Vinod Tawde News : एकही आमदार नाही, खासदारही एकच... सत्तेसाठी विनोद तावडेंचा गनिमीकावा कामी येणार?

Kerala Assembly elections : भाजपला २०१६ च्या विधानसभा निवडणुकीत १४ टक्के मते मिळाली होती. त्यामध्ये २०२१ च्या निवडणुकीत केवळ दोन टक्क्यांनी वाढ झाली. २०२४ लोकसभा निवडणुकीत मात्र हा आकडा २० टक्क्यांपर्यंत पोहोचला.
PM Narendra Modi, Vinod Tawde
PM Narendra Modi, Vinod TawdeSarkarnama
Published on
Updated on

PM Modi trust Vinod Tawde : भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नवीन नबीन यांची काल बिनविरोध निवड झाली. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना अध्यक्षांच्या खुर्चीवर बसविले. ते आता आपले बॉस असून आपण कार्यकर्ता असल्याचे मोदी नबीन यांना शुभेच्छा देताना म्हणाले होते. यावेळी मोदींनी नबीन यांच्यासमोर आगामी निवडणुकांबाबतही सूचक भाष्य केले होते.

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आणि प्रामुख्याने मुंबई महापालिकेत भाजपला मिळालेल्या घवघवीत यशाचा उल्लेख मोदींकडून देशभरात केला जात आहे. नव्या अध्यक्षांसमोरही त्यांनी हा उल्लेख केला. त्याचप्रमाणे केरळची राजधानी तिरूवनंतपुरम महापालिकेतही भाजपने ५० जागा मिळवत कमाल केली आहे. मोदींनी त्यावरही भाष्य करत आता केरळ राज्यातही भाजपची सत्ता येईल, असे म्हटले. त्यानंतर काही तासांतच नव्या अध्यक्षांनी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्याकडे केरळची जबाबदारी सोपविली.

केरळमध्ये पुढील काही महिन्यांत विधानसभेची निवडणूक होणार आहे. तावडे यांच्याकडे या निवडणुकीसाठी केरळचे प्रभारी म्हणून जबाबदारी सोपविली आहे. भाजपसाठी केरळ या राज्यात विजय मिळविणे खूप कठीण आहे. हेच कठीण काम तावडे यांच्यावर देण्यात आले आहे. ते बिहारचेही प्रभारी होते. तिथे भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. पण बिहार आणि केरळची तुलना होऊ शकत नाही. दक्षिण भारतातील या राज्यात भाजपची ताकद मागील काही वर्षांत वाढली असली तरी ती सत्तेतपर्यंत घेऊन जाणारी नाही, हे मागील काही निवडणुकांच्या इतिहासावरील दिसेल.

PM Narendra Modi, Vinod Tawde
Pavitra Portal TET : शिक्षकांना नियुक्ती नाकारल्यास शिक्षण संस्थांना बसणार जोरदार दणका; सरकारने घेतला मोठा निर्णय

भाजपला २०१६ च्या विधानसभा निवडणुकीत १४ टक्के मते मिळाली होती. त्यामध्ये २०२१ च्या निवडणुकीत केवळ दोन टक्क्यांनी वाढ झाली. २०२४ लोकसभा निवडणुकीत मात्र हा आकडा २० टक्क्यांपर्यंत पोहोचला. भाजपला राज्यात सत्ता काबीज करायची असल्यास आणखी दुप्पट मते मिळवावी लागणार आहेत. राज्यात भाजपचा केवळ एकच खासदार असून विधानसभेत मागील निवडणुकीत खातेही उघडता आले नव्हते. तर एकाच महापालिकेत सध्या सर्वाधिक जागा आहेत.

केरळमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखाली यूडीएफ आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखाली एलडीएफची वोट बँक मजबूत आहे. प्रत्येक निवडणुकीत या दोन आघाड्यांमध्येच थेट लढत होते. प्रामुख्याने मुस्लिम आणि ख्रिश्चन मतदार या दोन आघाड्यांमध्ये विभागाले आहेत. एवढेच नाही तर अनेक हिंदू मतदारांचीही या आघाड्यांना पसंती आहे. त्यामध्ये भाजपने आता कुठे आपले अस्तित्व दाखविण्यास सुरूवात केली आहे. पण सत्तेपर्यंतची वाट अत्यंत बिकट आहे, हे सत्य कुणीही नाकारू शकत नाहीत.

PM Narendra Modi, Vinod Tawde
Devendra Fadnavis News : CM फडणवीसांनी स्वित्झर्लंडमधून मुंबईत परतण्याआधी केला लोढा डेव्हलपर्ससोबत करार; विरोधकांनी ठेवलं बोट...

भाजपला केरळमध्ये सत्ता काबीज करायची असेल तर मुस्लिम आणि ख्रिश्चन मतांचा मोठा टक्का आपलेकडे खेचावा लागणार आहे. या दोन समाजाची राज्यातील लोकसंख्या ४५ टक्के एवढी आहे. तर नायर समाजाची लोकसंख्या १५ टक्के आहे. त्यामध्ये केरळातील उच्चवर्णीय हिंदू आहेत. त्याचप्रमाणे मागास असलेल्या एझवा समाजाचा वाटाही जवळपास २८ टक्के आहे. सध्याचे केरळचे मुख्यमंत्री पी. विजयनही याच समाजातील आहेत. त्यामुळे हा समाज नेहमीच डाव्यांच्या बाजूने उभा राहिला आहे. भाजपने काही प्रमाणात नायर समाजामध्ये आपला दबदबा निर्माण करण्यास सुरूवात केली आहे. पण मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजात अद्यापही भाजपला आपली प्रतिमा सुधारता आलेली नाही.

भाजपने हिंदू समाजातील मतांचे ध्रुवीकरण केले तरी सत्तेपर्यंत पोहोचता येणार नाही. हिंदू समाजातील मोठा वर्ग काँग्रेस आणि डाव्यांच्या मागे वर्षानुवर्षे आहे. त्यामुळे हे मतदार अचानक भाजपकडे वळणे कठीण आहे. राज्यात आरएसएसच्या माध्यमातून भाजपने काही प्रमाणात हातपाय पसरले आहेत. पण त्याचा फायदा विधानसभा तर सोडाच पण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ता काबीज करण्यासाठीही होत नाही. त्यात एखाद-दुसरा अपवाद असेल.

महाराष्ट्रासह उत्तर भारतातील अन्य राज्यांमध्ये भाजपचे संघटन अत्यंत मजबूत मानले जाते. त्या ताकदीवरच भाजपने स्थानिक निवडणुकांपासून लोकसभेपर्यंत ऐतिहासिक कामगिरी करत सत्ता काबीज केली आहे. केरळमध्ये मात्र अजूनही संघटनात्मक पातळीवर भाजप कमकुवत आहे. त्याचप्रमाणे राज्यात भाजपसाठी सर्वसमावेशक असा नेता नाही. त्याचाही फटका भाजपला बसत आला आहे. विनोद तावडे यांच्यासमोर हेच प्रमुख आव्हान असणार आहे. निवडणुकीसाठी आता तीन ते चार महिन्यांचा कालावधी आहे. केरळसारख्या राज्यात एवढ्या कमी वेळात पक्षाची पकड निर्माण करून विजय मिळविण्याचे मोठे आव्हान तावडे यांच्यासमोर असणार आहे.   

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com