Narendra Modi, Amit Shah Sarkarnama
देश

BJP national president : 'सुपर प्लॅनिंग'साठी ओळखल्या जाणाऱ्या भाजपला राष्ट्रीय अध्यक्षाचा घोळ मिटेना; 'या' तीन कारणांमुळे निवड 'वेटिंग'वर!

BJP leadership decision delay News : बिहार विधानसभेची निवडणूक जाहीर होंण्यापूर्वी भाजपला नवा अध्यक्ष मिळणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्राने दिली आहे. दुसरीकडे राष्ट्रीय अध्यक्ष निवडीची प्रक्रिया या तीन कारणामुळे रखडली आहे.

Sachin Waghmare

New Delhi News: बिहारमधील विधानसभा निवडणूक तोंडावर आली असली तरी भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाचा शोध सुरुच आहे. जे. पी. नड्डा यांचा कार्यकाळ लोकसभा निवडणुकीच्या आधीच संपला आहे. त्यामुळे गेल्या सव्वा वर्षांपासून भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरु आहे. बिहार विधानसभेची निवडणूक जाहीर होंण्यापूर्वी भाजपला नवा अध्यक्ष मिळणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्राने दिली आहे. दुसरीकडे राष्ट्रीय अध्यक्ष निवडीची प्रक्रिया या तीन कारणामुळे रखडली आहे.

भाजपच्या (Bjp) राष्ट्रीय अध्यक्षाची निवड होण्यास विलंब होण्यामागे काही महत्त्वाची कारणे आहेत. यातील प्रमुख कारण म्हणजे उपराष्ट्रपती पदाची निवडणूक अचानक लागली आहे. त्या कारणामुळे भाजप अध्यक्षांची निवड रखडली आहे. जगदीप धनखड अचानक राजीनामा देतील याची कल्पना भाजपने केली नव्हती. धनखड पायउतार झाल्याने उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक लागली. त्यामुळे आता ही निवडणूक भाजपसाठी प्राधान्याचा विषय आहे. त्यामुळे या निवडणुकीनंतर निवडीकडे लक्ष दिले जाणार आहे.

भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघात गेल्या काही दिवसापासून विचारमंथन सुरु आहे. भाजप आणि संघाने 100 वरिष्ठ नेत्यांची मते विचारात घेतली आहेत. यात पक्षाचे माजी अध्यक्ष, वरिष्ठ केंद्रीय मंत्री आणि संघ, भाजपशी संबंधित वरिष्ठ नेत्यांचा समावेश आहे. त्यांची मते जाणून घेण्यात आली आहेत, या दुसऱ्या कारणामुळे निवड थांबली होती.

राष्ट्रीय अध्यक्ष पदाची निवडणूक रखडण्यामागचं तिसरे महत्त्वाचे कारण म्हणजे गुजरात, उत्तर प्रदेश, कर्नाटकसह अनेक राज्यांमध्ये प्रदेशाध्यक्ष निवडण्यास होत असलेला विलंब आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं गृहराज्य असलेल्या गुजरातमध्ये भाजपला अद्याप नवा प्रदेशाध्यक्ष मिळालेला नाही. योगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेशातही हीच स्थिती आहे. या दोन्ही राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे.

गुजरात भाजपचे अध्यक्षपद सध्याच्या घडीला केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील यांच्याकडे आहे. सध्या त्यांच्याकडे जलशक्ती मंत्रिपदाचा कार्यभार आहे. मोदी, शहांच्या गुजरातमध्ये भाजपचे नेतृत्त्व कोणाकडे जाणार याबद्दल राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशात वेगळाच पेच निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जवळच्या नेत्याकडे प्रदेशाध्यक्षपद देण्याची भाजपच्या नेतृत्त्वाची तयारी नाही. तशी नियुक्ती झाल्यास राज्य सरकारसह संघटनेवर योगी यांचे वर्चस्व निर्माण होण्याची भीती आहे. त्यामुळे दुसऱ्या व्यक्तीकडे धुरा दिली जाण्याची दाट शक्यता आहे

या तीन कारणांमुळे गेल्या काही दिवसापासून भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड होण्यास विलंब लागत आहे. मात्र, बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला नवा अध्यक्ष मिळणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्राने दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT