Pune News : नाशिकमधील स्वयंघोषित ज्योतिषी, कॅप्टन अशोक खरात सध्या महिला अत्याचार, आणि वादग्रस्त व्हिडिओ प्रकरणामुळे अटक झाल्याने चर्चेत आला आहे. त्याची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आलेली आहे. या प्रकाराचा पोलिसांकडून कसून तपास केला जात असतानाच दररोज नवीन माहिती समोर येत आहे.
त्यातच वादग्रस्त आध्यात्मिक गुरु अशोक खरात आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यातील कथित संबंधांवरून वातावरण तापले आहे. विरोधकांनी या सर्व प्रकरणावरून रुपाली चाकणकर यांची कोंडी करीत नवीन फोटो समोर आणले आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी चाकणकर यांच्यावर कवितेतून टीका केली आहे.
भोंदूबाबा अशोक खरातला नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांनी लैंगिक छळाच्या प्रकरणात अटक केली आहे. खरातचे 58 व्हिडिओ बाहेर आले आहेत. खरातचे बड्या राजकारण्यांशी संबंध असल्याचे समोर आले आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या खरातच्या ट्रस्टवर विश्वस्त असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे रुपाली चाकणकर यांच्यावर विरोधी पक्षाकडून जोरदार टीका करीत महिला आयोगाच्या अध्यक्षापदाचा राजीनामा देण्याची मागणी केली जात आहे. त्यातच आता खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी चाकणकर यांच्यावर कवितेतून टीका केली आहे.
महिला आयोगातील जिजाऊंच्या फोटोला ताड्कन तडा गेला
जेव्हा तिथल्या खुर्चीला रांझ्याच्या पाटील पितृतुल्य झाला!
त्या खुर्चीतून बेगडी नैतिकता ओसंडून वाहिली
सामाजिक, कौटुंबिक कि वैयक्तिक सारी सीमारेषाच पुसट झाली.
काठी आधाराची होती खरी, पण स्वार्थापायी मोडून पडली
न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या अहिल्येची पुन्हा एकदा शिळा झाली
सावित्रीची लेक जिथे भोंदू पावलांवर वाकली,
गुलामगिरी, सार्वजनिक सत्यधर्म साऱ्या साऱ्या अक्षरधनाची अक्षरश: होळी झाली….
या कवितेच्या माध्यमातून रुपाली चाकणकरांवर खासदार कोल्हेंनी टीका केली आहे. अशोक खरातचे अनेक बड्या राजकारण्यांशी संबंध असल्याचे समोर आले आहे.
खरातच्या ट्रस्टवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali chakankar) या विश्वस्त असल्याचे समोर आले आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षाच्या अध्यक्षाचे जर आरोपीशी संबंध असतील तर पीडित महिलांनी न्याय कोणाकडे मागायचा असा सवालही विरोधकाकडून केला जात आहे.
या प्रकरणाच्या तपासासाठी राज्य सरकारकडून पोलिसांची फोज मैदानात उतरवली आहे. यामध्ये धडाकेबाज पोलिस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखालील एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. या प्रकरणात अनेक नवे खुलासे समोर येत आहेत . खरात याची २०० कोटींची मालमत्ता असल्याचे सांगितले जात आहे तर दुसरीकडे रुपाली चाकणकर अद्याप पोलिसांसमोर आलेल्या नाहीत. रुपाली पाटील ठोंबरे यांनी चाकणकर फरार असल्याचा दावा केला आहे.
दरम्यान, या प्रकरणी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. रुपाली चाकणकर यांना अशोक खरातच्या कारनाम्यांविषयी माहिती होती. मात्र, त्यांनी त्यांना पाठीशी घातले. ज्या महिलेने तक्रार केली तिच्यावर दबाव आणला. चाकणकरांनी तातडीने राजीनामा द्यावा तसेच त्यांची नार्को टेस्ट करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी रुपाली चाकणकरांवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. अशोक खरात याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. तसेच त्याच्या सोबत या कामात जे राहिले असतील त्यांच्यावर निश्चित त्यांची नावे चौकशीत समोर येतील. त्यांच्यावरही तातडीने आणि सक्तीने कारवाई केली गेली पाहिजे, असे म्हटले आहे. त्यामुळे चाकणकरांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.