VP Election 2025: उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंग झाल्यानं इंडिया आघाडीला मोठा झटका बसला होता. त्यांच्याकडं असलेल्या एकूण मतांपैकी जवळजवळ एक डझन कमी मतं त्यांच्या उमेदवाराला मिळाली होती. पण या निवडणुकीबाबत एक खळबळजनक आरोप तृणमूल काँग्रेसचे खासदार तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी बुधवारी केला. या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयी झालेल्या भाजपने प्रत्येक खासदाराला १४ ते १५ कोटी रुपये देऊन त्यांची मतं खरेदी केली, असा दावा त्यांनी केला आहे.
अभिषेक बॅनर्जी म्हणतात, "काल, मी काही लोकांशी बोललो आणि मला कळलं की त्यांनी (भाजप) प्रत्येक खासदारावर त्यांची मतं खरेदी करण्यासाठी १५-२० कोटी रुपये खर्च केले. निवडून आलेले प्रतिनिधी जनतेचा विश्वास आणि भावना विकत आहेत. प्रतिनिधी विकत घेता येतात, पण लोकांना नाही," असा आरोप तृणमूल काँग्रेसमध्ये ममता बॅनर्जींनंतर दुसऱ्या क्रमांकाचे मानले जाणारे अभिषेक बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत, भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांनी इंडिया ब्लॉकच्या बी सुदर्शन रेड्डी यांचा पराभव केला. एकूण ७८७ मतांपैकी एनडीएच्या उमेदवाराला ४५२ मते मिळाली, तर रेड्डींना ३०० मते मिळाली. चौदा खासदार गैरहजर राहिले, तर १५ मते अवैध घोषित करण्यात आली.
बॅनर्जी पुढे म्हणाले, "आमच्या खासदारांच्यावतीनं, लोकसभेतील २८ आणि राज्यसभेतील २३ खासदारांपैकी सर्व ४१ जण उपस्थित होते. त्यांनी आमचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांना मतदान केलं. हे गुप्त मतदान असल्यानं, क्रॉस-व्होटिंग झालं की विरोधी सदस्यांची मतं रद्द झाली हे सांगणं कठीण आहे. यामध्ये एक सिद्धांत असा असू शकतो की सर्व विरोधी सदस्यांनी मतदान केलं आणि जर सर्व १५ विरोधी सदस्यांची मतं रद्द केली गेली तर क्रॉस-व्होटिंग होऊ शकलं नसतं. जर तुम्ही ५०-५० च्या विभाजनाचा विचार केला तर कदाचित ५-७ लोकांनी क्रॉस-व्होटिंग केलं असेल," असंही ते पुढे म्हणाले.
२०२१च्या पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत आणि महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीत भाजपनं पैशाचा खेळ खेळला असा आरोप करत बॅनर्जी म्हणाले, "अशा अनेक निवडणुका आहेत जिथं पैशाच्या भांडणात आमदारांची खरेदी-विक्री झाली आहे आणि सरकारं कोसळली आहेत. २०२४ मध्येही त्यांनी (भाजप) काहींना ५,००० रुपये आणि काहींना १०,००० रुपये देऊन मतदान एजंट खरेदी करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मतदान एजंट खरेदी करण्यासाठी हजारो रुपये खर्च केले. पण बंगालच्या लोकांनी तृणमूलला मतदान केलं. बंगालच्या लोकांनी त्यांना दाखवून दिलं की नेते खरेदी करता येतात, पण लोकांना नाही"
बंगालमध्ये मतदार याद्या सखोल पुनरर्परिक्षण मोहिमेबाबत बॅनर्जी म्हणाले, त्यांचा पक्ष न्यायालयाच्या आत आणि बाहेर याविरोधात लढा देईल. निवडणूक आयोग आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकलेला नाही. त्यांना सर्वोच्च न्यायालयातही विरोध झाला आहे, जिथं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं की त्यांना ओळखीच्या पुराव्यासाठी बारावा दस्तऐवज म्हणून आधार स्वीकारावा लागेल. इथंच ते आधीच हरले आहेत"
"जर निवडणूक आयोगाला मृत मतदारांना काढून टाकायचे असेल, तर ही तीच मतदार यादी आहे ज्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी २०२४ मध्ये निवडून आले होते. जर ती यादी अवैध असेल, तर सध्याचे निवडून आलेले सरकार, पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ सर्व अवैध आहेत. अशा परिस्थितीत, त्यांनी राजीनामा द्यावा, लोकसभा विसर्जित करावी आणि देशभरात एसआयआर करावा. अशा परिस्थितीत, आम्ही त्याचे समर्थन करू", अशी ठाम भूमिकाही यावेळी अभिषेक बॅनर्जी यांनी मांडली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.