
Mumbai Political News : राज्यात आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आल्या असल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. सर्वच राजकीय पक्षांची निवडणुकीमुळे लगीनघाई सुरु आहे. त्यातच गेल्या काही दिवसापासून मनसे व उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यामुळे राजकीय घडामोडीना वेग आला आहे.
गेल्या काही दिवसापासून दोन्ही बाजूंच्या पदाधिकाऱ्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत, स्थानिक पातळीवरील दोन्ही ठाकरे बंधुंच्या चाहत्यांपर्यंत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीविषयी सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
पण संदीप देशपांडे मात्र सातत्याने आक्रमक भूमिका घेत आहेत. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या प्रक्रियेत त्यांच्या वक्तव्याने मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे. विशेषतः राज ठाकरे यांनी युतीबाबत मनसेच्या कोणत्याच नेत्याने वक्तव्य करू नये, अशी तंबी दिली आहे. त्यानंतरही देशपांडे आक्रमक भूमिका घेत असल्याने चर्चेला उधाण आले आहे.
शिवसेनेच्या वर्धापनदिन मेळाव्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) युतीबाबत सकारात्मक असल्याचे दिसत आहे. तशी त्यांनी तयारी देखील सुरु केली आहे. मात्र, या सर्व त्यांच्या भूमिकेवर संदीप देशपांडे सातत्याने आक्षेप घेत आहेत.
विशेषतः त्यांनी संजय राऊत यांना आक्रमकपणे तोंड देत अंगावर वाद ओढवून घेतला आहे. त्यामुळे देशपांडे अशा प्रकारे वादग्रस्त वक्तव्य करीत असल्याने मनसेला युती करायची आहे का नाही? याविषयी संशय व्यक्त केला जात आहे.
'युतीबद्दल दोन्ही पक्षप्रमुख निर्णय घेतील, ताटातल्या चमच्याने ताटात राहावे’, अशी टीका संदीप देशपांडेंनी यांनी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर केली होती. यावर राऊत यांनी देशपांडे हे नवे नेते आहेत, त्यांनी संयमानी बोलले पाहिजे, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर तरी देशपांडे हे वादग्रस्त वक्तव्य टळतील असे वाटत होते. मात्र, त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर टीकास्त्र करणे सुरूच ठेवले आहे. त्यामुळे येत्या काळात दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
त्यातच संदीप देशपांडे यांनी आणखी एक पोस्ट केली आहे. 'होय, आम्ही नवीन आहोत, पण कधी ‘केम छो वरळी’ म्हणून कोणाचे पाय चाटले नाहीत. ‘जिलेबी अने फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ असे कधी म्हटलं नाही. मुस्लिमांची मतं मिळवण्यासाठी 20 हजार केसेस आपल्याच भावाच्या कार्यकर्त्यांवर टाकल्या नाहीत. आम्हाला अभिमान आहे की आम्ही नवीन आहोत. तुम्ही जुने असून काय उपटली?” असे पोस्टमध्ये म्हटले आहे.
संदीप देशपांडेंच्या या पोस्टमुळे मनसे व ठाकरे गटातील तणाव आणखीन वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आता ठाकरे गटातील नेते, विशेषतः संजय राऊत यावर काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर राजकीय विश्लेषकांच्या मते, संदीप देशपांडे यांची ही भूमिका केवळ व्यक्तिगत मत नसून, मनसेची अधिकृत भूमिका असेल, तर मनसे-ठाकरे गट युतीचे दार जवळपास बंद झाल्याचे मानले जाऊ शकते.
महत्त्वाची बाब म्हणजे मनसे आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष अशा दोन्ही बाजूंच्या पदाधिकाऱ्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत, स्थानिक पातळीवरील दोन्ही ठाकरे बंधुंच्या चाहत्यांपर्यंत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीविषयी सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. पण संदीप देशपांडे मात्र सातत्याने आक्रमक भूमिका घेत आहेत. त्यामुळे नक्की मनसेची भूमिका काय आहे हे स्पष्ट होत नाही.
ठाकरे बंधू यांच्यातील संभाव्य युतीबाबतही चर्चांना उधाण आले आहे. मात्र, या दोघांमध्ये प्रत्यक्ष युती होणार की नाही, याबाबत अजूनही कोणताही अधिकृत निर्णय किंवा घोषणाच झालेली नाही. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीचा सस्पेन्स सध्या तरी कायम आहे.
राजकीय निरीक्षकांच्या मते, राज्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही युती फार महत्त्वाची ठरू शकते. पण उद्धव आणि राज यांच्यातील पूर्वीच्या मतभेदांमुळे ही युती कितपत शक्य आहे, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.