Mumbai : प्रचंड मोठ्या गर्दीची वज्रमूठसभा मुंबईत सोमवारी झाली. या सभेत महाविकास आघाडीचे सर्व नेते व्यासपीठावर उपस्थित होते. सर्व नेत्यांची जोरदार भाषणे झाली. सभेचे मुख्य आकर्षण होते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. ठाकरे काय बोलणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून होते.
ठाकरे यांनी भाषणाची सुरवात हिंदू बंधु-भगिनी आणि मातांनो अशी केली. ही सुरवात अगदी शिवसेना स्टाईलची होती. ही सभा मुळातच महाविकास आघाडीची न वाटता शिवसेनेची वाटली. त्याची चर्चा लगेचच सुरू झाली. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसला ठाकरे यांची ही भाषा चालणार आहे का? हा या चर्चेचा मुख्य भाग होता.
याआधी छत्रपती संभाजीनगर व नागपूर येथे झालेल्या वज्रमूठ सभेतदेखील उद्धव ठाकरे यांचेच प्रमुख भाषण झाले. या दोन सभा जशा विराट झाल्या तशाचप्रकारे मुंबईतल्या सभेला प्रचंड गर्दी होती. या सभेची तयारी करण्याची प्रमुख जबाबदारी शिवसेनेकडे होती.
सभेची तयारी जोरदार होती. सभेच्या ठिकाणी काँग्रेस व राष्ट्रवादीचे झेंडे होते. मात्र. त्यात शिवसेनेच्या भगव्याची संख्या लक्षणीय होती. काँग्रेस व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देखील या सभेला उपस्थित होते. त्यामुळे ठाकरे यांच्या त्या वाक्याची चर्चा प्रामुख्याने झाली.
ठाकरे यांनी आपल्या भाषणात बाबरी मशीदीच्या संदर्भाने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा दाखला दिला. या निमित्ताने बाबरी मशीद पाडल्याच्या घटनेचे आणि त्यावेळी बाळासाहेबांनी केलेल्या वक्तव्याचे समर्थन केले.
भाषणात ठाकरे यांनी हिंदुत्वाचे थेट समर्थन केले. मात्र, भाजपाच्या हिंदुत्वापेक्षा आमचे हिंदुत्व वेगळे आहे, असे त्यांनी सांगितले. ठाकरे यांनी केलेल्या या उल्लेखामुळे महाविकास आघाडीतील काँग्रेस व राष्ट्रवादीची अडचण होण्याची शक्यता आहे.
आजची सभा आणि ठाकरे यांचे मुख्य भाषण पाहिले तर आघाडीचे खरे नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्याकडेच असल्याचे आज पुन्हा एकदा स्पष्ट झाले. ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे साडेतीन वर्षापूर्वी राज्यात सरकार अस्तित्वात आले होते. दहा महिन्यांपूर्वी ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळले. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने ठाकरे यांना पायउतार व्हावे लागले.
मागोमाग ठाकरे यांच्याकडून शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्हदेखील गेले. शिवसेना फुटल्यामुळे ठाकरे यांचा एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच भाजपावर प्रचंड राग होता. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेतृत्व जाणीवपूर्वक ठाकरे यांच्याकडे देण्यात आल्याचे दिसत आहे. मात्र, ठाकरे यांची हिंदुत्वाची भूमिका आणि आघाडीतील सर्व नेते एकत्र व्यासपीठावर असताना त्यांची भाषणातील हिंदुत्वाची भाषा दोन्ही काँग्रेसला अडचणीची ठरण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.