Imtiaz Jalil, Prakash Ambedkar, Chandrakant khaire sarkarnama
छत्रपती संभाजीनगर

Loksabha Election 2024 : 'वंचित'मुळे संभाजीनगरमध्ये खान विरुद्ध खान लढत...

Imtiaz Jaleel अफसर खान यांचे नाव शहरातील अवैध धंद्यांशी अनेकदा जोडले जाते. त्यामुळे ते एमआयएमच्या इम्तियाज जलील यांना कितपत डॅमेज करू शकतात, यावर संभाजीनगरातील चित्र अवलंबून असणार आहे.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar news : लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत दररोज अनेक राजकीय वेगवान घडामोडी घडत आहेत. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ आमचाच असे म्हणत दावा सांगणाऱ्या प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने इथून अफसर खान यांना उमेदवारी दिली आहे. या लोकसभा मतदारसंघाचा आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर इथे हिंदू विरुद्ध मुस्लिम म्हणजेच खान पाहिजे की बाण? या मुद्द्यावर निवडणुका लढल्या गेल्या. खान पाहिजे की बाण या जोरावर शिवसेनेने या मतदारसंघातून तब्बल सहा वेळा विजय मिळवलेला आहे.

गेल्या निवडणुकीत एमआयएम-वंचित बहुजन आघाडीच्या युतीमुळे इम्तियाज जलील यांचा विजय झाला होता. परंतु आता स्वबळावर लढणाऱ्या वंचितने इम्तियाज जलील यांच्या विरोधात काँग्रेसचे माजी नगरसेवक तथा विरोधी पक्षनेते अफसर खान यांना उमेदवारी देत संभाजीनगरच्या निवडणुकीतील खान पाहिजे की बाण हे चित्र बदलून आता खान विरुद्ध खान, अशी टक्कर निर्माण केली आहे. अफसर खान यांच्या उमेदवारीने इम्तियाज जलील यांच्या हक्काच्या मुस्लिम मतांमध्ये विभाजन होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

शिवाय प्रकाश आंबेडकरांना Prakash Ambedkar मानणारा दलित समाज पूर्णपणे अफसर खान यांच्या पाठीशी उभा राहील, ज्यामुळे वंचितला विजय मिळाला नाही तरी इम्तियाज जलील यांना दुसऱ्यांदा खासदार होण्यापासून रोखण्याची प्रकाश आंबेडकरांची खेळी यशस्वी ठरू शकते. लोकसभेचा उमेदवार म्हणून एमआयएम आणि वंचितच्या उमेदवारांची तुलना केली तर त्यात निश्चितच इम्तियाज जलील हे सरस ठरतात.

उच्चशिक्षित आणि सामाजिक प्रश्नांची जाण असलेला नेता म्हणून इम्तियाज हे गेल्या दहा वर्षांत नावारूपाला आले आहेत. खासदार होण्याआधी मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून त्यांनी केलेली कामगिरी, सामाजिक प्रश्नांवर केलेली आंदोलने आजही स्मरणात आहेत. त्यानंतर 2019 मध्ये खासदार झाल्यानंतर जिल्ह्यातील अनेक प्रश्नांना संसदेत वाचा फोडत त्यांनी एक सुशिक्षित आक्रमक आणि अभ्यासू खासदार म्हणून आपली प्रतिमा मतदारांमध्ये निर्माण केली आहे.

त्या तुलनेत वंचितने उमेदवारी दिलेले अफसर खान यांचा राजकीय अनुभव अत्यंत कमी आहे. तीन वेळा महापालिकेत नगरसेवक, विरोधी पक्षनेता आणि स्थायी समितीचे सभापतिपद हीच त्यांची राजकारणातील ओळख आहे. त्यांनी अगदी कालच वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला आणि अकोल्यात जाऊन प्रकाश आंबेडकर यांची भेट घेत संभाजीनगरमधील उमेदवारी मिळवली. वंचितकडून इम्तियाज जलील यांना रोखण्यासाठी तगडा उमेदवार दिला जाईल, अशी अपेक्षा मात्र यामुळे फोल ठरण्याची शक्यता आहे.

अफसर खान यांची जिल्ह्याच्या राजकारणात असलेली प्रतिमा पाहता त्यांचा महाविकास आघाडी एमआयएम आणि महायुतीच्या उमेदवारासमोर टिकाव लागणे कठीण असणार आहे. केवळ इम्तियाज जलील यांना विरोध करण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी अफसर खान यांना उमेदवारी दिल्याचे दिसते. शहरातील राडपुरा भागात झालेल्या दंगलीतील आरोपींचा जामीन करत अफसर खान यांनी मुस्लिम तरुणांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला आहे.

परंतु अफसर खान यांचे नाव शहरातील अवैध धंद्यांशी अनेकदा जोडले जाते. त्यामुळे ते एमआयएमच्या इम्तियाज जलील यांना कितपत डॅमेज करू शकतात, यावर संभाजीनगरातील चित्र अवलंबून असणार आहे. दुसरीकडे दोन मुस्लिम उमेदवार निवडणुकीत उभे राहिल्याने याचा थेट फायदा शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे यांना होण्याची शक्यता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवसेना पक्षात पडलेली फूट तसेच भाजपची साथ नसल्याने खैरे यांना या वेळी आपली व्हाेट बँक राखत अतिरिक्त मतांची जमवाजमव करावी लागणार आहे. महाविकास आघाडी असल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा त्यांना फायदा होणार असला तरी इम्तियाज जलील यांच्या व्हाेट बँकेला सुरुंग लागणे गरजेचे आहे. अफसर खान यांच्या उमेदवारीमुळे ही शक्यता निर्माण झाली असली तरी ते किती मोठ्या प्रमाणात एमआयएमला नुकसान पोहाेचवू शकतात, यावर खैरे यांच्या विजयाचा मार्ग ठरणार आहे.

Edited By : Umesh Bambare

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT