
Mumbai News: उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली २०१४ मध्ये शिवसेनेने स्वबळावर लढून ६३ जागा जिंकल्या होत्या. म्हणजे मोदी लाटेतही यश बरे होते. त्यानंतर २०१९ मध्ये भाजपबरोबर युती करून पक्षाने ५६ जागा जिंकल्या. ज्या पक्षांच्या १९९५ मध्ये ७३ जागा होत्या, आज तो पक्ष २० वर येऊन ठेपला. याचा अर्थ काय काढायचा? खरेच शिवसेनेची वाटचाल मनसेच्या दिशेने सुरू आहे?
निवडणुकीत जय-पराजय होत असतात. स्वातंत्र्यानंतर अनेक लाटा आल्या अन् ओसरल्याही. हे चक्र थांबलेले नाही. देशाच्या राजकीय क्षितिजावर असा एखादा नेता येतो की त्याला लोक डोक्यावर घेतात. झंझावात सुरू होतो. देशाने इंदिरा लाट पाहिली. त्या लाटेनंतर खऱ्या अर्थाने मोदी लाट आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापूर्वी जे काही पंतप्रधान होऊ गेले ते पक्षाने जिंकलेल्या जागांमुळे किंवा आघाडीमुळे.
पण इंदिरा गांधी आणि नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी असे स्थान मिळवले की त्यांच्या नावाभोवती देशाचे राजकारण फिरत राहिले. मोदी लाटेत तर छोट्या-मोठ्या पक्षांचा पालापाचोळा झाल्याचे पाहण्यास मिळाले. छोट्या पक्षांमध्ये तर लढण्याचे बळच राहिले नाही. इकडे महाराष्ट्रातही २०१४ नंतर सर्वाधिक तोटा काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, मनसे आदींना झाला.
इथे शिवसेनेचा (Shivsena) वेगळा विचार करावा लागेल. अन्य सर्व पक्षांपेक्षा शिवसेना आणि भाजपची युती दोन अडीच दशके होती. ‘ही दोस्ती तुटायची नाय’ अशा आणाभाका दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी घेतल्या होत्या. तसे मात्र झाले नाही. २०१४ नंतर ठाकरेंची शिवसेना भाजपपासून खूपच दूर गेली. आता या दोन्ही पक्षांमध्ये काही झाले तरी समझोता होईल असे वाटत नाही. भले मंत्री चंद्रकांत पाटील म्हणत असतील की उद्धव ठाकरे यांनी युती करण्याबाबत विचार करावा किंवा त्यांनी आमच्याकडे यावे.
उद्धव आणि भाजप नेत्यांमध्ये भविष्यात म्हणजे मोदी-शहा असेपर्यंत तह होईल किंवा ते एकत्र येतील असे वाटत नाही. कारण त्यांना ठाकरेंच्या जागी भाजपला एकनाथ शिंदे सारखा नेता मिळाला आहे. शिवसेना आणि भाजप युती आजही अखंड आहे हे किमान भाजपला दाखविण्यासाठी पुरेसे आहे. ठाकरेंविना भाजपचे काहीही अडले नाही असे या निकालावरून लक्षात घ्यावे लागेल.
१९ जून १९६६ रोजी मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी स्थापन झालेल्या शिवसेनेचे संस्थापक शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे होते. शेवटपर्यंत ते पक्षाचे प्रमुख होते. त्यांच्या कार्यकाळातही पक्ष फुटला, कधी मोळी ढिली झाली, विस्कटलीही. परंतु बाळासाहेबांनी शिवसेनेला कधीही संपू दिले नाही. जे जे नेते फुटले त्यांचा समाचार त्यांनी आपल्या खास शैलीत घेतला. कार्यकर्त्यांना स्वाभिमानाने आणि ताठ मानेने उभे करण्यास शिकविले. आज बाळासाहेबांचा तो दरारा पक्षात राहिला नाही. कारण उद्धव हे आक्रमक नेते नाहीत.
ठाकरे घराण्यांची वेगळी अशी ठाकरे शैली आहे आणि त्या शैलीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackary) विरोधकांचा समाचार घेत असतात. नेहमीच्या निवडणुकीप्रमाणे यावेळी मोदी-शहांबरोबरच देवेंद्र फडणवीसांवरही त्यांनी टीकेचे प्रहार केले. महाराष्ट्र ढवळून काढला. लोकसभेप्रमाणे या वेळीही वाटत होते की आघाडीला यश मिळाले. युतीची गाडी ‘यार्डात’ जाते की काय? पण तसे काही झाले नाही. उलट शिवसेनेला कधी नव्हे इतक्या कमी जागा मिळाल्या आहेत.
या पूर्वीच्या एका लेखात म्हटले होते की जर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने ५० जागा मिळवल्या तरच या पक्षाचे काही खरे आहे अन्यथा शिवसेनेची मनसे होईल. वास्तविक या पक्षाची तशीच वाटचाल सुरू आहे की असे वाटू लागले आहे. जो पक्ष किमान पन्नास जागा निवडून आणू शकत होता तो पक्ष २० वर येऊन ठेपला आहे याचा अर्थ काय काढायचा? २०१४ मध्ये उद्धव यांच्या नेतृत्वाखाली अन् तेही स्वबळावर जागा लढवून त्यांनी ६३ जागा जिंकल्या होत्या, म्हणजे मोदी लाटेत हे यश खेचून आणले होते. त्याबद्दल त्यांचे कौतुकच करावे लागेल.
त्यानंतर २०१९ मध्ये भाजप (BJP)बरोबर युती करून पक्षाने ५६ जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर लोकसभेतही तशी कामगिरी म्हणावी बरीच म्हणावी लागेल. तेव्हा त्यांच्या गडातच वाताहत झाली होती. आता तर हा पक्ष २० वर आला आहे. २८८ पैकी फक्त २० जागा याचा अर्थ काय लावायचा. अर्थात या अपयशाचे खापर या पक्षाचे ‘फायर ब्रँड’ प्रवक्ते संजय राऊत भाजपवर फोडून मोकळे होतील. निकालानंतर आरोप-प्रत्यारोप होत राहतात. पण हल्ली आत्मपरीक्षणाच्या भानगडीत कोणी पडत नाही. नेमके नेत्याचे आणि कार्यकर्त्यांचे काय चुकते यावर बोट ठेवणारे कुठल्याच पक्षात दिसत नाहीत. फक्त एकमेकांवर खापर फोडण्यातच प्रत्येक पक्षातील नेते मग्न असतात.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर शिवसेना अधिक खिळखिळी झाली हे वास्तव आहे. यापूर्वी तसे चित्र कधीही पाहण्यास मिळाले नाही. मराठी माणसाला न्यायाबरोबरच शिवसेना पुढे हिंदुत्ववादी झाली अन् याच मुद्द्यावर पक्षाने विजय मिळवले. भाजप आणि शिवसेना हे खऱ्या अर्थाने हिंदुत्ववादी पक्ष आहेत असे म्हटले जायचे. आता तर शिवसेनेचा हा मुद्दा मागे पडल्याचे दिसून येत आहे. उलट शिंदेंनी विकासकामांबरोबर हिंदुत्वाची आपल्या शिवसेनेची धार कायम असल्याचे जनतेच्या मनात रुजविले आहे. दोन्ही काँग्रेसबरोबर निवडणुका लढताना शिवसेनेला मराठी आणि हिंदुत्वाच्या मुद्याचा विसर पडल्याचे लोकच बोलत आहेत.
शिवसेना आज, काल आणि उद्याचा विचार करायचा तर पक्षाची भविष्यातील कामगिरी कशी असेल? मुंबई महापालिका निवडणुकीत ती जिंकेल का? महायुतीशी टक्कर देईल का? असे अनेक प्रश्न आहेत. दिवसेंदिवस जे गड होते तेथेच अस्तित्व संपुष्टात येत आहे. मग इतर ठिकाणी पक्ष कधी रुजणार? आजच्या राजकारणाचा विचार केला तर लोकांना भावनिक राजकारणापेक्षा विकासकामांवर बोललेले आवडते. पक्ष सत्तेत असताना आम्हाला काय देतो? लोककल्याणाच्या योजना कोणत्या आणतो? शैक्षणिक धोरण कसे आहे याबाबत अधिक विचार करताना दिसतो.
एक काळ असा होता कडवे शिवसैनिक पक्षासाठी जीव द्यायला तयार असायचे. आज तसे होताना दिसत नाही. बदलत्या काळात आता रणनीती बदलावी लागेल. दररोज वाहिन्यांसमोर येऊन चिमण्यांसारखा ‘चिवचिवाट’ करून शिवसेनेच्या पदरात काहीही पडणार नाही. राज ठाकरे, गजानन कीर्तीकर, नारायण राणे, रामदास कदम, गणेश नाईक, एकनाथ शिंदे, बाळा नांदगावकर असे कितीतरी लढाऊ नेते पक्ष सोडून गेले त्याचे नुकसानही पक्षाला आज सहन करावे लागत आहे. जागा कमी होण्याचे हेही एक कारण आहे.
आता शिवसेना पुन्हा सत्तेवर कधी येणार आणि या पक्षाचा मुख्यमंत्री कधी होणार? याचा अंदाज बांधता येणे अवघड आहे. पुन्हा पक्षाची बांधणी करावी लागणार आहे. राज्यात परप्रांतीयांचे मोठे आक्रमण आहे. त्यांची ताकद वाढत आहे. मराठी माणसाचा शहरात वाली राहिला नाही. एके काळी ज्या शिवसेनेचा आधार वाटायचा तो राहिला नाही. ज्या मनसेकडूनही अपेक्षा केल्या त्यांचेही रंग बदलतात. कधी मराठी कधी हिंदुत्व, अशी शिवसेना-मनसेची धरसोड सुरू आहे. त्यामुळे हळूहळू या दोन्ही पक्षांची शक्ती क्षीण होऊ लागली आहे. जे स्वत:च्या मुलाला निवडून आणू शकत नाहीत ते म्हणतात मला सत्ता देऊन बघा... याने काही साध्य होणार नाही. ठाकरे हा ‘महाराष्ट्र ब्रॅंड’ आहे तो टिकला पाहिजे हे खरे आहे. पण तो टिकवायचा कोणी हा मूळ प्रश्न आहे.
ठाकरे हा महाराष्ट्राचा ‘ब्रँड’ आहे असे या पूर्वीच्या लेखात म्हटले होते. पण, आता हा ‘ब्रँड’ टिकविण्याचे आव्हान उद्धव ठाकरे यांच्यासमोर आहे. १९९५ ते २०२४ पर्यंत ‘ठाकरे ब्रँड’च्या नावाखाली लढविलेल्या निवडणुकांचा आलेख जर पाहिला तर चढ-उतार राहिले. तरीही समाधानकारक कामगिरी होती. मात्र, २०२४ च्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने लढविलेल्या जागा आणि जिंकलेल्या जागांचा विचार केला हा आकडा खूपच कमी झालेला दिसून येत आहे.
२०१४ आणि २०१९ च्या तुलनेत शिवसेनेचे गड ढासळल्याचे दिसून येत आहे. ज्या शिवसेनेची भक्कम तटबंदी होती त्या कोकण, मुंबई, ठाणे, पालघर आणि मराठवाड्यात पक्षाची कामगिरी सुमार झाली आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने एके काळी ज्या नेत्यांची आणि शिवसेनेची ज्या ठिकाणी ताकद होती तेथे ठाकरेंच्या शिवसेनेला मान वर करू दिली नसल्याचे चित्र आहे.
१९७२ - ०१
१९९० - ५२
१९९५ - ७३
१९९९ - ६९
२००४ - ६२
२००९ - ४४
२०१४ - ६३
२०१९ - ५६
२०२४ - २० (पक्षफुटीनंतर)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.