Political News : सत्ता टक्केवारीसाठीच असते का..? सत्ताधारी नेत्यांनीच उलगडले रहस्य

Abdul Sattar Vs Hemant Patil : मंत्री अब्दुल सत्तार आणि खासदार हेमंत पाटील यांच्यातील खडाजंगी राज्याच्या परंपरेला न शोभणारी...
Sunil Kamble, Hemant Patil, Abdul Sattar
Sunil Kamble, Hemant Patil, Abdul SattarSarkarnama

Maharashtra News : राजकारण काय असते, ते कशासाठी केले जाते, निवडणूक जिंकण्यासाठी प्रचंड खर्च का केला जातो, काहीही कारणे देऊन पक्षांतर का केले जाते, काही नेत्यांना कायम सत्तेत राहण्याची घाई का असते..? नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी, विकासकामे करण्यासाठी..? नाही, हे सफेद झूठ आहे..! नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात सत्ताधारी शिंदे गट आणि भाजपचे आमदार, खासदार आणि मंत्र्यांनी दाखवलेल्या 'गुणां'मुळे राजकारणाबद्दल सामान्य नागरिकांच्या मनातील किळस आणखी वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.

नवीन वर्षात देशासह राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडणार आहे. लोकसभेची निवडणूक (Lok Sabha Elelction) तोंडावर आली आहे. त्यापाठोपाठ काही महिन्यांनंतर राज्यात विधानसभेची निवडणूक (Assembly Election) होणार आहे. त्यानंतर काही वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होऊ शकते. तत्पूर्वी, शिवसेनेच्या (Shiv Sena) 16 आमदारांच्या अपात्रता प्रकरणाचा निकाल येणार आहे. त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) फुटीवरही सुनावणी सुरू झाली आहे. 2019 च्या निवडणुकीनंतर अनपेक्षित राजकीय घडामोडी घडल्या. आता 2024 आले तरी त्याच घडामोडींची चर्चा सुरू आहे, त्यावरूनच आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यात नागरिकांचे दैनंदिन प्रश्न मागे पडलेले आहेत. राजकीय घडामोडींची चर्चा रोजच चघळायला मिळत असल्याने नागरिकही आपले प्रश्न विसरून गेले की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

Sunil Kamble, Hemant Patil, Abdul Sattar
NCP Satara News : राष्ट्रवादीच्या खासदारांचे रावसाहेब दानवेंना पत्र; म्हणाले, 'अमृत भारत योजनेचा...'

नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्याची नको तशी सुरुवात केली कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार यांनी. स्वतःच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी सिल्लोड महोत्सव आयोजित केला होता. त्यात एकेदिवशी गौतमी पाटील यांच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गौतमी पाटील यांचा कार्यक्रम आणि प्रेक्षकांची हुल्लडबाजी हे समीकरणच झाले आहे. सिल्लोडलाही तेच झाले. हुल्लडबाजी करणाऱ्यांना नियंत्रित करण्यासाठी मंत्री सत्तार यांनी आक्षेपार्ह भाषा वापरली. कुणालाही आवडणार नाही, अशा भाषेचा, उदाहरणांचा त्यांनी वापर केला. त्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सत्तार यांना उपरती झाली. तोपर्यंत व्हिडिओ ऱाज्यभरात व्हायरल झाला आणि प्रचंड छी थू झाली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नव्या वर्षाच्या पहिल्या आठवड्याचा नको तसा 'दणकेबाज' समारोप करण्यात मंत्री अब्दुल सत्तार होतेच, त्यांना 'मोलाची' साथ मिळाली ती त्यांच्याच पक्षाचे हिंगोलीचे वादग्रस्त खासदार हेमंत पाटील यांची. निधीच्या वाटपावरून त्या दोघांमध्ये झालेली खडाजंगी कानावर पडलेल्या नागरिकांनी नक्कीच डोक्याला हात लावला असणार! राजकारण कशासाठी केले जाते, पक्षांतर कशासाठी केले जाते आणि ते करूही इप्सित साध्य होत नसेल तर मग काय होते, हे ती खडांजगी पाहिली की स्पष्ट होते. एक कॅबिनेट मंत्री आणि एक खासदार हे आयएएस अधिकारी आणि अन्य अधिकाऱ्यांसमोर एकमेकांना अरे-तुरे करताहेत, एकमेकांना घाणेरडी शिविगाळ करताहेत, बघून घेण्याची भाषा करताहेत.. यापेक्षा पुढे जाऊन एकमेकांवर टक्केवारी घेतल्याचे आरोप करताहेत..! अधिकारी आणि नागरिकांसमोर त्यांच्या अब्रूचे धिंडवडे तर निघाले, याशिवाय राजकारण कशासाठी केले जाते, हेही सर्वांना कळून चुकले.  

Sunil Kamble, Hemant Patil, Abdul Sattar
Nagar Political : नरेंद्र मोदींच्या हातात देश आणि जनता असुरक्षित : मुख्यमंत्री सिद्धरामय्या

हेमंत पाटील आणि अब्दुल सत्तार यांनी केलेला हा काही पहिलाच प्रकार नाही. नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णांचा मोठ्या संख्येने मृत्यू झाल्यानंतर तेथील डीनना त्यांनी स्वच्छतागृहांची साफसफाई करायला लावली होती. खासदार पाटील यांच्या या कृत्याचा राज्यभरातून निषेध झाला होता. त्यानंतर त्यांच्यावरह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी पुण्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत आयोजित एका कार्यक्रमात पोलिस कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली होती. नववर्षाच्या पहिल्या आठवड्याने राज्याला राजकीय असे राजकीय 'रंग' दाखवले आहेत.

आगामी काळात देशात आणि राज्यात होऊ घातलेल्या घडामोडींमुळे राजकीय पक्ष आणि नेत्यांमध्ये असे अशोभनीय प्रकार आणखी वाढतील का, अशी भीती निर्माण झाली आहे. टक्केवारी वगैरे प्रकार राजकारणात आधीपासूनच असू शकतात, मात्र राजकीय नेतेच त्याची जाहीर वाच्यता करण्याचे प्रकार अलीकडे सुरू झाले आहेत. वर्चस्वाच्या राजकारणात एकाच पक्षातील नेत्यांमध्ये इतकी चढाओढ लागली आहे की कोठे काय बोलावे, याचेही भान अब्दुल सत्तार आणि हेमंत पाटील यांच्यासारखे नेते हरवून बसले आहेत. दिग्गज, संयमी, संयत भाषेचा वापर करणारे अनेक राजकीय नेते महाराष्ट्राने पाहिले आहेत. त्याच महाराष्ट्राच्या नशिबी आता अशा वकूब नसलेले नेते पाहण्याची दुर्देवी वेळ ओढवली आहे.

(Edited By - Rajanand More)

Sunil Kamble, Hemant Patil, Abdul Sattar
Jayant Patil News : महाराष्ट्र बघतोय, राजकीय संस्कृतीचे धिंडवडे.. यूपी-बिहारपेक्षा वाईट; पाटलांनी डागली तोफ!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com