Police Uniform  Sarkarnama
ब्लॉग

Sarkarnama Podcast : कुणी केली पोलिसांची हाफ पँट बंद

अय्यूब कादरी

कुलाबा ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. त्यामुळे या जिल्ह्याचे नाव शिवरायांशी संबंधित असावं या विचारातून त्यांनी कुलाबा जिल्ह्याचं नामांतर रायगड असं केलं. त्यांचं शिवरायांवरचं प्रेम जगजाहीर होतं. शिवरायांचे विचार घराघरांत पोहोचवण्यासाठी त्यांनी अन्य मुख्यमंत्र्यांपेक्षा अधिक कामं केलं. छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार लंडन येथून आणण्याची घोषणाही त्यांनीच केली होती. मंत्रालयात शिवरायांचे तैलचित्र लावणे यासह पोलिसांची हाफ चड्डी बंद करून त्यांना फुल पँट देणं.....राज्य सरकारच्या सांस्कृतिक पुरस्कारांमध्ये कीर्तनकारांचा समावेश करणं, असे अनेक धाडसी निर्णय घेतले ते महाराष्ट्राचे सातवे मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांनी.

राज्याचे पहिले मुस्लिम मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला. कथित सिमेंट घोटाळ्यात सहभागाच्या आरोपावरून त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यांची कारकीर्द जशी वादग्रस्त राहिली, तशीच ती शिवरायांवरील प्रेम आणि शेतकऱ्यांना पहिल्यांदाच कर्जमाफी देणारा मुख्यमंत्री अशा धडाकेबाज निर्णयांसाठी ओळखली जाते.

राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी समाजकारणाचा वसा समर्थपणे पेलला. गेल्या काही वर्षांपासून सामाजिक कार्यकर्त्यांचा सुकाळ निर्माण झाला.... एखादं निमित्त साधून रुग्णांना किंवा गरजूंना चार-दोन केळ्यांचं वाटप करायचं आणि त्याचे फोटो प्रसिद्धीसाठी वर्तमानपत्रांकडे पाठवायचे, असे प्रकार नित्याचेच झालेत......असं असलं तरी रचनात्मक काम करणारे सामाजिक कार्यकर्ते आताही आहेत आणि पूर्वीही होते. सामाजिक काम करताना अंतुले यांनी साधारण ७५ वर्षांपूर्वी १९४५ मध्ये नदीवर धक्क्याचे बांधकाम, दोन गावांना ज़ोडणाऱ्या रस्त्यांची उभारणी श्रमदानातून केली होती. त्यांनी स्वतःही गावकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून श्रमदान केलं होतं. गोरगरिबांचा उद्धार हे त्यांचं स्वप्न होतं. ते पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री बनल्यानंतर त्यांनी शक्य ते प्रयत्न केले.

रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यातील आंबेत या गावी ९ फेब्रुवारी १९२९ रोजी हाफीज अब्दुल गफूर आणि जोहराबी या कोकणी मुस्लिम जोडप्याच्या पोटी ए. आर. अंतुले यांचा जन्म झाला. अंतुलेंचं प्राथमिक, माध्यमिक शिक्षण महामडमध्ये झालं. त्यानंतर मुंबईतून त्यांनी कायद्याची पदवी मिळवली आणि इंग्लंडमधून ते बॅरिस्टर झाले. १९६२ ते १९७६ दरम्यान ते विधानसभेचे सदस्य होते. १९६२ मध्ये त्यांनी पहिली निवडणूक श्रीवर्धनमधून जिंकली. १९६२ ते १९७६ दरम्यान त्यांनी राज्य सरकारमध्ये कायदा आणि न्यायव्यवस्था, बंदरे आणि मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री, नंतर कायदा आणि न्यायव्यवस्था, इमारत, दळणवळण आणि गृहनिर्माण आदी खात्यांची कॅबिनेट मंत्रिपदे भूषवली.

