
India Pakistan relations News : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 24 जणांना प्राण गमवावे लागले होते. त्यामुळेच गेल्या 20 दिवसापासून भारत-पाकिस्तान दरम्यानचे संबंध बिघडले होते. पाकिस्तानने केलेला हा हल्ला भारताच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. त्यामुळेच भारताने प्रत्युत्तर देण्याची घाई न करता पाकिस्तानची सर्वच पातळीवर कोंडी केली होती. त्यामुळे पाकची मोठी अडचण झाली होती.
या हल्ल्यांनंतर दोन्ही देशांच्या सीमारेषेवर तणाव होता. या तणावानंतर भारताने 7 मे रोजी एअर स्ट्राईक करत पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळांना लक्ष्य केले होते. त्यानंतर गेल्या चार दिवसापासून दोन्ही बाजूने हल्ले सुरूच होते. पाकिस्तानने केलेले ड्रोन हल्ले भारताने हवेतच परतवले होते. सर्वच बाजूने कोंडी झालेलया पाकिस्तानने नरमाईची भूमिका घेतली अन दोन्ही देशात अखेर शस्त्रसंधीवर एकमत झाले, हे पाहता प्रथमदर्शनी शांततेचा मार्ग मोकळा झाला असे वाटते.
गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष आणि कुरापती खेळणारा पाकिस्तान अचानक इतका नरम का झाला? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. पाकिस्तानचा हा अचानक बदललेला पवित्रा काहीसा वेगळ्या रणनीतीचा भाग वाटतो. देशांतर्गत आर्थिक अडचणी, IMF कडून कर्जासाठीचा दबाव, आणि आंतरराष्ट्रीय मंचावर दबलेली प्रतिमा या सगळ्यांचा विचार करता, पाकिस्तानसाठी युद्धजन्य वातावरण टाळणे हे अपरिहार्य ठरत होते.
दुसरीकडे, भारताचा (INDIA) स्पष्ट आणि ठाम पवित्रा, विशेषतः सर्जिकल स्ट्राईक व बालाकोट एअर स्ट्राईकसारख्या निर्णयांनी पाकिस्तानला आपल्या मर्यादा ओळखायला लावल्या. त्यामुळेच पाकिस्तानने तात्पुरती शांतता गाठली असावी, असा मतप्रवाह आहे.
भारताने पाकिस्तानची (Pakistan)सिंधु करारामुळे कोंडी केली होती. वैद्यकीय उपचार घेणाऱ्यांची अडचण झाली होती. भारताच्या आक्रमक हल्ल्यांमुळे पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टिम उद्ध्वस्त झाली होती. त्यामुळे पाच एअर बेस बेचिराख झाले. त्यामुळेच या सर्व घटना घडामोडीमुळे बिथरलेल्या पाकिस्तानने अमेरिकेला मध्यस्थी करण्याची विनंती केली. त्यानंतर शुक्रवारी रात्रभऱ अमेरिकेने दोन्ही देशांशी चर्चा केली. यात भारताने काही अटी आणि शर्ती टाकल्या आहेत. या अटी व शर्तीचे पालन केले तरच 12 मे च्या बैठकीत यावर निर्णय होणार आहे.
अंतर्गत राजकीय दबाव
पाकिस्तान सध्या गंभीर आर्थिक संकटात आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) आणि अन्य संस्थांकडून मदत मिळवण्यासाठी देशात स्थैर्य हवे असते. युद्धजन्य परिस्थिती हा गुंतवणूकदारांमध्ये भीती निर्माण करणारा घटक असतो. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने जरी मदत करण्याची तयारी दर्शवली असली तरी देशात स्थैर्य ठेवण्यास सांगितले आहे. त्यामुळे आर्थिक कोंडीतून सुटका करून घेण्यासाठी पाकिस्तान पुढे दुसरा कोणताच पर्याय नव्हता, त्याचमुळे राजकीय दबाव वाढत असल्याने पाकिस्तानने शस्त्रसंधीचा निर्णय घेतल्याचे समजते.
सेनेचा दबाव व मर्यादा
पाकिस्तानी लष्करही अनेक आंतरिक मोर्चांवर काम करत आहे. विशेषतः बलुचिस्तान व खैबर पख्तूनख्वा येथे दहशतवादी हालचालींवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यातच भारताशी उघडपणे पंगा घेणे परवडणारे नाही. भारताच्या तुलनेत त्यांची ताकद खूप कमी आहे. त्यामुळेच लष्कराने पाक सरकारवर दबाव टाकला असणार आहे. त्याच मुळे मर्यादा ओळखून पाकिस्ताने माघार घेतली आहे.
आंतरराष्ट्रीय दबाव
अमेरिका, चीन, सौदी अरेबिया यांसारख्या देशांनी भारत व पाकिस्तानने युद्ध न करता आंतरराष्ट्रीय शांततेचा आग्रह धरला होता. सर्वच देशाने जर त्यांना शांततेचा आग्रह केला होता. त्यामुळे पाकिस्तानने कुरापत सुरू ठेवल्या तर आंतरराष्ट्रीय सहानुभूती गमावण्याची शक्यता होती. त्याच मुळे त्यांनी येत्या काळात जुळवून घेण्याची भूमिका घेतले असल्याचे दिसत आहे.
भारताचा कणखर पवित्रा
भारताने गेल्या काही वर्षांत केलेल्या सर्जिकल स्ट्राईक आणि बालाकोट एअर स्ट्राईक यामुळे पाकिस्तानला समजले आहे की भारत आता तितकासा सहनशील राहिलेला नाही. दुसरीकडे पहलगाम हल्ल्यानंतर केलेल्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे. दुसरीकडे भारतावर ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न अंगलट आल्याने भारताचा कणखर भूमिकेपुढे नमती भूमिका घेण्याशिवाय दुसरा पर्याय पाकिस्तानकडे नवहता. त्यामुळे प्रत्यक्ष लढाईत तोटाच होईल, हे ओळखून नरमाईचे धोरण स्वीकारत त्यांनी शस्त्रसंधी करण्याचा निर्णय घेतला आहे.
शस्त्रसंधीचा धोरणात्मक लाभ
तात्पुरता शांततेचा करार करून सीमारेषेवरील दबाव कमी करणे, आर्थिक व कूटनैतिक फायदा मिळवणे हेही या मागील पाकिस्तानचा हेतू असू शकतो. यामुळे पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय मंचावर अधिक शांतताप्रिय देश म्हणून येत्या काळात भासवता येऊ शकते. ही या शस्त्रसंधी करण्यामागे रणनीती असू शकते.
वेगळ्याच डावपेचाची शक्यता
पाकिस्तानकडून शस्त्रसंधी करण्यामागे शांततेच्या नावाखाली आणखी काही वेगळेच डावपेच असू शकतात. त्याचमुळे पाकिस्तानच्या दहशतवादी गटांची पाळेमुळे अद्याप तशीच आहेत. त्यामुळे ‘नरमाई’ हा केवळ वेळखाऊ युक्तीचा भाग असू शकतो, अशी शंका देखील भारतीय सुरक्षायंत्रणेला आहे. त्यामुळे नेमके या पाठीमागील हेतू समजण्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.