
2007-2008 ची गोष्ट असेल. त्यावेळी स्वतंत्रकुमार हे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती होते. धाराशिव येथील विधी महाविद्यालयात आयोजित एका कार्यक्रमासाठी ते आले होते. कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर बोलताना ते म्हणाले होते, "समाजाला चांगल्या डॉक्टरांची गरज असते, तशीच गरज, किंबहुना त्यापेक्षा अधिक गरज समाजाला चांगल्या वकिलांची असते.'' न्यायमूर्ती स्वतंत्रकुमार किती योग्य बोलले होते याची प्रचिती वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात आरोपींच्या वकिलाने केलेल्या युक्तिवादानंतर पुन्हा आली आहे.
राजकीय क्षेत्रात दबदबा असलेल्या हगवणे कुटुंबातील शशांक याच्याशी वैष्णवी यांचा प्रेमविवाह झाला होता. वैष्णवी यांच्या वडिलांनी लग्नात मोठा खर्च केला होता. तरीही सासरी वैष्णवी यांना चांगली वागणूक देण्यात आली नाही, त्यांचा छळ करण्यात आला. हगवणे कुटुंबीयांचा हावरटपणा वाढतच गेला. वैष्णवी यांच्या वडिलांकडे पैशांची मागणी केली जाऊ लागली होती. या छळाला कंटाळून तिने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. वैष्णवी यांना मारहाण करण्यात आल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे. या प्रकारानंतर राज्याचे समाजमन खिन्न झाले आहे.
अशा वातावरणात हगवणे कुटुंबाच्या वकिलाने न्यायालयात केलेल्या युक्तीवादानंतर राज्यभरात संतापाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या वकिलाने वैष्णवी यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न केला आहे, महिलांची मुस्कटदाबी करायची असेल, त्यांचा आवाज बंद करायचा असेल तर त्यांच्या चात्रित्र्यावर शिंतोडे उडवण्याचे राखीव ठेवलेले हत्यार उपसले जाते. या वकिलानेही तीच पद्धत अवलंबली आहे. पतीने पत्नीला चार हात मारले तर त्याला छळ कसे म्हणायचे, असा संतापजनक युक्तीवादही या वकिलाने न्यायालयात केला आहे.
सासरी होणाऱ्या छळामुळे वैष्णवी या दोनवेळा माहेरी आल्या होत्या. विवाहित महिलेचे माहेरी राहणे समाजात कमीपणाचे समजले जाते. छळ झाल्यानंतरही वैष्णवी यांच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दिली नव्हती. पोलिस ठाण्यात, न्यायालयात न्याय मिळेल का, अशी शंका कोणत्याही पालकांच्या मनात येतेच. छळानंतरही वैष्णवी यांच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात तक्रार का दिली नव्हती, याचा अंदाज हगवणे यांच्या वकिलाने न्यायालयात केलेल्या युक्तीवादानंतर येऊ शकतो. शहाण्याने पोलिस ठाण्याची, कोर्टाची पायरी चढू नये, असे म्हटले जाते ते उगाच नाही.
आरोपींना न्यायालयात आपली बाजू मांडण्याचा, आपले निर्दोषत्व सिद्ध करण्याचा पूर्ण अधिकार असतो. या अधिकाराचा वापर करण्यासाठी चारित्र्यावर शिंतोडे उडवणे, चार हात मारले म्हणजे पत्नीचा छळ कसा, असा युक्तिवाद न्यायालयात करणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. समाजाला चांगल्या वकिलांची गरज आहे, असे न्यायमूर्ती स्वतंत्रकुमार का म्हणाले होते, ते आता लोकांच्या लक्षात आले असेल. जवळपास 18 वर्षांपूर्वीचे स्वतंत्रकुमार यांचे ते विधान आजही तंतोतंत लागू होते, हे थोडेसे आश्चर्यकारकच म्हणावे लागेल.
हगवणे यांच्या वकिलाच्या या युक्तीवादाचे पडसाद उमटले आहेत. सर्व थरांतून त्याच्यावर टीका होऊ लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे आक्रमक झाल्या आहेत. या वकिलाच्या कानशिलात लगावणाऱ्याचा सत्कार करणार, असे त्यांनी जाहीर केले आहे. हे योग्य की अय़ोग्य यावर मतमतांतरे असू शकतात, मात्र वकिलाच्या युक्तीवादामुळे समाजात संताप निर्माण झाला आहे, हे मान्य करावे लागेल. चारित्र्याचा मुद्दा कोणत्याही महिलेसाठी अत्यंत नाजूक असा असतो. त्याला हात घातला की महिलांचे खच्चीकरण होते.
वैष्णवी यांच्या रूपाने एका बापाने आणि एका आईने लेक गमावली आहे. एका नऊ महिन्यांच्या बाळाने आई गमावली आहे. लेकीचा प्रमेविवाह असतानाही वडिलांना प्रतिष्ठेपायी वारेमाप खर्च केला. त्यामुळे सासरच्या मंडळींची मागणी वाढतच गेली. त्यातून वैष्णवी यांचा छळ सुरू झाला. हे सर्व असह्य झाल्याने त्यांनी आत्महत्या केली. त्यातून स्वतःला वाचवण्यासाठी सासरच्या मंडळींनी निवडलेला वैष्णवी यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा मार्ग संतापजनक आहे. शहाण्याने कोर्टाची पायरी खरेच चढू नये का, असा प्रश्न आता समाजाला नक्कीच पडला असेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.