देशात आणीबाणी लागू झाल्यानंतर लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि इंदिरा गांधी यांचा दारुण पराभव झाला होता. त्यानंतर १९८० मध्ये झालेल्या निवडणुकीत इंदिरा गांधी विजयी झाल्या. काँग्रेस पक्षाला बहुमत मिळालं......अनेक राज्यांत काँग्रेसची सरकारे आली. जिथं काँग्रेसची सरकारे नव्हती तिथली सरकारं इंदिरा गांधींनी बरखास्त केली. त्यात महाराष्ट्राचाही समावेश होता. त्यावेळी राज्यात शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पुलोदचे सरकार होतं..... इंदिरा गांधींनी शरद पवारांचं सरकार बरखास्त केलं...... त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत राज्यात काँग्रेसला बहुमत मिळालं......राज्यात मुख्यमंत्रिपदासाठी नेहमीप्रमाणे रस्सीखेच सुरू झाली.

वसंतदादा पाटील, प्रतिभाताई पाटील आणि ए. आर. अंतुले मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक होते. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर या तिन्ही नेत्यांनी दिल्लीत तळ ठोकला होता. आणीबाणी लागू केल्यानंतर देशभरात इंदिरा गांधी यांच्या विरोधात वातावारणनिर्मिती झाली होती. अनेक दिग्गज नेत्यांनी काँग्रेसच्या बुडत्या जहाजातून उड्या मारत इंदिरा गांधी यांची साथ सोडली होती. काही निवडक नेते इंदिरा गांधी यांच्यासोबत राहिले. त्यात ए. आर. अंतुले यांचा समावेश होता. अंतुले हे गांधी घराण्याचे निष्ठावंत होते. राज्यातील सहकार क्षेत्रातील आणि दिग्गज मराठा नेत्यांशी दोन हात करण्याची क्षमता त्यांच्यात होती. इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी यांच्या निकटवर्तीयांमध्ये त्यांचा समावेश होता.

अंतुले हे इंदिरा गांधी यांच्याच नव्हे तर संजय गांधी यांच्याही पसंतीला उतरले होते. शिवाय बॅरिस्टर असल्यामुळे इंग्रजीसह अन्य भाषांवर त्यांचं कमालीचं प्रमुत्व होतं..... या सर्व गोष्टी अंतुले यांच्यासाठी जमेच्या बाजू ठरल्या आणि १९८० हे वर्ष महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक ठरलं..... ९ जून १९८० रोजी अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले आणि ऐतिहासिक या अर्थाने कारण ते राज्याचे पहिले मुस्लिम मुख्यमंत्री ठरले. त्यानंतर आजपावेतो मुस्लिम नेत्याला या पदावर संधी मिळाली नाही.

अंतुले यांचं जन्मगाव असलेल्या आंबेतला सुंदर समुद्रकिनारा लाभलेला होता. मात्र, बोटी लावण्यासाठी तिथं धक्का नव्हता. त्यामुळे बोटींचे मालक आणि नागरिकांची अडचण व्हायची. यावर तोडगा काढण्यासाठी अंतुले यांनी नागरिकांकडून वर्गणी जमा करून श्रमदानातून धक्का बांधण्याचा निर्णय घेतला. गावकरी त्यांच्या मदतीला धावून आले. अंतुले यांच्या गावातील लोक गरीब होते. त्यामुळे मोठी वर्गणी जमा होण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे अंतुले यांनी प्रत्येकी एक ते पाच रुपयांपर्यंत वर्गणी गोळा केली. ज्यांना पैसे देणे शक्य नाही अशांना श्रमदान करण्याची विनंती केली. त्यावेळी त्यांचं वय होते फक्त १७ वर्षे....... १९४५ मध्ये त्यांनी सावित्री नदीवरील बाणकोट खाडीत श्रमदानातून धक्का बांधला. या कामात अंतुलेंनी स्वतःही गावकऱ्यांच्या बरोबरीनं श्रमदान केलं होतं. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १७ ला जोडण्यासाठी आंबेत या त्यांच्या गावापासून लोणेरे गोरेगाव या पूर्वीच्या कुलाबा आणि आताच्या रायगड जिल्ह्यातील गावापर्यंत त्यांनी गावकऱ्यांच्या श्रमदानातून रस्ता तयार केला. समाजातील दुर्बल, गोरगरीब नागरिकांची उन्नती करण्याचं त्यांचं तरुणपणापासूनचं स्वप्न होतं..... यासाठी त्यांनी जमेल तेवढे काम केलं..... मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी संजय गांधी निराधार योजना सुरू केली. हा त्याचाच एक भाग होता.

