Dharashiv Lok Sabha 2024 News : धाराशिवमधला भाजपचा 'सेफ झोन' तुळजापूरमध्ये राणा पाटलांसाठी डेंजर झोन तर ठरणार नाही ना?

Political News : भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटलांना येत्या काळात सुनील चव्हाण यांच्या रूपाने मोठे आव्हान असणार आहे. तुळजापूर विधानसभा मतदारसंघात राणा पाटलांना अद्यापही बाहेरच्या तालुक्यातील उमेदवार समजला जातो.
Sunil Chavan, Rana Jagjitsinh Patil
Sunil Chavan, Rana Jagjitsinh Patil Sarkarnama

Dharashiv News : माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे चिरंजीव सुनील चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाने तुळजापूर मतदारसंघातील वाद आता विकोपाला जाणार आहे. भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटलांना येत्या काळात सुनील चव्हाण यांच्या रूपाने मोठे आव्हान असणार आहे. तुळजापूर विधानसभा मतदारसंघात राणा पाटलांना अद्यापही बाहेरच्या तालुक्यातील उमेदवार समजला जातो. त्यामुळे भाजपनेच या वादावर पर्याय म्हणून सुनील चव्हाण यांना तुळजापूर विधानसभेसाठी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश दिला असल्याची जोरदार चर्चा या निमित्ताने रंगल्या आहेत.

धाराशिव जिल्ह्यातील काँग्रेसला गेल्या दोन महिन्यात मोठं खिंडार पडले आहे. जिल्ह्यातील काँग्रेसचे प्रभावी नेते म्हणून माजी मंत्री बसवराज पाटील (Baswaraj Patil) यांच्याकडे पाहिले जात होते. शिवराज पाटील चाकूरकर (Shivraj Patil) यांचे मानसपुत्र आणि माजी मंत्री असलेल्या बसवराज पाटील यांनीही काँग्रेसचा हात सोडला आणि भाजपचे (Bjp) कमळ हातात घेतले. त्यानंतर माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे तुळजापूर तालुक्यात काहीसा प्रभाव होता. मात्र त्यांचे चिरंजीव सुनील चव्हाण यांनी ही भाजपमध्ये प्रवेश करत उरलेली धाराशिव जिल्ह्यातील काँग्रेस संपूर्णपणे भाजपमय झाली आहे. ( Dharashiv Lok Sabha 2024 News)

Sunil Chavan, Rana Jagjitsinh Patil
Prakash Ambedkar News : 'भाजपला एकनाथ शिंदेंची गरज संपली, पुढच्या दोन महिन्यात...' आंबेडकरांचा खळबळजनक दावा

तुळजापूर तालुक्यात भाजपने मोठा डाव टाकला आहे. यापूर्वी माजी मंत्री बसवराज पाटील यांना जवळ करीत औसा व उमरगा तालुक्यातील काँग्रेस संपवली तर त्यानंतर माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे चिरंजीव सुनील चव्हाण यांना भाजप प्रवेश देत तुळजापूर तालुक्यात आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेऊन सुनील चव्हाण यांना संधी दिली आहे. चव्हाण यांना प्रवेश देताना गेल्या विधानसभा निवडणुकीत चव्हाण यांना जवळपास 75 हजारच्या आसपास दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. ती मते भाजपकडे वळविण्याचा हा डाव असणार आहे.

दुसरीकडे राणा जगजितसिंह पाटील यांना तुळजापूरच्या तुलनेत कळंब-धाराशिव विधानसभा मतदारसंघ सुरक्षित असल्याने त्या ठिकाणाहून त्यांना निवडणूक रिंगणात उतरविले जाण्याची शक्यता अधिक आहे. या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाजप एक-एक जागा वाढवू शकतो. त्यामुळे नेमके भाजपने सुनील चव्हाणांना प्रवेश देताना काय आश्वासन दिले आहे, यावर आगामी काळातील बरीच समीकरणे अवलंबून असणार आहेत.

काँग्रेसने ज्येष्ठ नेते मधुकरराव चव्हाण यांना पाचवेळा आमदारकी, मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद, विधानसभेचे उपसभापती, परिवहन मंडळाचे अध्यक्षपद, परिवहन, दुग्धविकास व पशुसंवर्धन या खात्याचे कॅबिनेट मंत्रीपद दिले होते. एवढे सगळे देऊनही मधुकरराव चव्हाण यांनी स्वतः काँग्रेस न सोडता चिरंजीव सुनील चव्हाण यांना भाजपमध्ये प्रवेश करण्यास सांगितल्याची चर्चा जॊरात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

चार दिवसापूर्वीच माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या मदतीने सोलापूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट मधुकरराव चव्हाण यांनी घेतली. त्यावेळीच मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झाल्या होत्या. विरोधकांकडून भाजप प्रवेशासंबधी चर्चा केला असल्याचा आरोप केला जात असताना त्यांनी मी काँग्रेस सोडणार नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, तीनच दिवसात त्यांचे चिरंजीव सुनील चव्हाण यांनी भाजपचे प्रदेशाअध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित भाजप प्रवेश केला. तुळजापूर तालुक्यातील डबघाईला आलेल्या सहकारी संस्था पुनर्जीवित करण्यासाठी सुनील चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केली असल्याची चर्चा सुरु आहे.

1980-85 साली काँग्रेसने मागासलेला तालुका हा डाग पुसण्यासाठी तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखाना उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला होता. त्यानंतर हा कारखाना उभारला होता. त्यासाठी दिवंगत नेते सिद्रामप्पा आलुरे, दिवंगत नेते शिवाजीराव पाटील बाभळगावकर यांच्याशिवाय माजी आमदार नरेंद्र बोरगावकर, मधुकरराव चव्हाण यांनी या कारखान्याची उभारणी केली. त्यानंतर कुलस्वामिनी सहकारी सूतगिरणी, द्राक्ष साठवणीसाठी खंडोबा पणन ही संस्था उभारली. मात्र या तुळजापूर तालुक्यातील तीन ही संस्था सध्या डबघाईला आल्या आहेत.

Sunil Chavan, Rana Jagjitsinh Patil
Thane Lok Sabha Election : 'गुलदस्त्यात' असलेल्या ठाण्याच्या जागेवर गोगावलेंचं मोठं विधान; म्हणाले...

तुळजाभवानी कारखाना भाडेतत्वावर चालविण्यासाठी दिला आहे. तर सुनील चव्हाण हे तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आहेत. कुलस्वामिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन आहेत. खंडोबा पणन संस्थेचे चेअरमन आहेत तसेच ते उस्मानाबाद जिल्हा बँकेचे सुद्धा संचालक आहेत, याशिवाय महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव म्हणून सुद्धा त्यांनी काम केले आहे तर महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन मुंबईचे संचालक म्हणून काम पाहिले आहे. एवढे सगळे त्यांना या काँग्रेसनेच दिले आहे. हे सर्व काँग्रेसने दिले असताना सुनील चव्हाण यांनी काँग्रेस सोडून भाजपच्या वळचणीला का गेले ? याची चर्चा रंगली आहे.

Sunil Chavan, Rana Jagjitsinh Patil
Sunil Chavan Join BJP: धाराशिवमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; महाराष्ट्र काँग्रेसचे सचिव सुनील चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com