Rahul Gandhi Sarkarnama
देश

Rahul Gandhi : आधी दोस्ती, नंतर दुश्मनी; राहुल गांधींचं 'या' बड्या नेत्याबरोबर नेमकं कुठं बिनसलं ?

Bharat Nyay Yatra : मणीपूर, आसाममध्ये चांगली कामगिरी करूनही काँग्रेसने हिमंता बिस्वा सरमांकडे दुर्लक्ष केले

Sunil Balasaheb Dhumal

Congress Political News : राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा सुरू आहे. यात्र सध्या पश्चिमबंगालमध्ये असली तरी आसाममधून बाहेर पडता पडता राहुल गांधींना अनेक अडचणींचा सामाना करावा लागला. यात्रेला आसाम सरकारकडून परवानगी मिळाली नव्हती. त्यातून राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी दिले होते. यावरून गांधींनी त्यांच्यावर सडकून टीका केली. दरम्यान, भाजपमध्ये येण्यापूर्वी हिमंता बिस्वा सरमा हे राहुल गांधींचे चांगले मित्र होते. आता त्यांच्यातून विस्तवही जात नाही. या चांगल्या मित्रांत नेमके बिनसले कुठे, अशीच चर्चा सुरू आहे.

एकेकाळी राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) टीममध्ये असलेले हिमंता बिस्वा सरमा आज काँग्रेसचे सर्वात मोठे शत्रू बनले आहेत. 2016 मध्ये बिस्वा भाजपमध्ये आल्यापासून दोघेही उघडपणे एकमेकांवर शाब्दिक हल्ला करत आहेत. भारत जोडो न्याय यात्रा आसाममध्ये पोहोचताच हा वाद पुन्हा एकदा चर्चेत आला. हिमंता बिस्वा यांनी भारत जोडो न्याय यात्रेचे वर्णन 'मियाँ यात्रा' असे केला. याला उत्तर देताना गांधींनी मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचा देशातील सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला होता. राहुल गांधी म्हणाले होते, 'भारतातील सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आहेत.'

गांधींच्या आरोपांना उत्तर देताना सरमा यांनीही समचार घेतला. ते म्हणाले, 'देशातील सर्वात भ्रष्ट कुटुंब म्हणजे गांधी कुटुंब. बोफोर्स ते भोपाळ गॅस घोटाळ्यात अँडरसनला बेदखल करण्यापर्यंत… सगळ्यात भ्रष्ट कुटुंब म्हणजे गांधी कुटुंब, असा पलटपवार बिस्वांनी केला. तसेच 'राहुल यांचे आडनाव अजिबात गांधी नाही. ते डुप्लिकेट नावे घेऊन फिरत आहेत. जर डुप्लिकेट परवाना असता तर मी तो पकडला असता, पण डुप्लिकेट नाव ठेवण्याचे काय परिणाम होतात, हे मला माहीत नाही, असेही त्यांनी सुनावले.

आधी ठरलेल्या मार्गाऐवजी वेगळ्या मार्गाने यात्रा काढल्याचा करण्यात आला. राहुल गांधींना त्यांची यात्रा आसामची राजधानी गुवाहाटीमधून काढायची होती, पण त्यांना परवानगी मिळाली नाही. यावर (Himanta Biswa Sarma) हिमंता बिस्वा सरमांनी एक दिवस आधीच माहिती दिली होती. 'परवानगी न घेता शहरातून यात्रा काढली, तर पोलिस संरक्षण दिले जाणार नाही. तसेच गुन्हाही दाखल केला जाईल. दोन-तीन महिन्यांनी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीनंतर त्याला अटक करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

नेमकं कुठं बिनसलं ?

दरम्यान, हिमंता बिस्वा हे राहुल गांधी यांचे निकटवर्तीय होते. सरमा यांनी 2001 मध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश करून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. ते चार वेळा आमदार होते आणि 20 वर्षे आसामच्या सर्व मंत्रिमंडळात मंत्री म्हणूनही काम केले. 2012 मध्ये राहुल यांनी मणिपूरची जबाबदारी हिमंता यांच्याकडे सोपवली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने येथे उत्कृष्ट कामगिरी केली. 60 पैकी 40 जागा काँग्रेसच्या खात्यात गेल्या. या विजयाचे मोठे श्रेय हिमंता बिस्वा यांना जाते. दरम्यान, 2011 च्या आसाम विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने हिमंता यांना राज्याचे प्रभारी बनवले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने राज्यातील विधानसभेच्या 126 पैकी 78 जागा जिंकल्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पक्षाच्या मोठ्या विजयानंतर सरमांना मुख्यमंत्री होण्याची आशा होती. हायकमांडने मात्र तरुण गोगोई यांना सलग दोनदा राज्याचे मुख्यमंत्री बनवले. त्यावेळी हिमंता यांनी राहुल आणि सोनिया गांधी यांचीही भेट घेतली, पण काही उपयोग झाला नाही. यातच सरमा आणि तरुण गोगोई यांच्यात मतभेद वाढले होते. यातूनच सरमांनी 2015 मध्ये मंत्रालय, विधानसभा आणि नंतर काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. भाजपने या संधीचा पुरेपूर फायदा घेतला. ऑगस्ट 2015 मध्ये, गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी त्यांचे भाजपमध्ये स्वागत करण्यात आले. भाजपने त्यांना राज्य निवडणूक व्यवस्थापन समितीचे निमंत्रक करत मोठी संधी दिली.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT