B. S. Yediyurappa-Basavraj Bommai
B. S. Yediyurappa-Basavraj Bommai Sarkarnama
देश

BJP News : भाजपच्या बड्या दोन नेत्यांमध्ये पुन्हा दुरावा

सरकारनामा ब्यूरो

बंगळूर : भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते बी. एस. येडियुराप्पा (B. S. Yediyurappa) आणि मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) यांच्यामध्ये पुन्हा दुरावा निर्माण झाल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी त्याचा इन्कार केला आहे. आम्हा दोघांचे नाते पिता-पुत्रासमान असल्याचे बोम्मई यांनी सांगितले आहे. (Yediyurappa-Basavaraj Bommai rift again)

काँग्रेस नेते सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांच्यातील मतभेद आणि वैर हे उघड सत्य आहे. भाजपचे नेते अनेकदा त्यांचा उल्लेख करतात. अशीच स्थिती कर्नाटकच्या भाजपत निर्माण झाली आहे की काय, अशी चर्चा होऊ लागली आहे. येडियुराप्पा आणि बोम्मई यांच्यात मतभेद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

येडियुराप्पा यांना औपचारिक निमंत्रण न मिळाल्याने कोप्पळ येथील भाजप भवनाच्या उद्‍घाटन समारंभात ते सहभागी होणार नसल्याची चर्चा होती. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यासंबंधीचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये फिरत असताना पक्षाच्या सदस्यांनी येडियुराप्पा यांच्याकडे धाव घेतली. नंतर संध्याकाळी, माजी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने पत्रक काढले की, येडियुराप्पा या कार्यक्रमाला उपस्थित होते.

येडियुराप्पा यांनी कुनिगल आणि तुमकूर येथील जनसंकल्प यात्रेला नकार दिल्याचे सांगितले जात असले तरी दोन्ही नेते एकत्र सहभागी होण्याची अपेक्षा आहे. गुजरात सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी ते अहमदाबादला रवाना झाले, तेव्हा मतभेदाचा आणखी एक मुद्दा समोर आला. येडियुराप्पा नियमित फ्लाईटने आले, तर बोम्मई स्पेशल फ्लाइटने आले. पण स्पेशल फ्लाइटमध्ये दोन फ्री सीट्स उपलब्ध होत्या.

भाजपचे राज्य उपाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी सांगितले की दोन्ही नेत्यांमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी म्हणाले की, ‘येडियुराप्पा यांच्याकडे राष्ट्रीय जबाबदारी आहे आणि ते राज्याच्या कार्यक्रमात सर्वत्र असू शकत नाहीत.’’

भाजपचे प्रवक्ते कॅप्टन गणेश कर्णिक यांनीही हे मतभेद म्हणजे केवळ चर्चा असल्याचे सांगितले. मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव आणि होन्नाळीचे आमदार एम. पी. रेणुकाचार्य यांनी याबाबत आपल्याला काहीच माहिती नसल्याचे सांगितले.

जनता त्यांना धडा शिकवेल

कोप्पळ येथे पत्रकारांशी बोलताना बोम्मई म्हणाले, ‘‘येडियुराप्पा यांच्याशी माझे संबंध बिघडल्याचे वृत्त निव्वळ खोटे आहे. पण जर कोणी असा विचार करत असेल तर त्यांची निराशा होईल. राज्यातील जनतेची दिशाभूल करण्यासाठी खोट्या बातम्या पसरवून संभ्रम निर्माण करण्याचा काँग्रेसचा डाव असेल. येत्या निवडणुकीत राज्यातील जनता त्यांना धडा शिकवेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT