Narendra modi- Hd devegowda-Kumarswami Sarkarnama
देश

Loksabha Election 2024 : माजी पंतप्रधानांच्या पक्षाला भाजपने सोडल्या फक्त चार जागा

Karnataka Politics : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी चर्चा करून या गोष्टींना अंतिम रूप देण्यात येणार आहे.

Vijaykumar Dudhale

Bangalore News : कर्नाटकात भारतीय जनता पक्ष आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाची युती झाली आहे. या दोन्ही पक्षांमध्ये लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात चर्चा झाली आहे. पाचपैकी तीन राज्यांत सत्ता मिळविलेल्या भाजपचा विश्वास सध्या उंचीवर असून भाजपने धजदला फक्त चार जागा देण्याची तयारी दर्शविली आहे. माजी पंतप्रधान आणि पक्षाचे अध्यक्ष एच. डी. देवेगौडा तसेच माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन जागावाटपासंदर्भात चर्चा केली. त्यात चार जागा देण्याची तयारी भाजपने दाखवली आहे. (BJP will leave only four Lok Sabha seats to Deve Gowda...)

एच. डी. देवेगौडा आणि कुमारस्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन जागा वाटपाबाबत बोलणी केली. त्यात मोदींनी धर्मनिरपेक्ष जनता दलाला चार जागा देण्याचे मान्य केले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी चर्चा करून या गोष्टींना अंतिम रूप देण्यात येणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

देवेगौडा आणि कुमारस्वामी यांनी पंतप्रधान मोदी यांची संसद भवनातील पंतप्रधान कार्यालयात भेट घेतली. त्या वेळी जागा वाटपाबाबत चर्चा झाली. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने धजदला सात जागा सोडाव्यात, अशी मागणी कुमारस्वामी यांनी केली होती. मात्र, भाजपकडून त्यांना चार जागा देण्यात येतील, असे सांगण्यात आले आहे.

कर्नाटकातील हासन, मंड्या, तुमकूर, चिक्कबळ्ळापूर, कोलार, म्हैसूर आणि बंगळूर ग्रामीण मतदारसंघ हे सात मतदारसंघ आम्हाला सोडण्यात यावेत, अशी मागणी कुमारस्वामी यांनी भाजप नेत्यांकडे केली होती. मात्र, केवळ चारच जागा देण्याची तयारी भाजप नेत्यांनी घेतली आहे. त्यात हासन, मंड्या, चिक्कबळ्ळापूर आणि बंगळूर ग्रामीण या चार जागा धजदला देण्याची तयारी दाखवली आहे.

देवेगौडा यांचा धर्मनिरपेक्ष जनता दल हा जुन्या म्हैसूर भागात स्ट्राँग आहे. त्यामुळे या भागातील चार जागा धजदला देऊन उर्वरीत जागांवर आपले उमेदवार उभे करण्याचे डावपेच भाजपकडून आखण्यात आले आहेत. धजदच्या मदतीने कर्नाटकातून किमान २० जागा निवडून आणण्याचे डावपेच भाजपने आखले आहेत. कुमारस्वामी हे भाजपचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र यांच्याशी याबाबत लवकरच चर्चा करणार आहेत.

'लोकसभा जागावाटपाचा अंतिम निर्णय लवकरच होईल'

आमचा पक्ष जेवढा जागा जिंकेल, तेवढेच मतदारसंघ आम्ही भारतीय जनता पक्षाकडे मागणार आहोत. जागावाटपाबाबत कोणताही संभ्रम नाही. याबाबत लवकरच अंतिम निर्णय होईल, असे कुमारस्वामी यांनी भेटीनंतर सांगितले. मी किंवा निखिल कुमारस्वामी लोकसभा निवडणूक लढवणार नाही. मी लोकसभा लढण्याचा प्रश्नच येत नाही. निखिलही दोनदा निवडणूक हरला आहे. पक्षाने त्यांना उमेदवारी देण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी सांगितले.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT