Shiv Sena Foundation Day 2024 : प्रबोधनकारांच्या खोलीत स्थापन झालेली शिवसेना उद्धव यांनी आणली परत त्याच 'ट्रॅक'वर!

On Shiv Sena Foundation Day Sarkarnama Special Analysis : प्रबोधनकारांच्या उपस्थितीत त्यांच्याच खोलीत स्थापन झालेल्या शिवसेनेला त्यांचे नातू उद्धव ठाकरे यांनी परत त्यांच्याच मार्गावर आणले आहे.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeraysarkarnama

Shiv Sena Foundation Day : 19 जून 1966 रोजी शिवसेनेची स्थापना झाली ती प्रबोधनकार ठाकरे यांच्या यांच्या उपस्थितीत आणि त्यांच्याच खोलीत. मराठी माणसांच्या हक्कासाठी स्थापन झालेल्या ही संघटना राजकारणात भाग घेणार नव्हती, मात्र नंतर शिवसेना राजकारणात सक्रिय झाली.

बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला यश मिळत गेले ते मराठी माणसाच्या मुद्यासोबत हिंदुत्वाचा स्वीकार केल्यामुळे. भाजपच्या सोबत गेल्यामुळे एककल्ली, जहाल हिंदुत्वाचा स्वीकार केलेल्या शिवसेनेला उद्धव ठाकरे यांनी आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्या मार्गावर परत आणले आहे. शिवसेनेत पडलेल्या फुटीच्या रूपात त्याची किंमतही त्यांना मोजावी लागली.

मुंबईत (Mumbai) मोठ्या संख्येने येणाऱ्या परप्रांतीयांमुळे मराठी माणसांचे हक्क हिरावले जात होते. नोकरी, व्यवसायातील महत्वाच्या जागा परप्रांतीय बळकावत होते. बाळासाहेब ठाकरे यांनी याविरोधात पहिल्यांदा आवाज उठवला. या आवाजाला वरचेवर धार चढत गेली. स्थापनेच्या वर्षातच प्रबोधघनकारांच्या उपस्थितीत शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा झाला. त्याला प्रचंड गर्दी झाली होती. 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण, असे धोरण बाळासाहेबांनी ठरवले. 1967 मध्ये ठाणे आणि 1968 मध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक लढवून शिवसेनेने राजकारणात प्रवेश केला. शिवसेनेने मुंबईत 120 पैकी 42 जागा जिंकल्या. मुंबईत शिवसेनेने ही निवडणूक प्रजा समाजवादी काँग्रेससोबत मिळून लढवली होती. त्यानंतर महापालिकेच्या प्रत्येक वॉर्डात शिवसेनेची शाखा स्थापन करण्यात आली.

1967 मध्ये ठाणे महापालिकेची निवडणूक लढवून राजकारणात प्रवेश केलेल्या शिवसेनेने (Shiv Sena) लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा प्रचार केला होता. या निवडणुकीत काँग्रेसने स. गो. बर्वे यांना उमेदवारी दिली होती. बाळासाहेब ठाकरे यांनी बर्वे यांना पाठिंबा दिला होता. 'मार्मिक'च्या पहिल्या अंकाचे अनावरण यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले होते. बाळासाहेब ठाकरे यांची काँग्रेसच्या अनेक नेत्यांशी मैत्रीचे संबंध होते. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेससोबत जाऊन हिंदुत्व सोडले, बाळासाहेबांचे विचार खुंटीला टांगले, असे आरोप सातत्याने करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या 40 आमदारांना ही बाब माहीत नसेल, असे कसे म्हणता येईल?

Uddhav Thackeray
Shinde vs Thackeray : शिवसेना ठाकरेंचीच! फुटीनंतर कौल उद्धव यांना; एकनाथ शिंदे यांना दिलासा अन् इशारा !

बाळासाहेबांना अटक

मुंबईत माहीममध्ये 1969 मध्ये तत्कालीन उपपंतप्रधान मोरारजी देसाई यांनी गाडी शिवसैनिकांनी अडवली होती. त्यानंतर मुंबईत भीषण दंगल झाली. मुंबई आठवडाभर जळत होती. त्यावेळी बाळासाहेबांना अटक करून येरवडा तुरुंगात त्यांची रवानगी करण्यात आली होती. त्या दंगलीत 69 जणांचा जीव गेला होता. बाळासाहेबांनी तुरुंगातून आवाहन केल्यानंतर मुंबई शांत झाली होती. 5 जून 1970 रोजी कम्युनिष्ट पक्षाचे आमदार कृष्णा देसाई यांची हत्या झाली. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत वामनराव महाडिक विजयी झाले. ते शिवसेनेचे पहिले आमदार ठरले. 1972 च्या विधानसभा निवडणुकीत प्रमोद नवलकर विजयी झाले. यादरम्यान शिवसेनेला महापौरपदेही मिळत गेली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लागू केलेल्या आणीबाणीला बाळासाहेबांनी पाठिंबा दिला होता.

