Ajit Pawar Eknath Shinde Devendra Fadnavis. sarkarnama
महाराष्ट्र

Eknath Shinde: उपमुख्यमंत्री शिंदेंची नाराजी कायम? मुख्यमंत्री फडणवीसांच्या तीन बैठकांना दांडी; नेमके कारण आले समोर

Shinde Fadnavis rift News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या तीन बैठकांना दांडी मारली. त्यामुळे त्यांच्या नाराजीची चर्चा सुरु असतानाच त्यांच्या नाराजीचे नेमके कारण समोर आले आहे.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे महायुतीमधील मित्रपक्षातील सूर जुळतील असा अंदाज व्यक्त केला जात असताना सत्ताधारी पक्षातील नाराजीनाट्य पुन्हा एकदा उफाळून आले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील महायुती सरकारला सत्तेत येऊन सहा महिन्याचा कालावधी लोटला आहे. मात्र, शिवसेना एकनाथ शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या तीन घटक पक्षांमध्ये सत्तेच्या वाटपावरून सुरु झालेले मतभेद अद्याप कायम दिसून येत आहेत.

सत्तेत असूनही या तीन पक्षात असंतोष सातत्याने खदखदत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बुधवारी दिवसभरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या तीन बैठकांना दांडी मारली. त्यामुळे त्यांच्या नाराजीची चर्चा सुरु असतानाच त्यांच्या नाराजीचे नेमके कारण समोर आले आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुती सरकारला घवघवीत यश मिळाले. त्यानंतर तीन पक्ष एकत्र येऊन राज्याचा चौफेर विकास साधतील, अशी भावना होती. मात्र, सरकार स्थापन होण्यापूर्वीपासूनच तीन पक्षात नाराजी नाट्य रंगलेले दिसत आहे. त्यामुळे तीनही पक्षात ताळमेळ नसल्याचे सातत्याने जाणवत आहे. सत्तास्थापनेवेळी सुरुवातीला गृहमंत्रीपद त्यानंतर मलईदार खात्यावरून, पालकमंत्रीपदावरून, बंगल्याच्या वाटपावरून नाराजी उफाळून आली होती.

गेल्या काही दिवसात शिवसेनेच्या मंत्र्यांच्या वाटायला कमी प्रमाणात निधी दिला जात असल्याचा आरोप सेनेच्या मंत्र्यानी केला आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीनंतर शिवसेनेच्या मंत्र्यांनी बैठक घेऊन नाराजी व्यक्त केली. त्यामुळे अजित पवार व शिवसेनेतील मंत्र्यांमधील मतभेद समोर आले तर दुसरीकडे मुंबई महापालिकेतील जागावाटपावरून एकनाथ शिंदेंची शिवसेना व भाजपमधील मतभेद समोर आले आहेत. त्यामुळे शिंदे गटाची नाराजी वाढली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे विकासकामे थांबवत असल्याची तक्रार शिवसेनेच्या मंत्र्यांनी एकत्रित येत केली. त्यामुळे नाराजी वाढली असतानाच आता मुंबई महापालिकेतील जागावाटपावरून मतभेद समोर आले आहेत. त्यामुळे बुधवारी दिवसभरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी तीन शासकीय बैठका व स्वतःच्या कार्यक्रम पत्रिकेतील सात बैठकांना दांडी मारली. त्यामुळे शिंदेंच्या नाराजीची चर्चा सर्वत्र रंगली आहे.

शिंदे यांच्या उपस्थित सहयाद्री अतिथीगृहावर महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन केले होते. यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण बैठक, विधीविधान शाखेच्या बोधचिन्हाचे अनावरण व पुस्तक प्रकाशन व वृक्षलागवड बैठकीला दांडी मारली. दुसरीकडे या सर्व बैठकाला मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री गिरीश महाजन यांच्यासह संबंधित मंत्री व अधिकाऱ्यांनी बैठकीला हजेरी लावली. आपत्ती व्यवस्थापन संबंधित महत्त्वाच्या बैठकींना शिंदे गैरहजर राहिले. या सर्व शासकीय बैठकींना शिंदे गैरहजर राहिल्याने त्यांच्या या कृतीमुळे नाराजीच्या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे.

एकनाथ शिंदे यांच्या अनुपस्थितीमुळे महायुती सरकारमध्ये अंतर्गत वाद आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या घटक पक्षांमध्ये सत्तेच्या वाटपावरून मतभेद वाढतच आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री पवार हे दोघेजण मिळून येत्या काळात एकनाथ शिंदे यांची नाराजी कशाप्रकारे दूर करतात याकडे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT