Mallikarjun Kharge Sarkarnama
देश

Mallikarjun Kharge : एक मोदी सर्वांना भारी म्हणतात, मग हे मणिपूरला का जात नाहीत? खर्गेंचा सवाल

Ganesh Thombare

Delhi News : काँग्रेसचे नेते, खासदार राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो न्याय यात्रेचा' मार्ग काँग्रेसने जाहीर केला आहे. 67 दिवसांत एकूण 6700 किमीहून अधिक अंतराची ही 'भारत जोडो न्याय यात्रा' असणार आहे. देशातील 14 राज्यांमधून ती मार्गक्रमण करणार आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वात याआधीदेखील 'भारत जोडो यात्रा' काढण्यात आली होती.

'भारत जोडो न्याय यात्रेचा' लोगो आणि यात्रेची थीम व सॉंगही आज लाँच करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवरच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पत्रकार परिषद घेत सविस्तर माहिती दिली. तसेच यावेळी खर्गेंनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका करीत 'एक मोदी सर्वांना भारी अशा घोषणा देतात, मग हे एकटे मणिपूरला का जात नाहीत ?' असा खोचक टोला खर्गेंनी भाजपला लगावला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खर्गे म्हणाले, '14 तारखेला 'भारत जोडो न्याय यात्रा' सुरू करीत आहोत. मणिपूर ते मुंबई असा यात्रेचा 15 राज्यांतून प्रवास होणार आहे. यात्रेचा समारोप मुंबईत होईल. देशातील महत्त्वाच्या विषयांना घेऊन आम्ही ही यात्रा काढत आहोत. मणिपूरची घटना आपण पाहिली. मोदी समुद्रात जाऊन पोहतात, फोटोशूट करतात. केरळ, मुंबईत जाऊन प्रत्येक वेळी नवीन कपडे घालून फोटो काढतात. पण हे मणिपूरमध्ये जात नाहीत. महिलांवर अत्याचार झाले. लोक मरत आहेत, मात्र हे तिकडे जात नाहीत. यांना लक्षद्वीपला जायला वेळ आहे. पण मणिपूरला जायला नाही,' असा हल्लाबोल खर्गेंनी केला.

'संसदेत म्हणतात, की एक मोदी सगळ्यांना भारी. मग हे एकटे मणिपूरला का जात नाहीत ? त्यामुळे या राष्ट्रीय मुद्यांना घेऊन आम्ही यात्रा काढत आहोत. चर्चा, संवाद असे मुद्दे याही यात्रेत असतील. जसं आधीच्या 'भारत जोडो न्याय यात्रे'त होतं तसंच पूर्ण पक्ष राहुल गांधी यांच्यासोबत आहे. आम्ही संसदेत आमचं मत मांडायला सुरुवात केली, तिथं हे मुद्दे आम्हाला मांडू दिले नाहीत. जे खासदार शांत बसले होते, त्यांनाही यांनी संसदेतून निलंबित केलं. हे देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं. पंतप्रधानदेखील एकदाही राज्यसभेत आले नाहीत,' असंही खर्गे म्हणाले.

'आता आम्ही लोकांना सांगायला निघालो आहोत. शेतकरी, व्यापारी, आदिवासी, गरीब या यात्रेत आम्हाला भेटणार आहेत. त्यांची मत ऐकून घेण्यासाठी हा प्लॅटफॉर्म आम्ही वापरत आहोत. माध्यमांच्या सहकार्याची आम्हाला गरज आहे. संविधान जिवंत ठेवण्यासाठी आम्हाला तुमची गरज आहे. स्वातंत्र्यापूर्वी बनवलेले कायदे या सरकारने काढून घेतले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेले कायदे यांनी काढून घेतले. सगळ्यांना घाबरवण्यासाठी या सगळ्या गोष्टी सुरू आहे. ही एका हुकूमशहाची निशाणी आहे,' असा घणाघात मल्लिकार्जुन खर्गेंनी केला.

'आम्ही 'इंडिया' आघाडीचे नेते, मित्रपक्ष, सामान्य लोकांना सहभागी होण्यासाठी निमंत्रित केलं आहे. सगळ्यांनी यात सहभागी व्हावं, यासाठी आताही निमंत्रण देतो आहोत. भाजप खुलेआम ईडी, 'सीबीआय'कडून विरोधी पक्षातील नेते आणि त्यांच्या नातेवाईकांवर टार्गेट करण्यात येत आहे. घाबरवण्यासाठी या गोष्टी भाजप (BJP) करीत असून कुठल्यातरी केसवर त्यांना आत टाकतात आणि ते भाजपसोबत आले तर त्यांना क्लीन चिट देतात, असा गंभीर आरोप मल्लिकार्जुन खर्गेंनी भाजपवर केला.

(Edited By Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT