
Mumbai News : आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकरच होणार असल्याने राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. या निवडणुकीची तयारी सर्वच पक्षाने सुरु केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची रणनीती ठरविण्याबाबत खासदार व आमदार यांची बैठक मुंबईतील ताज लँड्स या हॉटेलवर बोलवली होती. त्याचवेळी या नेत्यांसाठी डिनर पार्टी देखील आयोजित करण्यात आली होती. यावेळी मनसेसोबतची युती होईल किंवा नाही. मात्र, येत्या काळात एकट्याने लढण्याची तयारी ठेवा असा, कानमंत्र उद्धव ठाकरे यांनी आमदार-खासदारांच्या बंद दरवाजामागे झालेल्या बैठकीत दिला आहे.
आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दृष्टीने ही बैठक महत्वपूर्ण मानली जात आहे. या बैठकीत महापालिका निवडणुकांबाबत ठरलेल्या रणनीतीची माहिती देण्यात आली. ही बैठक पक्षाच्या एकात्मता आणि निवडणूक तयारीत धार आणण्यासाठी महत्वपूर्ण मानली जात आहे. यावेळी “डिनर डिप्लोमसी”च्या माध्यमातून पक्षाचे महत्त्वाचे नेते एकत्र आणून भविष्याची स्पष्ट दिशा ठरवण्यात आली. या बैठकीमुळे एकाच वेळी पक्षातील आमदार-खासदारांना सूचना देण्यात आल्या.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सध्याच्या घडीला पक्षसंघटनाला स्थिरता देण्यावर भर दिला आहे. त्यासोबतच येत्या काळात होत असलेल्या निवडणुकीत स्थानिक स्तरावर यश मिळवणाच्या दृष्टीने काही योजना आखण्यात आल्या आहेत. त्याची विस्तृतपणे माहिती या बैठकीवेळी देण्यात आली. त्याचा फायदा येत्या निवडणुकीत पक्षाला कशा पदतीने होईल, याबाबत सविस्तर चर्चा यावेळी करण्यात आली. त्याशिवाय काही आमदार, खासदारानी यावेळी ग्रामीण भागातील अडचणी सांगितल्या.
येत्या काळात होत असलेल्या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी संघटनात्मक तयारी, धोरण व समन्वय यावर भर देण्यात येणार आहे. या सर्व बाबींचा फायदा येत्या काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत होणार आहे. त्यासोबतच येत्या काळात सर्वत्र चाचपणी करण्यात येणार आहे. त्याबाबतचा अहवाल महिनाभरात प्राप्त झाल्यानंतर मनसेसोबत (MNS) युती होईल की स्वबळावर निवडणूक लढायची याबाबचा निर्णय पुढील महिन्यांत स्पष्ट होईल, असेही यावेळी सांगण्यात आले.
आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सर्वानी एकदिलाने कामाला लागले पाहिजे. लोकसभा निवडणुकीत मोठे यश मिळाले. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतदान वाढल्याचा फटका बसला आहे. त्यामुळे येत्या काळात होत असलेलया निवडणुकीत झालेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळून कामाला लागा अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिल्या.
येत्या काळात संसदेचे व विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन होणार आहे. त्यासाठी सत्ताधाऱ्यांना कसे कोंडीत पकडायचे याबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी राज्य सरकारला विविध मुद्द्यावर घेरण्याची संधी चालून आली आहे. त्यानुसार प्रबळ विरोधी पक्ष म्हणून येत्या काळात राज्य सरकारला धारेवर धरण्याची रणनीती देखील सांगितली. त्यासोबतच संसदेत देखील खासदारानी केंद्र सरकारची विविध मुद्दयांवरून कोंडी केली पाहिजे असे स्पष्ट केले.
मुंबई महापालिका निवडणुकीकडे लक्ष केंद्रित करा. त्या अनुषंगाने पक्षबांधणी करुन कामाला लागा. युती होईल किंवा होणार नाही, मात्र एकट्याने लढण्याची तयारी ठेवा. त्यासोबतच संघटनात्मक वाढीसाठी प्रत्येकांनी लक्ष देण्याच्या सूचना उद्धव ठाकरे यांनी आमदार, खासदाराना दिल्या आहेत.