Maharashtra Politics: रेडा दूध देत नाही, हे त्रिकालाबाधित सत्य, मात्र काहींना ते कळलेच नाही...

Shivsena mla Disqualification Case: आजचा संदेश - महाशक्तीच्या पंखांखाली आसरा घेतला की सर्वार्थाने संरक्षण मिळते
Uddhav Thackeray vs Eknath Shinde
Uddhav Thackeray vs Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

ग्रामीण भागात सातत्याने कानावर पडणारा, टोणगा दूध देत नाही, हा वाक्प्रचार आज अनेकांना आठवला असेल. शिवसेना फुटली, त्यानंतर ठाकरे आणि शिंदे या दोन गटांत सर्वच पातळ्यांवर संघर्ष सुरू झाला. प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे गेले. सर्वोच्च न्यायालयातही गेले. विधानसभा अध्यक्षांनी सुनावणी घेण्यासाठी केलेल्या टाळाटाळीची इतिहासात नोंद होईल.

सर्वोच न्यायालयाने कानपिचक्या दिल्यानंतर 16 आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष 'अॅक्शन मोड'वर आले आणि आज अपेक्षित असा निकाल लागला. शिंदे गटाचे ते 16 आमदार अपात्र ठरले नाहीत. शिवसनेतून बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे आणि 40 आमदार सुरतमार्गे गुवाहाटीला गेले होते. तेथे आमदारांशी संवाद साधताना शिंदे म्हणाले होते, महाशक्ती आपल्या पाठिशी आहे, घाबरू नका...! शिंदे खरेच बोलले होते.

कायदेशीर बाबींचा उहापोह दोन्ही बाजूंनी होत आहे. आपलीच बाजू खरी, असा दावा दोन्ही गटांकडून केला जात आहे. या बाबी थोड्या बाजूला ठेवून महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर झालेल्या घडामोडी, युतीच्या नेत्यांनी, शिंदेंच्या आमदारांनी केलेली वक्तव्यांवर नजर टाकली की परिस्थिती लक्षात येईल. इतके कशाला, निकालाच्या एक दिवस आधीपासून सत्ताधारी शिंदे गटाचे नेते आणि आमदारांच्या प्रतिक्रिया पाहिल्या तरी बऱ्याच बाबींचा उलगडा होईल. आपल्या मागे महाशक्ती आहे, असे एकनाथ शिंदे गुवाहाटीत म्हणाले होते, त्यावेळीच पुढे काय होणार याचा अंदाज राजकीय निरीक्षकांना आला होता. अगदी तसाच निकाल आला आहे. खरे कोण होते, हे आता जनतेच्या न्यायालयातच ठरणार आहे.

निकालाच्या दोन दिवस आधी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले होते. त्यावर ठाकरे गटाने आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणात मुख्यमंत्री शिंदे हे आऱोपी असून न्यायाधीश म्हणजेच विधानसभा अध्यक्ष त्यांची भेट कशी घेऊ शकतात, असा आक्षेप शिवसेनेच्या ठाकरे गटाने घेतला आहे. या भेटीवरून नार्वेकर हे टीकेचे धनी झाले. ठाकरे गटासह महायुतीतील अन्य पक्षांनीही नार्वेकर यांचा खरपूस समाचार घेतला.

आता प्रश्न आहे की पुढे काय होईल? पुढे काय होईल, यापेक्षा मागे काय सुटले आहे, हे पाहणे अधिक महत्वाचे आहे. भाजपला शिवसेना संपवायची होती, ती त्यांनी संपवली, असे सध्या कागदोपत्री तरी दिसत आहे. माझे हिंदुत्व शेंडी-जाणव्याचे नाही, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वातंत्र्यलढ्यात काय योगदान होते, असे प्रश्न उद्धव ठाकरे यांनी 2019 नंतर सातत्याने उपस्थित केले होते. यापुढील वाटचाल आजोबा प्रबोधनकार ठाकरेंच्या मार्गाने सुरू राहील, असा संदेश उद्धव ठाकरे यांनी याद्वारे दिला होता. उद्धव यांनी विचारलेले दोन्ही प्रश्न आणि त्यांचे प्रबोधनकारांच्या मार्गावर चालणे भाजपसाठी धोक्याची घंटा होती. माझे हिंदुत्व सर्वसमावेशक आहे, ही उद्धव ठाकरे यांची भूमिकाही भाजपला धडकी भरवणारी होती. त्यामुळे शिवसेनेची वाताहत करण्यात आली, हे आता लपून राहिलेले नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Uddhav Thackeray vs Eknath Shinde
Santosh Bangar: मोदी पुन्हा पंतप्रधान झाले नाही तर गळफास घेणार; शिंदेंच्या आमदारानं केला पण

युती तोडल्याचा राग होताच, त्यात...

आता उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचे भवितव्य मतदारांच्या हाती आहे. उद्धव यांचे मुख्यमंत्रिपद गेल्यानंतर त्यांच्याबाबत राज्यात सहानुभूतीची लाट निर्माण झाली होती. ती ओसरावी, यासाठी भाजप आणि शिंदे गटाच्या शिलेदारांनी आटोकाट प्रयत्न केले. उद्धव ठाकरे यांच्यावर सातत्याने टीका करण्यात आली. उद्धव मुख्यमंत्री झाले आणि कोरोनाची लाट सुरू झाली. त्यानंतर ते आजारी पडले. असे असतानाही त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. कोरोनाकाळत त्यांनी केलेल्या कामाची खुद्द केंद्र सरकारनेही दखल घेतली. त्यांची लोकप्रियता प्रचंड वाढली. भाजपशासित काही राज्यांत कोरोनाकाळात हाहाःकार माजला होता. काही राज्यांत मृतदेहांची विटंबना झाली. महाराष्ट्रात असे काही झाले नाही. उद्धव ठाकरेंच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे भाजपला धडकी भरली. युती तोडल्याचा राग होताच, त्यात उद्धव ठाकरे यांच्या कामगिरीची भर पडली आणि भाजपने विविध माध्यमांचा वापर करून शिवसेनेत फूट पाडली. विविध प्रकरणांत अडकलेले शिवसेनेतील अनेक आमदार आणि खुद्द एकनाथ शिंदेही याला बळी पडले.

'नॅरेटिव्ह' बदलण्यात शिंदेंना यश...

आजच्या निकालामुळे उद्धव यांच्याबाबत सहानुभूती आणखी वाढण्याची शक्यता आहे, हे खरे असले तरी त्याचे मतांमध्ये रुपांतर करता येईल, अशी यंत्रणा उद्धव ठाकरे यांच्याकडे किंवा महाविकास आघाडीकडे आहे का? हा खरा प्रश्न आहे. यंत्रणा असेलही, पण ती काम करताना अद्याप तरी दिसलेली नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी सामान्य माणसाला सत्तेत वाटा मिळवून दिला. अगदी रिक्षाचालक, जीपचालक अशा लोकांना त्यांनी आमदार, खासदार, मंत्री केले. पण ते बिनबुडाच्या तांब्यासारखे निघाले. शिवसेनेत बंड करणाऱ्यांना शिवसैनिक निश्चितपणे धडा शिकवतात. मात्र यावेळी महाशक्तीच्या मदतीने शिंदे गटाने हे 'नॅरेटिव्ह' बदलण्यात मोठ्या प्रमाणात यश मिळवले आहे.

किळसवाण्या राजकारणाला जनता कंटाळली..

आपल्या पंखांखाली येणाऱ्यांना महाशक्ती सर्वार्थाने संरक्षण देते, असा संदेश आजच्या निकालाने जाऊ शकतो. त्यामुळे आता बारी काँग्रेसची तर नाही ना, अशी शंका निर्माण होत आहे. काँग्रेसचेही काही नेते काठावर आहेत. ते कधीही बाजू बदलू शकतात. आजच्या निकालामुळे बाजू बदलण्याची त्यांची इच्छा प्रबळ होईल आणि काही नेते म्हणतात तसे राज्यात लवकरच आणखी एक भूकंप होईल, अशी शक्यता आहे. काँग्रेसचे काही दिग्गज नेते भाजप प्रवेशासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असल्याची चर्चा आहे, पण ते योग्य संधीची वाट पाहात आहेत. आजचा निकाल हा त्यांच्यासाठी योग्य संधी ठरण्याची शक्यता आहे. फोडाफोडीच्या किळसवाण्या राजकारणाला जनता कंटाळली आहे का? किंवा जनतेला याच्याशी काही देणेघेणे नाही, हे आगामी निवडणुकांच्या निकालानंतर दिसून येईल.

Edited by: Mangesh Mahale

Uddhav Thackeray vs Eknath Shinde
MLA Disqualification Result: सत्तासंघर्षात उद्धव ठाकरेंना 'या' चुका भोवल्या...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com