माझ्या वडिलांना 2009 मध्ये डावलले गेले, पण 2019 ला मला न्याय मिळेल!

"माझ्या वडिलांना २००९ साली डावलले होते पण आता मात्र मला नक्कीच उमेदवारी मिळेल"-उत्कर्षा रुपवते
माझ्या वडिलांना 2009 मध्ये डावलले गेले, पण 2019 ला मला न्याय मिळेल!
Published on: 
Updated on: 

पुणे : "शिर्डी मतदारसंघाशी आमच्या कुटुंबाची नाळ जोडलेली आहे.  माझे आजोबा दादासाहेब रुपवते, वडील प्रेमानंद रुपवते यांनी जे योगदान दिले आहे, त्याच्या बळावर मला काँग्रेसची उमेदवारी मिळेल आणि माझा विजयही होईल," असा विश्वास महाराष्ट्र राज्य महिला काँग्रेसच्या महासचिव उत्कर्षा रुपवते यांनी व्यक्त केला.

शिर्डी राखीव लोकसभा मतदारसंघातून रुपवते इच्छुक आहेत. शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात त्या कार्यरत आहेत. युवक काँग्रेसमध्येही त्यांनी काम केले आहे. माजी मंत्री दादासाहेब रुपवते यांची नात आणि प्रदेश काँग्रेसचे माजी प्रवक्ते प्रेमानंद रुपवते यांची कन्या असलेल्या उत्कर्षा यांनी दादासाहेब यांनी स्थापन केलेल्या बहुजन शिक्षण संघ या संस्थेचा कारभार पहातात.

दादासाहेब रुपवते यांनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात सामाजिक न्याय, गृहनिर्माण, सांस्कृतिक यासारख्या खात्याचे मंत्री म्हणून काम केले होते. लोकांशी संवाद करण्याची त्यांची खास शैली होती. राजकारणासोबत ते लोककला आणि साहित्य या क्षेत्राशी त्यांचा संबंध होता. राज्यभर विखुरलेल्या असंघटित असलेल्या तमाशा कलावंतांची संघटना उभी करून त्यांचा आवाज बुलंद करण्याचे काम दादासाहेब यांनी केले होते. तमाशा कलावंतासोबत शाहिराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. उपेक्षित घटकांच्या प्रश्नांकडे लक्ष देऊन ते सोडवण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असायचे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या 'प्रबुद्ध भारत' या नियतकालिकाचे संपादक म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले होते. 
दादासाहेब रुपवते यांचा वारसा त्यांचे पुत्र प्रेमानंद रुपवते यांनी चालवला. त्यांनी काँग्रेसचे प्रवक्ते म्हणून काम केले. कर्जत जामखेड येथून विधानसभेची निवडणूक त्यांनी लढवली होती, पण त्याना यश मिळाले नव्हते. विधानसभा निवडणुकीत पराभव होऊनही ते नाराज नव्हते. ते पक्षाचे काम त्याच गतीने करत होते. 2009 साली शिर्डी मतदारसंघातून काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी म्हणून त्यानी प्रयत्न केले, पण त्यांना उमेदवारी मिळाली नाही मग अपक्ष म्हणून ते लढले, तेव्हाही त्यांचा पराभव झाला. 

अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षाशी संबंधित असलेल्या रूपवते घराण्यातील उत्कर्षा रुपवते यांनी पुन्हा एकदा शिर्डीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्या म्हणतात,"आमच्या कुटुंबाने आजवर पक्षासाठी योगदान दिले आहे. त्याची दखल घेऊन मला उमेदवारी मिळेल. आमच्या जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांचे बळ माझ्या पाठीशी आहे. त्यामुळे माझा विजय निश्चित आहे."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com