Ajit Pawar In Naded News Sarkarnama
महाराष्ट्र

Ajit Pawar News : राष्ट्रवादीत येणाऱ्या प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण होतील, आगीतून फुफाट्यात पडलो असे होणार नाही! अजितदादांचा वादा..

Ajit Pawar assures that all those joining the party will have their expectations fulfilled, addressing concerns and promising a positive future for new members. : राज्यात काही लोक जातीधर्माचे राजकारण करून आपली राजकीय पोळी भाजू पाहत आहेत. समाजासमाजामध्ये तेढ निर्माण करून शेतकऱ्यांचे, महिलांचे, विकासाचे प्रश्न सुटणार आहेत का?

Jagdish Pansare

Nanded Political News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन होऊन 26 वर्ष झाली आहेत. या काळात अनेक चढउतार पाहिले, पण शिव-शाहू-फुलेंच्या विचारांपासून आम्ही दूर गेलो नाही. धर्मनिरपेक्षपणे आम्ही सगळ्या जातीधर्मासाठी, तळागाळातल्या लोकांसाठी काम करतो आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण केल्या जातील, असा विश्वास मी तुम्हाला देतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या नांदेड जिल्ह्यातील नेते, पदाधिकाऱ्यांना ग्वाही दिली. आगीतून फुफाट्यात पडलो, असे होणार नाही असा वादाही अजित पवारांनी यावेळी केला.

काँग्रेसचे नेते माजी मंत्री भास्कर पाटील खतगावकर, त्यांच्या सूनबाई मीनल पाटील खतगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा व इतर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आज (Ajit Pawar) अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी अजित पवार यांनी नांदेड जिल्हा राष्ट्रवादीमय होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. तसेच भास्कर पाटील खतगावकर यांनी जिल्ह्यातील जी काही प्रलंबित विकास कामे सांगितली आहे, ती लवकरच पूर्ण करणार, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

राज्य सरकारचे शेतकरी, महिला यांच्याबद्दलचे धोरण, राज्याला क्रमांक एकवर पोहचवण्यासाठी आखलेले धोरण, अर्थसंकल्पात केलेल्या तरतूदी, शेतीमध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर अशा अनेक गोष्टींचा उल्लेख केला. (Nanded) राज्यात काही लोक जातीधर्माचे राजकारण करून आपली राजकीय पोळी भाजू पाहत आहेत. समाजासमाजामध्ये तेढ निर्माण करून शेतकऱ्यांचे, महिलांचे, विकासाचे प्रश्न सुटणार आहेत का? राज्यात उद्योगधंदे येतील का? असा सवाल करत अशा राजकारणाला बळी पडू नका, असे आवाहन अजित पवार यांनी यावेळी केले.

गेली 35 वर्ष मी राजकारणात काम करतोय. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्ष नेता, सहावेळा उपमुख्यमंत्री झालो. जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ न देता सगळ्या भागात काम करतोय. प्रताप चिखलीकर, खतगावकर, पोकर्णा या सगळ्यांना मी शब्द दिला होता. परत येईन, आजही सांगतो अधिवेशन संपल्यानंतर मी पुन्हा येईन. इथे आपण बेरजेचे राजकारण करू. यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने आम्ही पुढे चाललो आहोत. महापुरूषांची फक्त नावचं घेत नाही, तर त्यांनी दाखवलेल्या मार्गावर मार्गक्रमण करतोय.

पण आज महाराष्ट्रात वेगळ्या घटना घडतायेत त्यामुळे वेदना होतात. समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा व राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. महाराष्ट्रातलं वातावरणं असचं राहिलं तर उद्योग इथे कसे येतील? असे सांगतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्यां प्रत्येकाच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण होतील, असा विश्वास देतो. आगीतून निघालो अन् फुफाट्यात पडलो, अशी तुमची भावना होणार नाही.

मीनल खतगावकर यांनी नायगाव विधानसभा मतदारसंघातून 80 हजार मतं घेतली. त्यांना चांगला जनाधार आहे, त्यांच्या पाठीशी सासऱ्यांचा आशीर्वाद आहे. असे नेतृत्व पक्षात येत आहे, ही आनंदाची बाब असल्याचे अजित पवार म्हणाले. यावेळी त्यांनी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचेही कौतुक केले. चिखलीकरांची मेहनत विसरून चालणार नाही. नांदेड जिल्हा राष्ट्रवादीमय होतोयं ही आनंदाची बाब आहे. यापुढेही मतभेद असतील तर ते दूर ठेवून मार्ग काढावा लागेल. आपण नवा, जूना भेदभाव करणार नाही, ज्याच्यात क्षमता आहे, नेतृत्व गुण आहे, त्याला योग्य संधी दिली जाईल, असा विश्वास अजित पवार यांनी यावेळी दिला.

लाडक्या बहीणींना निराश करणार नाही..

मला काही लाडक्या बहिणींनी 2100 रुपये कधी देणार? अशी विचारणा केली. मी त्यांना सांगू इच्छितो आम्ही योग्यवेळी पैसे देऊ, राज्याची आर्थिक घडी व्यवस्थित होऊ द्या. सगळी सोंग आणता येतात, पैशाचे नाही. बहिणींनो तुम्ही जसा तुमचा संसार काटकसरीने करता, प्रत्येकाची काळजी घेता, तसंच मला राज्यातील 13 कोटी जनतेची 365 दिवस काळजी घ्यायची असते, त्यांचा विचार करायचा आहे. शेतकरी, कामगार, विद्यार्थी,सगळ्या जातीधर्माच्या लोकांचा विचार करावा लागतो.

लाडक्या बहीणींना कर्ज रुपात मदत करण्याचा सरकार विचार करतयं. वीस महिलांना मिळून दहा लाख रुपये कर्ज स्वरूपात देणार असल्याचे अजित पवार यांनी यावेळी सांगितले. भास्कर पाटील खतगावंकर यांनी केलेल्या मागण्या मार्गी लावण्याचे आश्वासनही अजित पवार यांनी आपल्या भाषणात दिले. लेंडी, मनार धरणासाठी अधिवेशन संपताच बैठक लावतो. इसापूर धरण, एमआयडीसीचे प्रश्न मार्गी लावू, असे ते म्हणाले. मराठवाड्यात बीड, संभाजीनगर आणि नांदेडमध्ये टाटा समुहाच्या सहकार्याने आपल्याला तीन इनोव्हेशन सेंटर करायचे आहेत. यातून कौशल्य विकासाचे प्रशिक्षण तरुणांना दिले जाईल.

शेतीसाठी एआयए तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल, याची चर्चा मी आणि जयंतराव करत होतो, असे सांगत माध्यमांनी वेगळ्याच बातम्या चालवल्याचे अजित पवार म्हणाले. गोदावरी-मनार साखर कारखान्यासाठी बैठक लावा, मी पण लक्ष घालतो. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी अजिबात आत्महत्या करता कामा नये. पाहिजे ती मदत करायला आम्ही तयार आहोत. एआय तंत्रज्ञान, चांगल बियाणं मी तुम्हाला देतो, असे अजित पवार म्हणाले. वेडवाकडं काम करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकू. दोन पैसे कमवा पण पन्नास वर्ष टिकेल असे काम करा, असा दमही त्यांनी यावेळी भरला.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT