

Bhiwandi Election : आगामी भिवंडी महापालिका निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापले असून, काँग्रेसच्या उमेदवारीवरून नवीन वाद निर्माण झाला आहे. समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी संगनमत करून आपल्या समर्थकांना काँग्रेसची तिकिटे मिळवून दिल्याची चर्चा शहरात रंगली आहे. यामुळे काँग्रेस पक्षाला रईस शेख यांनी अक्षरशः 'हायजॅक' केल्याचा आरोप स्थानिक राजकीय वर्तुळातून केला जात आहे.
भिवंडी महापालिकेसाठी काँग्रेसने ६० उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र, सुत्रांच्या माहितीनुसार यांपैकी ३५ ते ४० उमेदवार हे मूळचे समाजवादी पक्षाचे किंवा आमदार रईस शेख यांच्या जवळचे आहेत. ज्यांना सपाने तिकीट नाकारले, अशा उमेदवारांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून रईस शेख यांनी काँग्रेसची तिकिटे मिळवून दिली आहेत.
रईस शेख सध्या काँग्रेसच्या तिकिटावर लढणाऱ्या या 'सपा' समर्थित उमेदवारांच्या विजयासाठी जोरदार फिल्डिंग लावत आहेत. दुसरीकडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रशीद ताहिर मोमीन हेदेखील अधिकृत उमेदवारांसाठी लॉबिंग करीत आहेत.
समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी इतर कोणत्याही पक्षासाठी काम करायचे असल्यास त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा, असा थेट इशारा समाजवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अजय यादव यांनी दिला आहे. रईस शेख यांनी ५ जानेवारीपर्यंत रजा घेतली असून त्यानंतरच त्यांच्या राजकीय भवितव्याचा निर्णय होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महापालिका निवडणुकीसाठी समाजवादीने भारतीय कम्युनिस्ट पक्षासोबत युतीची घोषणा केली आहे. वॉर्ड क्रमांक १५ मध्ये दोन्ही पक्ष संयुक्तपणे निवडणूक लढवणार असून, तिथे एक जागा कम्युनिस्ट पक्षाला सोडण्यात आली आहे. समाजवादी पक्षाने एकूण ६१ उमेदवारांना बी-फॉर्म वाटले असून, ५९ उमेदवार प्रत्यक्ष रिंगणात उतरले आहेत. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते विजय कांबळे यांनी या युतीचे स्वागत केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.