Bharat Rashtra Samiti Vs Congress : Telangana Politics Sarkarnama
देश

Telangana Politics : काँग्रेसचा 'सहा कलमी' वचननामा BRS ला सत्तेतून खाली खेचणार? गेमचेंजर डाव...

राजेंद्र त्रिमुखे

Telangana Politics : तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या मदतीला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची मोठी "टीम" दाखल झालेली असून, काँग्रेसचे सहा कलमी वचनपत्र तेलंगणात गेम चेंजर ठरणार, असा विश्वास काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व तेलंगणातील पालेर मतदारसंघाचे निरीक्षक विनायकराव देशमुख यांनी व्यक्त केला आहे. (Latest Marathi News)

तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार रेवंत रेड्डी व तेलंगणा काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आ. भट्टी विक्रमार्क मल्लू यांच्या सहीने प्रकाशित करण्यात आलेले सहा कलमी वचन पत्र तेलंगणा विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरेल," असा विश्वास पालेर मतदारसंघाचे निरीक्षक विनायकराव देशमुख यांनी व्यक्त केला. देशमुख सध्या खमन जिल्ह्यातील पालेर येथे ठाण मांडून असून, सोनिया गांधी, राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, खासदार राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटीने तयार केलेले सहा कलमी हमीपत्र प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचविण्याच्या कामावर देशमुख लक्ष ठेवून आहेत.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे विशेष निरीक्षक व माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, तेलंगणा काँग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे, काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय सचिव रोहित चौधरी, लोकसभा क्षेत्राचे निरीक्षक माजी मंत्री नसीम खान, पालेर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार माजी खासदार पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी व खम्मन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पी.दुर्गाप्रसाद यांच्याशी समन्वय ठेवून देशमुख प्रचार यंत्रणेत कार्यरत आहेत.

याबाबत अधिक माहिती देताना देशमुख म्हणाले की, तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटीचे सहा कलमी हमीपत्र क्रांतिकारक असून, त्यावर प्रदेशाध्यक्ष खासदार ए. रेवंत रेड्डी व विधिमंडळ नेता आमदार भट्टी विक्रमार्क मल्लू यांच्या सह्या आहेत. तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सहा कलमी हमीपत्रात "महालक्ष्मी" योजनेअंतर्गत महिलांना दरमहा रुपये अडीच हजार मानधन, पाचशे रुपयात गॅस सिलिंडर व राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये मोफत प्रवास याची हमी देण्यात आलेली आहे.

"रायतु भरोसा" योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्यास प्रतिवर्षी १५००० रुपये सानुग्रह अनुदान, शेतमजुरांना वार्षिक १२००० रुपये अनुदान, पॅडी पिकासाठी पाचशे रुपये अनुदान देण्याची हमी आहे. 'गृहज्योति' योजनेअंतर्गत राज्यातील प्रत्येक कुटुंबाला २०० युनिट मोफत वीज तर "इंदिराम्मा" योजनेअंतर्गत बेघरांना घरासाठी जागा व बांधकामासाठी ५ लाख रुपयाचे अनुदान याची हमी देण्यात आली आहे. "युवा विकासम" अंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी रुपये ५ लाखांपर्यंतचे कार्ड, प्रत्येक मंडळात एका आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळेची स्थापना याची हमी देण्यात आली असून, ज्येष्ठ नागरिकांना प्रतिमाह रु. ४०००/- इतकी पेन्शन व १० लाखाचा आरोग्य विमा देण्याची हमी देण्यात आली आहे, अशी माहिती विनायक देशमुख यांनी दिली आहे.

तेलंगणातील राजकीय वातावरण सध्या झपाट्याने बदलत असून, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन रेड्डी यांच्या भगिनी श्रीमती शर्मिला यांनी काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिला आहे. ३० नोव्हेंबर ३० रोजी होणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला बहुमत मिळेल आणि तेलंगणात काँग्रेस पक्ष सरकार स्थापन करेल, असा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT