Padamsinh Patil : शरद पवारांविरोधात बंड, आमदारांचा रुद्रावतार, अन् पद्मसिंह पाटलांचा ‘गेम’

Padnasinh Patil Sharad Pawar Political Revolt in Maharashtra : शरद पवार यांचे विश्वासू सहकारी, राज्याचे माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांनी आज वयाची 84 वर्षे पूर्ण केली आहेत. प्रचंड क्षमता, लोकसंग्रह असूनही आणि संधी उपलब्ध असतानाही त्यांना मुख्यमंत्रिपदापासून वंचित राहावे लागले.
Dr. Padamsinh Patil
Dr. Padamsinh Patilsarkarnama

Dharashiv political leader : शरद पवार 1999 मध्ये दिल्लीला गेले, म्हणजे संरक्षणमंत्री झाले. दिल्लीच्या राजकारणातच रमण्याचा त्यांचा निर्णयही झाला होता. त्यांच्यामागे महाराष्ट्राची धुरा कोण सांभाळणार, असा प्रश्न होता. शरद पवार यांना राजकारणात अगदी सुरवातीपासून साथ देणाऱ्या, बळ देणाऱ्या नेत्याची मुख्यमंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता होती, मात्र तसे झाले नाही. त्यांची मुख्यमंत्रिपदाची संधी हुकली... वरून कठोर वाटणाऱ्या, पण आतून अगदी नारळासारखे मऊ असलेले नेते म्हणजे डॉ. पद्मसिंह पाटील! आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांनी वयाची 84 वर्षे पूर्ण केली आहेत.

प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी असलेले डॉ. पाटील यांनी 1974 मध्ये राजकारणात प्रवेश केला, त्या वर्षी त्यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली आणि विजयी झाले. ते आरोग्य सभापती झाले. त्या काळात शरद पवार (Sharad Pawar) युवक काँग्रेसमध्ये होते. डॉ. पाटील आणि शरद पवार यांची मैत्री त्यावेळेसपासून सुरू झाली. काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष यशवंतराव मोहिते यांनी 1978 मध्ये त्यांना उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. ते निवडून आले आणि राज्यमंत्री बनले. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. 1979 मध्ये डॉ. पाटील यांनी ढोकी (ता., जि. धाराशिव) येथील तेरणा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढवली. कारखाना त्यांच्या ताब्यात आला.

डॉ. पाटील यांच्या बेधडकपणाच्या चर्चा जिल्ह्यात, राज्यात अजूनही होत असतात. त्यांचा स्वभाव बेधडक असला तरी त्यांचे मन फार हळवे आहे, याचा अनुभव विरोधकांनाही आहे. मतदारसंघातील किंवा मतदारसंघाबाहेरील एखादी व्यक्ती काम घेऊन डॉ. पाटील (Dr. Padamsinh Patil) यांच्याकडे गेली आणि त्याचे काम झाले नाही, असे सहसा कधी होत नसे. मतदारसंघातून एखादे काम घेऊन कुणी आले आणि ते काम त्यांच्या मंत्रालयाशी संबंधित नसले की, डॉ. पाटील त्या माणसासोबत संबंधित विभागात जायचे आणि त्याचे काम करून घ्यायचे. त्याच्या जेवणापासून ते गावी परत जाण्यासाठी बसच्या तिकीटाचीही सोय ते करायचे. अशी कामे करताना त्यांनी आपला, विरोधक असा भेद कधीच केला नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

डॉ. पाटील यांच्याविषयीचा असाच एक किस्सा मोठा रंजक आहे. त्या काळात ग्रामीण भागात शाळा सुरू करण्याची गरज होती. आजच्यासारखी परिस्थिती नव्हती, हे आधी समजून घ्यावे लागेल. मला शाळा मंजूर करून द्या, असे म्हणत एक माणूस त्यांच्याकडे आला. डॉ. पाटील यांनी त्याच्याकडे प्रस्तावाची मागणी केली, मात्र शाळा सुरू करण्यासाठीचा प्रस्ताव किंवा अन्य कोणतीही कागदपत्रे त्याच्याकडे नव्हती. आता करायचे काय, असा प्रश्न डॉ. पाटील यांना पडला. त्या माणसाकडे एसटी बसचे तिकीट होते. डॉ. पाटील यांनी ते घेतले आणि त्यावर शिफारस, सही करून ते तत्कालीन शिक्षणमंत्र्यांकडे पाठवले. डॉ. पाटील यांनी पाठवले म्हटल्यानंतर शिक्षणमंत्र्यांनी यादीत त्या शाळेचे नाव घेतले आणि नंतर कागदपत्रांची पूर्तता करून घेतली होती.

Dr. Padamsinh Patil
Vijaykumar Deshmukh : देवेंद्र फडणवीसांना दिलेला मताधिक्क्याचा शब्द विजयकुमार देशमुख खरा करून दाखवणार?

शरद पवारांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादीची स्थापना केली, डॉ. पाटील त्यांच्यासोबत गेले. शरद पवार यांच्या राजकीय कारकीर्दीत संकटांच्या काळात डॉ. पाटील सावलीप्रमाणे त्यांच्या पाठिशी उभे राहिले. पाटील आता राजकारणात सक्रिय नाहीत. अजितदादा पवार (Ajit Pawar) आता शरद पवारांपासून वेगळे झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अजितदादांनी पाटील यांच्या हुकलेल्या मुख्यमंत्रिपदाचा उल्लेख केला. चर्चेत नसलेल्या किंवा फारसा अनुभव नसलेल्या नेत्याला मुख्यमंत्री कसे करायचे, यावरून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत गेल्या काही दिवसांपासून वाद-विवाद सुरू आहेत. त्या अनुषंगानेच अजितदादांनी डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या हुकलेल्या मुख्यमंत्रिपदाची आठवण काढली.

Dr. Padamsinh Patil
Lok Sabha Election 2024 : राज्यात 22 मतदारसंघात टक्का वाढला, तर 26 जागांवर कमी मतदान; आकडेवारी कोणाच्या पथ्यावर?

शरद पवार यांना 1991 मध्ये संरक्षणमंत्री म्हणून केंद्रात जावे लागले होते. शरद पवारांनंतर मुख्यमंत्री कोण, असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी बहुतांश आमदारांनी पद्मसिंह पाटील यांचे नाव सुचवले होते, त्यावर एकमत झाले होते. मात्र ऐनवेळी सुधाकरराव नाईक यांचे नाव समोर आले. मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नावाची चर्चाही नव्हती, असे अजितदादा कार्यकर्ता मेळाव्यात म्हणाले. सुधाकरराव नाईक ज्येष्ठ नेते होते, आम्हाला त्यांच्याबद्दल आदर आहे, आम्ही त्यांच्या हाताखाली काम केले आहे, कृपया याबाबत गैरसमज नसावा, असेही अजितदादा म्हणाले होते. 2004 ला आपल्याला नवखे म्हणायचे कारण नव्हते, हे अजितदादांना अधोरेखित करायचे होते.

सामाजिक समतोल

याबाबत शरद पवार यांनी 'लोक माझे सांगाती'मध्ये स्पष्टीकरण दिले आहे. संरक्षणमंत्री म्हणून जाताना महाराष्ट्राचे नेतृत्व सुधाकरराव नाईक यांच्याकडे का सोपवले, याबाबत त्यांनी सविस्तर लिहिले आहे. शरद पवार म्हणतात, ''बॅरिस्टर ए. आर. अंतुले वगळता 1975 नंतर मुख्यमंत्रिपद मराठा समाजातील नेत्यांनाच मिळाले होते. सामाजिक समतोल साधण्यासाठी त्यावेळी मुख्यमंत्रिपद मराठेतर नेत्याकडे जावे, असे मला वाटत होते. दुसरे म्हणजे, विदर्भाला मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली नव्हती. प्रादेशिक संतुलन राखण्यासाठी माझी सहानुभूती सुधाकररावांच्या बाजूने होती. 1990 मध्ये दिल्लीच्या आशीर्वादाने माझ्या विरोधात झालेल्या बंडात सुधाकररावांनी दिल्लीतून आलेल्या आदेशांना भीक न घालता माझे समर्थन केले होते, आमदारांनाही त्यात सहभागी करून घेतले होते. महाराष्ट्रातल्या आमदारांचा रुद्रावतार पाहून पक्षश्रेष्ठींना बंडखोरांना आवरावे लागले होते. त्यामुळे माझे विश्वासू सहकारी पद्मसिंह पाटील मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असूनही त्यांच्या पाठीराख्यांचा रोष पत्करून मी सुधाकररावांच्या पारड्यात त्यावेळी वजन टाकले होते.''

Dr. Padamsinh Patil
Priyanka Gandhi News : आदिवासींची इंदिरामाय,नंदुरबारने अनुभवला 25 वर्षांनी 'तो' क्षण !

पाटील आता थकले

राजकारण हा शक्यतांचा खेळ असतो. एकदा संधी हुकली की ती पुन्हा मिळेलच, असे नसते. पाटील यांच्याबाबतीत तसेच झाले. प्रचंड क्षमता, लोकसंग्रह, धडाक्यात कामे करण्याची वृत्ती असूनही त्यांना नंतर मुख्यमंत्रिपदाला गवसणी घालता आली नाही. आघाड्यांचे राजकारण सुरू झाल्यानंतर ती शक्यता मावळली. 2014 पासून पाटील राजकारणात सक्रिय नाहीत. त्यांची पुढची पिढी राजकारणात सक्रिय झाली आहे. त्यांचे पुत्र, माजी राज्यमंत्री रााणाजगजितसिंह पाटील यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपमध्ये प्रवेश केला. आता ते तुळजापूरचे आमदार आहेत. आमदार पाटील यांच्या सौभाग्यवती अर्चनाताई पाटील या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार होत्या. वयोमानानुसार पाटील आता थकले आहेत. मंत्री असताना आपल्या आईना पाठीवर बसवून तीन मजले पायऱ्या उतरवून डॉ. पाटील त्यांना फिरवून आणायचे. असे संस्कार त्यांनी आपल्या कुटुंबाला दिले आहेत. दोन मुले, सून, नातवंडे आता त्यांची काळजी घेत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com