शिवसेना आणि मुंबईत भीषण दंगली

महाड येथील 1985 च्या पक्षाच्या राज्य अधिवेशनात आता घोडदौड महाराष्ट्रात अशी घोषणा देत शिवसेनेचा उर्वरित महाराष्ट्रात विस्तार करण्याचा संकल्प सोडण्यात आला. 1987 मध्ये शिवसेनेने आपल्या भात्यात हिंदुत्वाचा बाण भरला. 'गर्व से कहो हम हिंदू हैं', अशी घोषणा देण्यात आली. शिवसेना - भाजप युती करण्यात प्रमोद महाजन यांना 1989 मध्ये यश आले. ती युती 2019 पर्यंत कायम होती. 2014 मध्ये दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती, मात्र नंतर सरकार स्थापन करण्यासाठी ते एकत्र आले होते. युतीच्या या 25 वर्षांचा काळात शिवसेनेचे हिंदुत्वही भाजपच्या हिंदुत्वासारखे जहाल, एककल्ली झाले. बाबरी मशीद पाडल्याची जबाबदारी शिवसेने घेतली. 1993 मध्ये मुंबईत भीषण दंगली झाल्या. या दंगलींमध्ये शिवसेना सामील होती, असे न्यायमूर्ती श्रीकृष्ण आयोगाच्या अहवालात म्हटले होते.

प्रबोधनकार ठाकरे यांचा मार्ग

भाजपशी काडीमोड घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यात राजकीयदृष्ट्या बदल झाला. माझे हिंदुत्व शेंडी - जाणव्याचे नाही, तर सर्वसमावेशक आहे, असे ते वारंवार सांगू लागले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभाग नव्हता, असेही ते बोलू लागले. हिंदू धर्म कोणाचाही द्वेष करायला शिकवत नाही, याचाही ते पुनरुच्चार करू लागले. शिवसेनेला त्यांनी आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्या मार्गावर आणले. त्यांच्यात झालेला हा बदल पक्षसंघटनेत रुजवण्यात ते यशस्वी झाले का? याचे उत्तर नाही असे द्यावे लागेल. एकनाथ शिंदे शिवसेनेतून 40 आमदारांसह बाहेर पडले, त्याची अनेक कारणे आहेत. तपासयंत्रणांचा ससेमिरा हे कारण जगजाहीर आहे. मात्र शिंदे आणि 40 आमदारांनी बाहेर पडताना उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडले, बाळासाहेबांचे विचार सोडले, अशी कारणे दिली आणि शिवसेना प्रबोधनकारांच्या मार्गावर आणणे आपल्याला रुचलेले नाही, असा संदेश दिला. या अर्थाने उद्धव ठाकरे यांच्यात राजकीयदृष्ट्या झालेला बदल त्यांना संघटनेत रुजवता आला नाही, असे म्हणावे लागेल.

Uddhav Thackeray
Video Raj Thackeray : राज ठाकरेंनी भूमिकेवर ठाम राहावे, अन्यथा मनसेची पुन्हा पीछेहाट!

भाजपची दाणादाण

गेल्या चार - पाच वर्षांत उद्धव ठाकरे यांचा नेतृत्व तावून सुलाखून निघाले आहे. एकनाथ शिंदे बाहेर पडल्यामुळे शिवसेनेची संघटनात्मक बाजू जरूर कमकुवत झाली आहे, मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाचे नाव, चिन्ह, बहुतांश आमदार सोबत नसतानाही मिळालेले यश उद्धव ठाकरे आणि निष्ठावंतांचा हुरूप वाढवणारे ठरले आहे. महाविकास आघाडीचे नेते म्हणून उद्धव ठाकरे समोर आले आहेत. महाविकास आघाडी विधानसभेची निवडणूक त्यांच्याच नेतृत्वाखाली लढवणार, अशी शक्यता आहे. काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी उद्धव ठाकरे यांची मते काँग्रेसकडे वळती झाली, हेही लक्षात घेतले पाहिजे. उद्धव ठाकरे यांचे प्रबोधनकारांच्या मार्गाने जाणे भाजपच्या डोळ्यांत सलत होते. ते का सलत होते, हे लोकसभा निवडणुकीत भाजपची जी दाणादाण उडाली त्यावरून लक्षात यायला हवे. उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत जाणार, अशी चर्चा अधूनमधून होत असते. मात्र प्रबोधनकारांचा मार्ग सोडून उद्धव ठाकरे पुन्हा परत जातील, याची शक्यता आता जवळपास मावळली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com