजपला चारशेपेक्षा अधिक जागा द्या, असे ते म्हणाले होते. त्यानंतर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना जाहीर सभेत स्पष्टीकरण द्यावे लागले होते.
सदाभाऊ हे शेतकऱ्यांचे नेते म्हणून राजकारणात पुढे आले. ते शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आपला लढा कायम ठेवतील असे वाटत होते, मात्र ते सत्ताधाऱ्यांच्या बाजूला गेल्याचे चित्र दिसत आहे. शेतकऱ्यांसाठी कोण लढतो, हा खरेतर संशोधनाचा विषय ठरेल. आता सोयाबीनचा भाव पडलेला आहे. काही भागांतील कारखान्यांनी उसाचे बिल अद्याप दिलेले नाही. काही कारखान्यांनी गेल्या वर्षीची बिलेही उशीरा दिली आहेत. खते-कीटकनाशकांचे भाव प्रचंड वाढलेले आहेत. हमीभावाचा पत्ता नाही. अशा परिस्थितीत सदाभाऊ यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना बाजूला सारल्याचे चित्र निर्माण झाले. काही दिवसांपूर्वी ते असेही म्हणाले होते की, 'कुणी काहीही म्हटले तरी मी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना मानतो. काही झाले की ईडी मागे लावली जाते, असे लोक म्हणतात, पण मी म्हणतो ईडीची गती वाढवा. गडी एकतर आपल्यात आला पाहिजे, नाहीतर घाबरून मेला पाहिजे.'
सदाभाऊ यांनी कोणाला मानावे, हा त्यांचा प्रश्न आहे, तसे स्वातंत्र्यही प्रत्येकाला आहे. आता सदाभाऊ जे बोलले देवेंद्र फडणवीस आणि भाजपला (BJP) नुकसान होईल की फायदा, हे कुणीही सांगू शकेल. हुकूमशाही पद्धतीने कारभार करा असेच एक प्रकारे सदाभाऊ सांगत आहेत. देशाची राज्यघटना बदलणार, देशात हुकूमशाही येणार, असा प्रचार विरोधकांकडून भाजपच्या विरोधात केला जात आहे. सदाभाऊंसारखे नेते आपल्या वादग्रस्त विधानांनी त्याला दुजोरा देत आहेत का, असा संदेश समाजात जाण्याची शक्यता आहे. लोकसभेची निवडणूक महत्वाच्या टप्प्यावर आहे. अशावेळी अशी वादग्रस्त विधाने भाजपची डोकेदुखी वाढवू शकतात. विरोधकांपेक्षा सदाभाऊंसारख्या काही स्वकियांची विधानेच भाजपला हानिकारक ठरतील की काय, अशी शंका निर्माण झाली आहे.
फक्त विरोधकच भ्रष्टाचारी आहेत, असे नॅरेटिव्ह गेल्या काही वर्षांपासून तयार करण्यात आले आहे. भ्रष्टाचारी असलेला विरोधक आपल्या बाजूने आला की तो पवित्र झाला, असा समजही तयार करण्यात आला आहे. आमच्याकडे या अन्यथा तुरुंगात जा, असे देशव्यापी चित्र दिसत आहे. आता सदाभाऊंनी आपल्या विधानाने या समजाला आणखी मजबूत केले आहे. सत्ताधारी भाजपच्या एकाही नेत्याने अशा प्रकारचे विधान केल्याचे अद्याप तरी ऐकिवात नाही, मग सदाभाऊंना इतकी कसली घाई झाली असेल? अशी विधाने करण्यासाठी भाजपने सदाभाऊंना प्रोत्साहन दिले आहे, असे म्हणता येणार नाही, पण त्यांच्या विधानावर अद्याप कोणत्याही नेत्याने स्पष्टीकरण दिलेले नाही, हेही खरेच आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.