Raju Patil, Shrikant shinde, Eknath shinde, Raj Thackeray sarkarnama
ठाणे

Kalyan Loksabha News : मनसेच्या मतांवर कल्याण ग्रामीणची मदार...

Shivsena कल्याण ग्रामीण मधील मनसेचा मतदार हा मुळचा शिवसैनिक आहे. शिंदे यांच्यापेक्षा त्यांना ठाकरे हे कायम जवळचे राहिले आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गटाचे वर्चस्व ग्रामीण भागात जास्त दिसून येते.

शर्मिला वाळुंज

Kalyan Loksabha News : कल्याण ग्रामीण हा मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाचे वर्चस्व असलेला मतदारसंघ आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जरी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला असला तरी येथील मनसेचे आमदार राजू पाटील व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे सौख्य कसे आहे हे सर्वांना माहित आहे. शिंदे व पाटलांचे सूत फारसे जुळत नसल्याने शिंदे यांना मनसे कितपत मदत करेल याविषयी शंका आहे. येथील मनसेचा मतदार हा मुळचा शिवसेनेचा राहिला असून शिंदे यांच्यापेक्षा ठाकरे त्यांना कायम जवळचे राहिले आहेत. मनसेची बदललेली भूमिका, दुखावलेला मनसेचा मतदार, शिंदे यांच्यासोबत फाटलेले नाते पाहता या मतदारसंघाची मनसेची मते कोणाच्या बाजूने फिरणार यावर या दोन उमेदवारांच्या विजयाचे गणित टिकून राहणार आहे.

ठाणे, नवी मुंबई आणि एमएमआरडीए रिजन या भागांशी सलग्न असलेला मतदारसंघ म्हणजे कल्याण ग्रामीण. अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे विभाजन झाल्यावर कल्याण ग्रामीण मतदारसंघ नव्याने निर्माण झाला. ग्रामीण भागात भूमिपूत्र आगरी समाजाचे वर्चस्व जास्त असून त्या खालोखाल उत्तर भारतीयांची संख्या अधिक आहे. येथील भूमिपुत्रांची मते लोकसभा निवडणूक उमेदवारांसाठी निर्णायक ठरतात.

कल्याण लोकसभेच्या 2014 च्या लढतीत शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी राजू पाटील यांच्या परिवारावर घणाघात करुन प्रचारसभा लढवली होती. त्या निवडणूकीत पाटील यांचा पराभव झाला होता. तेव्हापासून पाटील आणि शिंदे यांच्यातील संबंध हे ताणले गेले. 2019 ची विधानसभा निवडणूक राजू पाटील यांनी जिंकली, शिवसेनेचे रमेश म्हात्रे यांचा त्यांनी पराभव केला. शिवसेनेने ऐनवेळी सुभाष भोईर यांचे तिकीट कापून रमेश सुकऱ्या म्हात्रे यांना उमेदवारी दिली होती.

म्हात्रे यांच्या उमेदवारीसाठी श्रीकांत यांनीच हट्ट केला होता. ऐनवेळी बदललेला उमेदवार त्यामुळे दुखावलेला भोईर गट हे मनसेच्या पथ्यावर पडले आणि मनसेचा त्याठिकाणी विजय झाला. या विजयानंतर मात्र आमदार पाटलांनी शिंदे यांच्यावर विकास कामांवर वार करण्याची एकही संधी सोडली नाही. कल्याण लोकसभा निवडणूक मनसेचे लढविण्याचे ठरविल्यास आमदार राजू पाटील यांचे नाव चर्चे होते, त्यांनी शिंदे यांच्यासमोर तगडे आव्हान उभे केले असते.

मात्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे मनसेचे कार्यकर्ते, मतदार हे दुखावले गेले आहेत. याचा शिंदेंना कितपत फायदा होईल हा कळीचा मुद्दा आहे. खासदार श्रीकांत यांनी या भागात विकास कामांचा धडाका लावला असला तरी विकास कामांचा निधी आणि श्रेयवादावरुन ही कामे कायम वादात अडकली. विकास कामातील टक्केवारी, ग्रामीण भागातील जमिनी लाटण्याचे प्रकार या ठिकाणी शिवसेनेकडून झाल्याने ग्रामस्थांमध्ये शिवसेने विरोधात नाराजीचा सुर आहे.

