
Sangli News : पलूस-कडेगाव विधानसभा निवडणूक झाल्यानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले होते. आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायती आणि ग्रामपंचायत निवडणुकींचे वारे जिल्ह्यात वाहायला लागले आहेत. त्यामुळे पलूस-कडेगाव मतदारसंघात काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. त्याचवेळी भाजप नेते संग्राम देशमुख यांनीही हालचालींना वेग दिला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) देखील मैदानात उरतल्याने पलूस पालिकेत यंदा कोण बाजी मारणार? याच्या खमंग चर्चा येथे रंगल्या आहेत.
पलूस पालिकेची मुदत संपल्यापासून येथे गेल्या साडेतीन वर्षांपासून प्रशासकराज आहे. पण गेल्या वेळी पलूस पालिकेतील सत्ता काँग्रेसच्या हाती होती. ती आता उलथवून टाकण्यासाठी भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेसही (अजित पवार) तयारीला लागली आहे. तर यंदाही नगरपालिकेवर काँग्रेसचाच हात ठेवण्यासाठी आमदार विश्वजित कदम यांनी कंबर कसली आहे.
16 नोव्हेंबर 2016 रोजी पलूस पालिकेची स्थापना होऊन पहिलीच निवडणूक झाली. त्यावेळी सर्वच पक्षांनी आपली ताकद आजमावून घेतली. एकूण 8 प्रभागात 17 जांगासाठी पक्ष लढले होते. त्यावेळी काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी आणि पलूस शहर स्वाभिमानी विकास आघाडीत थेट लढत झाली होती. यात 17 पैकी 12 जागा आणि नगराध्यक्ष पद काँग्रेने जिंकत सत्ता काबीज केली होती. पलूस शहर स्वाभिमानी विकास आघाडीने 4, भाजपने 1 जागा जिंकली होती. तर राष्ट्रवादीला भोपळाही फोडता आला नव्हता. सन 2021 मध्ये पालिकेची मुदत संपलेनंतर सर्व पक्ष व इच्छुक यांनी निवडणूकीची जोरदार तयारी सुरू केली होती.
मात्र, निवडणूक लांबत गेल्याने अनेकांना तयारी मध्येच थांबवावी लागली. पण आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने अनेकांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. पलूसमधील सर्व पक्ष, नेते, कार्यकर्ते पुन्हा तयारीला लागले आहेत. गेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने आमदार डॉ. पतंगराव कदम, वसंतराव पुदाले, खाशाबा दळवी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवून जिंकली होती. तर आता ही निवडणुक त्यांच्या पिढीच्या हाती आली आहे. आता येथे विश्वजित कदम सत्ता राखून आहेत. पण यंदाही ते सत्ता राखणार का हे पाहावं लागणार आहे.
पलूस हे विश्वजीत कदम यांचे होम ग्राउंड आहे. त्यामुळे येथील निवडणूक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे. या निवडणुकीत त्यांच्यासाठी गणपतराव पुदाले, वैभव पुदाले, सुहास पुदाले, विशाल दळवी, गिरीश गोंदील, विक्रम पाटील सक्रीय आहेत. तसेच कधी काळी भाजपसोबत असणारा दिवंगत अमरसिंह इनामदार गट देखील आता काँग्रेसबरोबर आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटाचे आमदार अरूण लाड यांचीही मदत यावेळी त्यांना होऊ शकते.
गेल्या वेळी दिवंगत बापूसाहेब येसुगडे यांनी स्वाभिमानी विकास आघाडी करत काँग्रेसला जोरदार लढत दिली होती. त्यावेळी आघाडीला 4 जागा मिळाल्या होत्या. तर भाजप 1 आणि राष्ट्रवादीला खातेही उघडता आले नव्हते. त्यावेळी सर्व पक्ष वेगवेगळे लढल्याने त्याचा फायदा काँग्रेसला झाला होता. त्यामुळे यंदाही महायुतीत फुट पडल्यास आणि एकला चलोचा नारा दिल्यास काँग्रेसला याचा फायदा होऊ शकतो.
गेल्या वेळची निवडणूक आणि आत्ताची निवडणूक यात फरक आहे. कारण यंदाची निवडणूक ही चारही नेत्यांच्या पश्चात होणार आहे. तर स्वाभिमानी आघाडीचे निलेश येसुगडे यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. येसुगडे यांनी स्वतंत्र निवडणूक लढल्यास आणि कडवी झुंज दिल्यास राष्ट्रवादीला किंगमेकर बनण्याची संधी आहे.
याशिवाय भाजपमध्ये संग्रामसिंह देशमुख, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी जोर लावला आहे. काँग्रेस सोडून गेलेले सर्जेराव नलवडेही सध्या भाजपमध्येच आहेत. त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे ही निवडणूक सध्यातरी काँग्रेससाठी सोपी दिसत असली तरीही हळूहळू अवघड होऊ शकते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.