Video Raj Thackeray : राज ठाकरेंनी भूमिकेवर ठाम राहावे, अन्यथा मनसेची पुन्हा पीछेहाट!

MNS Election Strategy : विधानसभा निवडणुकीत मनसेला एकही जागा मिळणार नाही, असे विधान भाजपच्या एका आमदाराने केले. त्यानंतर झालेल्या बैठकीत राज्यातील २२५ ते २५० जागा लढण्याची तयारी कार्यकर्त्यांनी करावी, असे आदेश राज ठाकरे यांनी दिले आहेत. या निर्णयावर ते ठाम राहतील का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
Raj Thackeray
Raj Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly Election 2024 : राजकारणातील सध्याचा काळ युती, आघाड्यांचा आहे. राजकीय पक्षांनी स्वबळावर लढण्याचा काळ मागे पडला आहे. समविचारी पक्ष एकत्र येऊन निवडणुका लढवत आहेत. भिन्न विचारांचे पक्षही एकत्र आल्याचे गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रासह देशभरात दिसून आले आहे.

महाराष्ट्रातील राजकीय पक्ष महाविकास आघाडी आणि महायुतीत एकवटले आहेत. लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणूक स्बवळावर लढण्यास तयार राहा, असा संदेश कार्यकर्त्यांना दिला आहे. सतत भूमिका बदलण्यासाठी प्रसिद्ध असलेले मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे या निर्णयावर तरी ठाम राहतात का, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

मनसेची (MNS) स्थापना झाल्यानंतर त्या पक्षाची राज्यात क्रेझ निर्माण झाली होती. राज ठाकरे (Raj Thackeray) हे त्यामागचे प्रमुख कारण होते. मनसेच्या स्थापनेनंतर विधानसभा आणि मुंबई महापालिकेच्या काही निवडणुकांत पक्षाला उल्लेखनीय यश मिळाले. नाशिक महापालिकेत तर मनसेची सत्ता आली होती. पूर्वी नेत्यांची भाषणे ऐकण्यासाठी लोकांची गर्दी व्हायची. लोक स्वतःहून यायचे.

सध्याच्या काळात महाराष्ट्रात राज ठाकरे हे असे एकमेव नेते आहेत, ज्यांचे भाषण ऐकण्यासाठी लोक गर्दी करतात. बाळासाहेब ठाकरे यांच्याशी साधर्म्य सांगणारी त्यांची वक्तृत्वशैली आहे. दुर्दैवाने राज ठाकरे यांना या वक्तृत्वशैलीसोबत ठाम भूमिका देता आली नाही. ते आपल्या कोणत्याही एका भूमिकेवर ठाम किंवा कायम राहिले नाहीत. ते सतत भूमिका बदलत राहिले.

सतत भूमिका बदलल्यामुळे राज ठाकरे यांच्याबाबतचे गांभीर्य लोकांमध्ये कमी झाले. लोकसभेच्या 2019 च्या निवडणुकीत त्यांनी मनसेचा एकही उमेदवार उभा केला नव्हता. असे असतानाही त्यांनी भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात भूमिका घेतली. राज्यभरात मोदी आणि अमित शाह यांच्या विरोधात सभा घेतल्या. त्यावेळी ‘लाव रे तो व्हिडीओ’ हा त्यांचा प्रयोग अत्यंत गाजला.

निवडणुकीनंतर राज ठाकरे यांना ईडीने एक नोटीस बाजवली आणि त्यानंतर त्यांचा नूर पालटला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. राज ठाकरे यांनी महायुतीच्या काही उमेदवारांसाठी जाहीर सभा घेतल्या. विशेष म्हणजे, याही लोकसभा निवडणुकीत मनसेचा एकही उमेदवार रिंगणात नव्हता.

Raj Thackeray
Hasan Mushrif : ‘आरएसएस’च्या आरोपाला मुश्रीफांचे सडेतोड उत्तर; ‘यूपीत तर अजितदादा गेले नव्हते....’

महायुतीला बिनशर्त पाठिंबा देऊनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला राज ठाकरे यांना निमंत्रण नव्हते. त्यामुळे मनसेमध्ये नाराजी पसरली. वापरा आणि फेकून द्या, असे भाजपचे धोरण असल्याची भावना मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली. मुंबई परिसरातील विधानसभेच्या 20 जागा मनसे महायुतीतून लढणार, अशी चर्चा सुरू झाली.

ही चर्चा सुरू होताच भाजपचे विदर्भातील आमदार संजीवरेड्डी बोडकुरवार यांनी मनसेच्या जिव्हारी लागेल असे वक्तव्य केले. लोकसभा निवडणुकीत मनसेचा महायुतीला काहीही फायदा झाला नाही, त्यामुळे मनसेला विधानसभेची एकही जागा मिळणार नाही, असे आमदार बोडकुरवार यांनी ठणकावून सांगितले. आमदार बोडकुरवार यांच्या वक्तव्यावर भाजपच्या एकाही नेत्याने आक्षेप घेतला नाही.

आमदार बोडकुरवार यांच्या विधानानंतर राज ठाकरे यांच्यासमोर मोठा पेच निर्माण झाला. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या बैठकीत भूमिका घेण्याचा दबाव त्यांच्यावर निर्माण झाला. कार्यकर्त्यांचा उत्साह कायम ठेवणे, महायुतीला इशारा देणे त्यांच्याठी क्रमप्राप्त झाले होते. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रातील 288 पैकी 225 ते 250 जागा स्वबळावर लढवण्यासाठी कार्यकर्त्यांनी तयार राहावे, असे आदेश बैठकीत दिले. यावर महायुतीतील पक्षांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

Raj Thackeray
Chhagan Bhujbal Upset In NCP : छगन भुजबळांना राज्यसभेवर न पाठविण्याचे मुश्रीफांनी फोडले गुपित

लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांचा महायुतीला खरेच काहाही फायदा झालेला नाही, असे तर नेत्यांचे मत झाले नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना-भाजप युतीला 2019 मध्ये 41 जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी राज ठाकरे भाजपच्या विरोधात होते. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राज ठाकरे सोबत असताना महायुतीला केवळ 17 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे आमदार बोडकुरवार यांनी चर्चा सुरू केली असावी.

राज्यातील सर्वच्या सर्व 288 जागांवर उमेदवार देण्याची कुवत सध्याच्या घडीला कोणत्याही पक्षाकडे नाही. त्यामुळे युती, आघाडी करूनच राजकीय पक्ष निवडणुकीला सामोरे जात आहेत. धरसोड वृत्तीमुळे राज ठाकरे मात्र मागे पडले आहेत. मनसेच्या चढत्या काळात त्यांनी राज्यभरात कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण करायला हवे होते. निवडणूक लढणाऱ्या कार्यकर्त्यांना बळ द्यायला हवे होते.

गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी उमेदवार न देऊन चूक केली. जिंकणे हा निवडणूक लढवण्याचा उद्देश असला तरी तो एकमेव नसतो. पराभव झाला तरी निवडणुकीमुळे कार्यकर्त्यांना बळ मिळते, पक्षाचे संघटन वाढते. कार्यकर्त्यांना पक्षाचा झेंड्याखाली एकत्र येण्याची संधी मिळते. निवडणूकच नाही लढवली तर कार्यकर्ते सैरभेर होतात. कोणाच्या तरी आश्रयाला जातात. मग पक्षांची हवी तशी वाढ होत नाही. मनसेचे आतापर्यंत असेच झाले आहे. आता 225-250 जागा लढवण्याचा राज ठाकरे यांनी निर्णय घेतलाच आहे, तर त्यावर त्यांनी ठाम राहायला हवे; अन्यथा त्यांचा पक्ष आणखी काही पावले मागे जाईल.

Edited By : Vijay Dudhale

Raj Thackeray
Ajit Pawar-Anna Hazare : अजित पवारांच्या अडचणी वाढणार; अण्णा हजारे देणार क्लोजर रिपोर्टला आव्हान

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com