कल्याण ग्रामीणमधील मनसेचा मतदार हा मुळचा शिवसैनिक आहे. शिंदे यांच्यापेक्षा त्यांना ठाकरे हे कायम जवळचे राहीले आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गटाचे वर्चस्व ग्रामीण भागात जास्त दिसून येते. ठाकरे गटाने येथे वैशाली दरेकर यांना उमेदवारी दिली आहे. वैशाली यांचा ग्रामीण भागात दांडगा जनसंपर्क आहे. 2009 साली दरेकर या लोकसभा निवडणूक लढल्या असून त्यांनी 1 लाखांच्यावर मते घेतली होती. त्यात कल्याण ग्रामीणचा वाटा मोठा राहिला आहे.

वैशाली यांनी मतदारसंघ बांधून ठेवले असून उमेदवारी जाहीर होताच प्रत्येक मतदारसंघात जात भेटीगाठी घेत कामास सुरुवात केली आहे. कल्याण ग्रामीण मधून त्यांंना सपोर्ट मिळण्याची शक्यता आहे. जरे मनसेने गद्दारांना मदत नाही असे म्हटले असले तरी पारंपारिक मतदारांचा कल हा महत्त्वाचा असेल. मनसेची बदललेली भूमिका, शिंदे यांच्यासोबत फाटलेले नाते व वैशाली यांचा जनसंपर्क यामुळे ग्रामीणचा कल गुलदस्त्यात राहणार आहे. निवडणूकीलाच मनसेची मते कोठे फिरणार यावर सर्व निवडणूकीचे गणित अवलंबून असेल.

या मतदारसंघात 2019 च्या मतदार गणनेनुसार 3 लाख 49 हजार 261 मतदार आहेत. त्यात पुरुष 1 लाख 91 हजार 589 व महिला मतदार 1 लाख 57 हजार 646 आहेत. 2009 साली मनसेचे रमेश पाटील यांनी सेनेचा पराभव करत विजय मिळविला होता. रमेश पाटील यांना 51 हजार 149 मते मिळाली होती. तर शिवसेनेचे रमेश सुकऱ्या म्हात्रे यांना 41 हजार 642 मते मिळाली होती. तर 2014 साली शिवसनेने पराभवाचा वचपा काढत मनसेच्या रमेश पाटलांचा पराभव केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवसेनेचे सुभाष भोईर यांनी 44 हजार 212 मतांनी आघाडी घेत विजय मिळविला. भोईर यांना 84 हजार 110 मते मिळाली होती. तर पाटील यांना 39 हजार 898 मते मिळाली होती. 2019 च्या मनसेने पुन्हा कमबॅक केल्याचे पहायला मिळाली. रमेश पाटील यांचे बंधू राजू पाटील यांनी 93 हजार 927 मते मिळवित शिवसेनेचे रमेश म्हात्रे यांचा पराभव केला. म्हात्रे यांना 86 हजार 773 मते मिळाली होती. शिवसेनेने सुभाष भोईर यांची उमेदवारी काढून घेत रमेश पाटील यांना उमेदवारी दिली होती. यासाठी खासदार शिंदे यांनीच हट्ट केल्याचे त्यावेळी बोलले जात होते.

2014 च्या कल्याण लोकसभा निवडणूकीत मनसेच्या राजू पाटलांचा पराभव होऊन त्यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. खासदार शिंदे यांनी त्यावेळी निवडणूक जिंकली होती. या पराभवाची सल पाटलांच्या मनात कायम असल्याचे बोलले जाते. यामुळेच कल्याण ग्रामीणमधून शिवसेनेला विकास कामांवरुन किंवा इतर राजकीय मुद्द्यांवर कायम आमदार पाटील यांनी लक्ष केल्याचे पहायला मिळाले.

खासदार शिंदे व आमदार पाटील यांच्या या कलगीतुऱ्यात मुख्यमंत्र्यांनी देखील मध्यस्थी करत वातावरण शांत ठेवण्याचे प्रयत्न कायम केले आहेत. शिवसेनेला विरोध करत भाजपला सहकार्य करण्याची भूमिका मध्यंतरी मनसेने घेतली होती. मनसेच्या या भूमिकेमुळे आता जरी महायुतीला पाठिंबा मनसेने जाहीर केला असला तरी मतदारांवर कल्याण ग्रामीणची मदार राहणार आहे.

Edited By : Umesh Bambare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT