Mumbai News : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा येत्या आठ दिवसात होणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष अंग झटकून कामाला लागले आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महायुती व महाविकास आघाडीकडून गेल्या सहा महिन्यापासून तयारी केली जात आहे. त्यातच आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीपूर्वीच राज व उद्धव ठाकरे हे दोन बंधू एकत्र आले आहेत. त्यामुळे येत्या काळात मनसे व उद्धव ठाकरेंची शिवसेनेची युती होण्याची शक्यता आहे. त्याचमुळे गेल्या काही दिवसापासून उद्धव ठाकरे यांनी वेगळे प्लॅनिंग केले आहे. त्यामुळेच येत्या काळात भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसमोरील अडचणी वाढणार आहेत.
महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उद्धव ठाकरे गेल्या सहा महिन्यापासून तयारी करीत आहेत. त्याच दृष्टीने त्यांनी पावले उचलली आहेत. हिंदी सक्तीच्या विरोधात राज (Raj Thackeray) व उद्धव ठाकरे हे बंधू एकत्र आले आहेत. त्याच वेळी त्यांना हिंदी सक्तीच्या विरोधात जोरदार मोर्चाकाढून मुंबईत मराठी बांधवांची ताकद राज्य सरकारला दाखवून देत शक्तिप्रदर्शन करायचे होते. मात्र, जुलै महिन्यात ठरलेल्या मोर्चापूर्वीच महायुती सरकारने हिंदी सक्तीच्या विरोधीतील दोन्ही जीआर रद्द केले होते. त्यामुळे ठाकरे बंधूंना मुंबईत जोरदार ताकद दाखवत आली नव्हती.
त्यावेळी राज व उद्धव ठाकरे यांनी वरळीतील डोममध्ये ऐन पावसात विजयी मेळावा घेत जोरदार शक्तीप्रदर्शन केले होते. त्याचवेळी हे दोन बंधू एकत्र येणार यावर शिक्कामोर्तब झाला होता. मात्र, दोघांनीही राजकीयदृष्ट्या एकत्र येण्याची घोषणा केली नव्हती. त्यानंतर दोघेही बंधू गेल्या चार महिन्यापासून सातत्याने भेटीगाठी घेत आहेत. त्यातून मुंबईतील वातावरण बदलण्याचा प्रयत्न करीत आहेत. विशेषतः ठाकरे बंधूंनी राज्यात झालेल्या मतचोरीच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यासाठी दोनवेळा त्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाऊन दुबार मतदार नावे वगळण्याची मागणी केली आहे. त्यामुळे वातावरण तापले आहे.
त्यातच योग्य संधी आल्यानंतर पुन्हा एकदा उद्धव-राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा काढत ताकद दाखवून दिली आहे. महाविकास आघाडी आणि मनसेने निवडणूक आयोगाच्या विरोधात काढलेल्या सत्याच्या मोर्चात विरोधी पक्षातील सर्वच बडे नेते एकत्र आले होते. त्यांनी एकत्र येत विरोधकांची मोठी एकजूट या मोर्चाच्या निमित्ताने दाखवून दिली आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण पुन्हा एकदा या निमित्ताने ढवळून निघाले आहे.
त्यातच आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा काढल्यानंतर आता मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी प्लॅनींग केले आहे. त्यानुसार आता मुंबईतील छोट्या-मोठ्या कार्यक्रमाला हजेरी लावत आहे. त्यासोबतच निवडणुकीच्या दृष्टीने अनेक संघटनात्मक बदल करीत युवकाना मोठ्या प्रमाणात संधी दिली आहे. त्याशिवाय येत्या काळात 60 पेक्षा अधिक वय असलेल्या माजी नगरसेवकांना उमदेवारी न देण्याचा प्लँन ठरला आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत अर्धे माजी नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले असल्याने आता मोठ्या प्रमाणात युवकाना संधी दिली जाणार आहे. त्यामुळे युवा वर्ग अंग झटकून कामाला लागला आहे.
मुंबई जिंकण्यासाठी त्यांनी शिवसेनेची संपूर्ण यंत्रणा कामाला लावली आहे. प्रत्येक विभागप्रमुखावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर अनेक खासदार, आमदार व माजी नगरसेवक पक्ष सोडून गेले असले तरी संघटनात्मक पडझड फारसी मुंबईत झाली नाही, ही ठाकरेसाठी जमेची बाजू आहे. त्यामुळेच त्यांनी पुन्हा एकदा जुन्या-जाणत्या शिवसैनिकाना पुन्हा सक्रिय केले आहे. त्यामुळे संघटनेत नवचैतन्य पसरले आहे.
उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना आणि विशेषतः उपशाखा प्रमुखांना तळागाळात सक्रिय काम करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. नुकताच त्यांनी 'संकल्प विजयाचा मुंबई जिंकण्याचा' या नावाने उपशाखा प्रमुखांचा मेळावा आयोजित केला होता. त्यांच्याशी संवाद साधत निवडणूक जिंकण्याचा कानमंत्र त्यांनी दिला आहे.
मनसे सोबतची जागावाटपाची बोलणी अंतिम टप्प्यात
मनसेसोबत युती करण्याच्या दिशेने जोरदार चर्चा सुरू आहेत. दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये जागावाटपावर बैठका सुरू आहेत. त्यामुळे येत्या काळात मराठी मतांचे विभाजन टाळण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासोबतच हिंदुत्वाचा मुद्दा जोरकसपणे मांडला जाणार आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरे यांनी 'हिंदुत्वाचा मुद्दा' अधिक जोरकसपणे जनतेसमोर मांडण्याचे निर्देश दिले आहेत. 'आम्ही हिंदुत्व सोडले नाही,' हा संदेश प्रभावीपणे पोहोचवण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे शिवसेनेचा मूळ व्होट बँक टिकवून ठेवणे आणि विरोधकांच्या अपप्रचाराला उत्तर देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
एकंदरीतच विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीनंतर झालेल्या मतचोरीचे आणि अनियमिततेचे आरोप हे निवडणूक आयोगाविरुद्धच्या लढाईसाठी आणि मराठी मतदारांमध्ये सहानुभूती मिळवण्यासाठी वापरले जात आहेत. त्यामाध्यमातून पक्ष आणि लोकशाहीवर होत असलेल्या 'अन्याया'ची भावना मतदारांमध्ये जागृत करणे आणि मतदारांना आपल्या बाजूने वळविण्याचा त्यांचा प्रयत्न दिसत आहे. या सर्व धोरणांच्या माध्यमातून, उद्धव ठाकरे हे एकीकडे पारंपरिक शिवसैनिकांचे मनोबल वाढवून संघटन शक्ती मजबूत करत आहेत, तर दुसरीकडे नवे चेहरे आणि युतीच्या माध्यमातून विरोधकांना कडवे आव्हान देण्याची रणनीती आखत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.