

- राहुल क्षीरसागर
Thane Election: ठाणे महापालिका निवडणुकीत देखील शिंदे सेना आणि भाजप युतीत जागा वाटपात ठाण्यात शिंदेसेना ८७ आणि भाजप ४० असे समीकरण असले तरी, शिंदे सेनेने जागा वाटपात आपला प्रभाव अधिक असल्याचे दाखवून दिले. ज्या ठिकाणी भाजपचा मतदार नाही अशा मुंब्रा आणि कळव्यातील ९ जागा शिंदे सेनेने भाजपला दिल्या आहेत. त्यामुळं भाजपच्या वाटेला ४० जागा आल्या असल्या तरी देखील ९ जागा या असून नसल्यासारखंच आहे. त्यामुळे या युतीवरून भाजपचे आमदार संजय केळकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जागा वाटपात आम्ही समाधानी नाही, पण महायुती आणि व्यापक हित लक्षात घेऊन या बाबी स्वीकाराव्या लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
ठाणे पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे सेना आणि भाजपात जागा वाटपावरून खलबत्ते सुरु होती. त्यात काही प्रभागांवरून या दोन्ही पक्षात विविध मतप्रवाह होते. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत युतीचे जागा वाटपाचे गुऱ्हाळ सुरूच होते. अशातच उमेदवारी अर्ज भरण्याच्या एक दिवस आधी रात्री शिंदे सेना आणि भाजपने युती जाहीर केली. त्यानुसार शिंदे सेनेच्या वाटेला ८७, भाजपला ४० आणि मुंब्रा विकास आघाडीला ४ जागा दिल्या आहेत. कमी जागा देण्यात येण्याच्या मुद्यावरुन भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे सूर उमटले आहेत. त्यातही काही ठिकाणी शिंदे सेनेला जमेच्या बाजू ठरतील अशा ठिकाणी कमकुवत उमेदवार दिल्याचेही यादीतून स्पष्ट होत आहे.
भाजपने आपल्या ४० उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत सुमारे २३ नवीन चेहरे दिसत असले तरी यातील काही ठिकाणी पतीच्या जागेवर पत्नी, वडीलांच्या जागेवर मुलगा अशा पध्दतीने देखील तिकीटांचे वाटप करण्यात आले आहेत. अशातच युतीमध्ये भाजपला हव्या तशा जागा या मिळालेल्या नसल्याचे चित्र आहे. भाजपने ५५ जागांची अपेक्षा केली असतांना सरतेशेवटी भाजपच्या वाटेला ४० जागा आल्या आहेत.
नाराजी व्यक्त करताना भाजपचे ठाणे शहर निवडणूक प्रमुख आणि आमदार संजय केळकर म्हणाले, "जागा वाटपात अपेक्षित जागा आम्हाला मिळाल्या नाहीत. त्याबाबत खूप वेदना आहेत. पण व्यापक हfतही महत्वाचे आहे. ज्या प्रभागात लोकांचे पूर्ण समर्थन आहे, त्या प्रभागात एकही जागा मिळाली नाही. १३१ प्रभागांत उमेदवार देता येतील एवढी तयारी आमची झाली होती. पण अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत. त्यामुळे कार्यकर्ते नाराज झाले, त्यांची समजूत काढली आहे. जागा वाटपात आम्ही समाधानी आहोत, असेही नाही. पण महायुतीचं व्यापक हित लक्षात घेऊन या बाबी स्वीकाराव्या लागतात असेही ते म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.