अंतुले यांचं मुख्यमंत्री होणे ही बाब राज्यातील मराठा तसेच सहकार क्षेत्रातील दिग्गज राजकारण्यांसाठी एका धक्क्यासारखीच होती. इंदिरा गांधींना आपल्या मर्जीतील व्यक्तीला मुख्यमंत्री करायचं होतं..... शिवाय तो सहकार क्षेत्रातील दिग्गजांची दोन हात करणारा असावा, असाही त्यांचा विचार होता. अंतुलेंना सहकार चळवळीचा वारसा नव्हता, शिवाय ते कोकणातले होते. तरीही इंदिरा गांधींनी त्यांची निवड केली होती. अंतुले यांनी कामंही तशीच केली. एक व्यवस्था अस्तित्वात असताना त्याचवेळी समांतर पद्धतीने दुसरी व्यवस्था तयार होत असते किंवा कार्यरत होत असते, असे कार्ल मार्क्स सांगून गेलाय.......त्याच पद्धतीनं अंतुले यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळातही समांतर व्यवस्था कार्यरत झाली. मराठा राजकारणासाठी धक्कातंत्र ठरलेले त्यांचं मुख्यमंत्रिपद त्याच कारणाने गेले, मात्र त्याला वळण वेगळे देण्यात आले. एका मुस्लिम मुख्यमंत्र्याने छत्रपती शिवाजी महाराजांवरील प्रेमापोटी कुलाबा जिल्ह्याचे नामांतर रायगड केले. त्यापूर्वी झालेल्या एकाही दिग्गज मराठा नेत्याला हे कसं उमगले नाही, असा संदेश अंतुलेंच्या निर्णयांमुळे समाजात गेला होता. ही बाब मराठा नेत्यांना कदापिही सहन होणारी नव्हती.

पोलिस कर्मचाऱ्यांची हाफ चड्डी बंद करून त्यांच्यासाठी फुल पँट अंतुले यांनीच आणली. अंतुले यांची निर्णयक्षमता अफाट होती. एखादा निर्णय घेतला की ते प्रशासनाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहायचे. धडाकेबाज निर्णय घेणारा मुख्यमंत्री अशी त्यांची ओळखच झाली होती. तत्कालीन उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन करून त्यांनी लातूर जिल्ह्याची निर्मिती केली. त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन करून सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती केली. प्रशासकीय कामांसह अंतुले यांना कला, संस्कृती क्षेत्रातही रस होता. राज्य सरकारच्या सांस्कृतिक पुरस्कारांमध्ये कीर्तनकारांचा समावेश नव्हता. ते मुख्यमंत्री झाल्यानंतर या पुरस्कारांमध्ये कीर्तनकारांचा समावेश त्यांनी केला. शेतकऱ्यांना कर्जमाफी पहिल्यांदा अंतुले यांनीच दिली. त्यामुळे ते कायम राज्यातील शेतकऱ्यांच्या स्मरणात राहतील. लहान शेतकऱ्यांचे जवळपास ५० कोटी रुपयांचे कर्ज अंतुले यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात माफ केलं.... तोपर्यंत कर्जमाफीची प्रथा नव्हती. त्यापूर्वीच्या कोणत्याही सरकाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नव्हती. कर्जमाफीच्या या निर्णयानंतर अंतुले यांचा रिझर्व्ह बँक आॅफ इंडियासोबत वाद झाला होता.

छत्रपती शिवाजी महाराजांवरील त्यांचं प्रेम विविध निर्णयांतून दिसून आलं. मंत्रालयात आता छत्रपती शिवरायांचे एक तैलचित्र दिसतं. ते तैलचित्र अंतुले यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळातच लावलंय. मंत्रालयाच्या बाहेरून जाणाऱ्या लोकांनाही शिवरायांचे ते तैलचित्र स्पष्टपणे दिसावं.... अशी त्यांची इच्छा होती. त्यासाठी ते स्वतः मंत्रालयाबाहेर गेले. शिवरायांचे तैलचित्र स्पष्टपणे दिसतं का, याची त्यांनी स्वतः बाहेर फिरून खात्री करून घेतली होती. शिवरायांची भवानी तलवार इंग्लंडमध्ये आहे. ती परत यावी, असे सर्वांनाच वाटत असलं तरी तसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. ही तलवार परत आणण्यासाठी अंतुलेंनी ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांच्यासोबत बैठक निश्चित केली होती, मात्र ती बैठक व्हायच्या आधीच त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

