Yogendra Yadav  Sarkarnama
देश

Yogendra Yadav News : महाराष्ट्रासह इतर राज्यात कोणाला किती जागा; योगेंद्र यादवांनी थेट आकडाच सांगत केला मोठा दावा

Sachin Waghmare

Dehli News : लोकसभेच्या सहा टप्प्यातील मतदान पार पडले. त्यामुळे आता सर्वांना 4 जूनच्या निकालाची उत्सुकता लागली आहे. राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघासाठी मतदान पार पडले. त्यामुळे आता सत्ताधारी व विरोधक वेगवेगळे दावे करत आहेत. एकीकडे भाजप 400 जागा जिंकण्याचा दावा करत आहे. दरम्यान, राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी विविध राज्यात कोणाला किती जागा मिळणार याचा अंदाज वर्तवत मोठा दावा केला आहे.

राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव (Yogendra Yadav)यांच्या मते, महाराष्ट्रात 2019 च्या निवडणुकीत भाजपला (BJP) युतीमध्ये असताना 42 जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत भाजपने या ठिकाणी 28 जागा लढल्या आहेत. तर मित्र पक्ष असलेल्या शिवसेना एकनाथ शिंदे गटाने 15 तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने 5 जागी निवडणूक लढवली आहे. या ठिकाणी भाजप व मित्रपक्षाचे जवळपास 20 जागांचे नुकसान होताना दिसत आहे. याचा अर्थ महायुतीला या ठिकाणी 22 जागा मिळतील तर महाविकास आघाडीला (MVA) 26 जागा मिळतील, अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे. (Yogendra Yadav News)

योगेंद्र यादव यांच्या अंदाजानुसार याठिकाणी भाजपच्या जागा 5 ने कमी म्हणजे गेल्यावेळेस 23 जागा जिंकल्या होत्या. यावेळेस त्या जागा कमी होऊन भाजपला 18 जागा मिळतील. तर मित्र पक्ष लढत असलेल्या 20 पैकी शिवसेना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गट मिळून चार जागा निवडून येतील. याचा अर्थ त्यांच्या 16 जागा कमी होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या ठिकाणी भाजपचे नुकसान कमी तर मित्रपक्षाचे नुकसान जास्त होताना दिसत आहे.

देशातील चित्र काय असणार

भाजपला केरळ, तमिळनाडू व पुदुचेरीमध्ये प्रत्येकी दोन जागांचा फायदा होत आहे तर आंध्रप्रदेशमध्ये भाजपचे तीन तर मित्रपक्षांच्या 12 जागा येताना दिसत आहेत. तेलंगणामध्ये भाजप व काँग्रेसमध्ये सरळ लढत होत असून त्यामुळे या ठिकाणी भाजपच्या चार जागा वाढल्यास आठ जागा होणार आहेत.

ओरिसात भाजपकडे आठ जागा आहेत, त्यामध्ये चार जागा वाढल्या तर 12 जागा होतील. त्यामुळे दक्षिण भारतामध्ये भाजपला 13 जागांचा तर मित्रपक्षाला 14 जागांचा फायदा होताना दिसत आहे. दक्षिण भारतामधील कर्नाटक राज्यात मोठे फेरबदल होत असून या ठिकाणी काँग्रेसला 13 जागांचा फायदा होताना दिसत आहे. त्याउलट भाजपला गेल्यावेळेस 25 जागा मिळाल्या होत्या आता 13 जागांचे नुकसान होणार असल्याने त्यांना आता 12 जागा मिळू शकतात.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पश्चिम बंगलामध्ये गेल्यावेळेसच्या भाजप 18 जागा टिकवून ठेवले असे चित्र आहे. दक्षिण भारत व पूर्वेत्तर भारतात भाजपच्या जागा वाढणार ही नाहीत व कमी होणार नाहीत. त्यामुळे या ठिकाणी त्यांना कोणता फायदा होताना दिसत नाही. भाजपच्या मित्रपक्षाला या ठिकाणी 15 जागांचा फायदा होताना दिसत आहे.

राजस्थान व गुजरात मिळून दोन राज्यात भाजपचे 10 जागांचे नुकसान होणार आहे. तर मध्यप्रदेश, छत्तीसगड व झारखंड या तीन राज्यात भाजपचे 10 जागांचे नुकसान होताना दिसत आहे तर दिल्ली व हरयाणा मिळून भाजपला 10 जागा कमी मिळणार आहेत. पंजाब, हिमाचल प्रदेश, चंदीगड व जम्मू काश्मीरमध्ये 5 जागांचे भाजपचे नुकसान होईल, असा दावा यादव यांनी केला आहे.

उत्तरप्रदेशमध्ये गेल्या निवडणुकीत भाजपला 62 जागा मिळाल्या होत्या. उत्तरप्रदेश व उत्तराखंड मिळून भाजपला 10 जागा कमी मिळू शकतात तर बिहारमध्ये गेल्या निवडणुकीत 40 पैकी 40 जागा मिळाल्या होत्या. याठिकाणी भाजप व मित्रपक्ष मिळून 15 जागांचे नुकसान होऊ शकते, असा अंदाज योगेंद्र यादव यांनी वर्तवला आहे.

त्यामुळे एकूण भाजपला 55 सिटचे नुकसान होत आहे. त्यामुळे गेल्यावेळेसच्या 303 जागेवरून भाजप 248 च्या आसपास येईल तर मित्रपक्षाच्या 25 जागा होत्या त्यामध्ये 15 जागांचे होणारे नुकसान बघितले तर एकूण 10 जागा वाढणार आहेत. त्यामुळे भाजप व एनडीए आघाडी 258 जागापर्यंत पोहचेल, असा दावा योगेंद्र यादव यांनी केला आहे.

देशातील आकडेवारी पहिली तर भाजपला 240 ते 260 मिळतील तर मित्रपक्षाला 30 ते 40 जागा मिळतील तर दुसरीकडे काँग्रेसला 85-100 तर इंडिया आघाडीतील इतर पक्षांना 120 ते 135 इतक्या जागा मिळतील, असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.

भाजप 2019 पेक्षा मोठा विजय मिळवेल, असा त्यांचा दावा आहे, पण तसे प्रत्यक्षात होताना दिसत नाही. भाजप 250 पेक्षा कमी जागा जिंकेल. तर इंडिया आघाडी एकत्र केल्यास 205-235 जागांवर पोहोचेल, असा त्यांचा अंदाज आहे. त्याशिवाय येत्या काळात जर बिहार व उत्तरप्रदेश, दिल्ली व हरयाणामध्ये मोठा फेरबदल झाला तर इंडिया आघाडीदेखील बहुमतानजीक पोहचू शकते, असा दावा त्यांनी केला आहे.

SCROLL FOR NEXT