संजय परब -
Mumbai News : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रतेचा निकाल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या विरोधात दिला आणि हे अगदी अपेक्षित होते. विधानसभा अध्यक्ष यांनी पक्षपात करता कामा नये, अशी अपेक्षा असली तरी ते कुठल्या तरी पक्षाचे असतात.
यामुळे ते पक्षाच्या विरोधात जाऊन निकाल देऊ शकण्याची शक्यता नाही. शेवटी तसेच झाले. निकालाच्या आधी दोन दिवसांतील घटनाक्रम लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल लागणार असे दिसत होते. शनिवारी रात्री उशिरा शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट झाली आणि लगेच दुसऱ्या दिवशी शिंदे व नार्वेकर भेट झाली.
लोकसभा निवडणूक तोंडावर असताना हा निकाल येत होता आणि तो सत्ताधारी भाजप युती सरकारच्या विरोधात जाईल, असे अपेक्षित नव्हते. तसे झाले नसते तर शिंदे शिवसेनेसह भाजपला सुद्धा मोठा फटका बसला असता. भाजपच्या दृष्टीने लोकसभा निवडणूक अतिशय महत्वाची असून यात त्यांना कोणताही धोका पत्करायचा नाही.
याचमुळे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची शिवसेना सोबत असताना त्यांनी अजित पवार यांना सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस फोडायला लावून तीन पक्षांचे सरकार बनवले. महाराष्ट्रातील ४८ पैकी ४५ जागा जिंकण्याचे भाजपचे लक्ष्य असताना आमदार अपात्र निकालाबाबत त्यांचे विधानसभा अध्यक्ष कोणताही धोका पत्करतील, अशी चिन्हे नव्हती आणि शेवटी तसेच झाले.
आता निकालासंबंधी विरोधक काय बोलतात, घटना विशेषक अभ्यासक यांचे मत काय आहे, याचा फारसा विचार न करता सत्ताधारी भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष लोकसभेच्या तयारीला लागतील. याचवेळी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील केल्यास त्याचाही सामना करण्याची तयारी सत्ताधाऱ्यांनी ठेवली आहे. या दरम्यान न्यायालयाचा निकाल लौकर येईल, याबाबत काहीच खात्री देता येत नसल्याने लोकसभा निवडणूक झालेली सुद्धा असेल आणि त्याचा काही परिणाम भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांवर होणार नाही.
राहुल नार्वेकर(Rahul Narwekar) यांच्या निकालाने आणखी एक गोष्ट निश्चित झाली आहे आणि ती म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा फुटीच्या विरोधातील अपिलावर पुढे फारसा काही दिलासा मिळेल, असे दिसत नाही.
या निकालाचा देशाच्या राजकारणात दूरगामी परिणाम होईल, असे नार्वेकर यांनी निकाल देण्याआधी काही तास अगोदर सांगितले होते. याचा अर्थ एकच आहे तो म्हणजे भाजपने विरोधी पक्ष कितीही आणि कसेही फोडले तरी त्यांच्या दृष्टीने काही फरक पडत नाही. त्यांना हवे तसेच होणार आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
शिवसेना (Shivsena) पक्षाची घटना अनधिकृत ठरवत आणि उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रमुख म्हणून एकनाथ शिंदेंवर केलेली कारवाई अमान्य करत नार्वेकर यांनी उबाठा शिवसेनेच्या विरोधात निकाल दिला. विशेष म्हणजे यासाठी निवडणूक आयोगाचा दाखला दिला गेला. 23 जानेवारी 2018 रोजी शिवसेनेत अंतर्गत निवडणूक झाली नाही, निरीक्षण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नोंदवलं आहे. 21 जून 2023 रोजी शिवसेनेत दोन गट पडले.
शिवसेनेत दोन गट पडल्याचं 22 जून रोजी लक्षात आलं. नेतृत्त्वाची रचना तपासण्यापुरताच पक्षघटनेचा आधार असून खरी शिवसेना कुणाची हे ठरवण्याचा अधिकार फक्त मलाच, असं विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट करत आपल्या निकालाचे समर्थन केले. हा सर्व प्रकार म्हणजे हा निकाल उद्धव ठाकरे यांच्या विरोधात जाणार होता, हे आधीच दिसून आले होते.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.