मुख्यमंत्रिपदी असताना अंतुले घेत असलेले निर्णय धाडकेबाज होते. शिवरायांविषयी ते घेत असलेले निर्णय प्रस्थापित राजकारण्यांसाठी धक्कादायक होते. त्यामुळे समांतर व्यवस्था कामाला लागली होती. १९८२ मध्ये त्यांच्यावर सिंमेट घोटाळ्यात सहभागाचा आरोप झाला. देणग्या गोळा करण्यासाठी अंतुलेंनी स्थापन केलेल्या ट्रस्टचं नाव इंदिरा प्रतिभा प्रतिष्ठान असं होतं.... इदिरा गांधी यांच्या नावाने असलेल्या ट्रस्टचं नाव गैरव्यवहारात अडकणं.... इंदिरा गांधी यांच्या नावाने असलेल्या ट्रस्टचं नाव गैरव्यवहारात अडकणं, ही बाब त्यावेळच्या काँग्रेस नेत्यांना खटकली. वर्तमानपत्रांनी हे प्रकरण उचलून धरले. या प्रकरणाचे पडसाद संसदेतही उमटले. त्यामुळे देशभरात काँग्रेसची नाचक्की होऊ लागली. उच्च न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर अखेर १२ जानेवारी १९८२ रोजी अंतुले यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.

त्यानंतरही इंदिरा गांधी यांनी धक्कातंत्राचा वापर करत बाबासाहेब भोसले यांना मुख्यमंत्रिपदी विराजमान केलं होतं.... १९८९ पर्यंत आमदार राहिल्यानंतर अंतुले नवव्या लोकसभेवर निवडून गेले. ते १९९८ पर्यंत खासदार राहिले. मनमोहनसिंग यांच्या केंद्र सरकारमध्ये २००६ ते २००९ दरम्यान ते पहिले केंद्रीय अल्पसंख्याक कार्यमंत्री होते. २००९ मध्ये शिवसेनेच्या अनंत गिते यांनी त्यांचा रायगड लोकसभा मतदारसंघातून पराभव केला. अंतुलेंवरील घोटाळ्याचं प्रकरण एव्हाना सर्वोच्च न्यायालयात गेलं होतं..... १६ वर्षे चाललेल्या खटल्यातून ते अखेर निर्दोष सुटले, मात्र त्यांच्या मुख्यमंत्रिपदाचा बळी गेलेला होता. निर्दोष सुटल्यानंतर ते म्हणाले होते, मी काहीही चुकीचे केलं नव्हतं.... मला राजकीय प्रतिस्पर्ध्यांनी मला लक्ष्य केले, पण त्यांचा डाव फसला. मला धक्का बसला, मात्र ते मला नष्ट करू शकले नाहीत. नंतर त्यांची किडनी निकामी झाली. त्यावरचे उपचार सुरू असताना २ डिसेंबर २०१४ रोजी ए. आर. अंतुले यांचे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले.

अंतुले यांचे लग्न नर्गिस अंतुले यांच्याशी झालं होतं.... त्यांना एक मुलगा आणि तीन मुली अशी चार अपत्ये झाली. त्यांचे पुत्र नाविद हे राजकारणात सक्रिय होते. वडिलांच्या निधनानंतर ते राजकारणातून बाजूला गेले. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादाबाबत ए. आर. अंतुले यांचा अभ्यास चांगला होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना त्याबद्दल आदर होता. वडिलांच्या बाळासाहेबांशी असलेल्या मैत्रीमुळे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी नाविद यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्याविरोधात प्रचार केला होता. मात्र, या निवडणुकीत शिवसेनेचे अनंत गीते यांचा पराभव झाला. २०२० मध्ये नाविद अंतुले यांचं निधन झाले.

SCROLL FOR NEXT