
Mumbai civic polls News : मुंबई महापालिकेची निवडणूक तब्बल आठ वर्षानंतर होत आहे. त्यामुळे प्रत्येकाचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. सुप्रीम कोर्टाने रखडलेलेया स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका चर महिन्यात घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे लवकरच निवडणुकीची घोषणा होणार हे गृहीत धरून सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. ही निवडणूक रंगतदार ठरणार आहे. भाजप, उद्धव ठाकरेंची शिवसेना, एकनाथ शिंदेची शिवसेना, काँग्रेस व मनसेने जोरदार तयारी केली आहे. मात्र, या निवडणुकीत 2017 ची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. त्यावेळी भाजप, एकत्रित शिवसेना, काँग्रेस व मनसेने स्वबळावर निवडणूक लढली होती. त्याच प्रमाणे निवडणूक लढविण्याचे प्लॅनिंग भाजप, ठाकरे सेनेकडून केले जात आहे. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
2017 च्या महापालिका निवडणुकीत भाजप (BJP) व शिवसेना एकत्रित सत्तेत असताना जागावाटपावरून मतभेद झाल्याने दोन्ही पक्षांने स्वबळावर निवडणूक लढवत विरोधी पक्षाला मागे टाकले होते. या स्वबळावर लढलेल्या निवडणुकीत भाजपने 82 जागा जिंकल्या होत्या तर एकत्रित शिवसेनेने 84 जागा जिंकल्या तर काँग्रेसला 31 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 9 तर मनसे 7 जागी तर इतर पक्ष व अपक्ष 14 नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर पाच अपक्ष नगरसेवक शिवसेनेसोबत आले. त्यानंतर मनसेचे नगरसेवकही शिवसेनेसोबत आले. त्यामुळे शिवसेनेची संख्या 99 पर्यत पोहचली होती. त्यानंतर भाजपनेच सत्तेपासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याने मुंबई महापालिकेवर पाच वर्ष एकत्रित शिवसेनेचे वर्चस्व होते.
जून 2022 मध्ये शिवसेनेत (Shivsena) पडलेल्या उभ्या फुटीनंतर एकनाथ शिंदेंसोबत 40 आमदार, 12 खासदार गेले होते. त्यासोबतच मुंबई महापालिकेतील चित्र बदलले आहे. मुंबई महापालिकेतील 40 पेक्षा अधिक माजी नगरसेवकानी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यासोबतच येत्या काळात शिंदे यांच्याकडे जाणाऱ्या नगरसेवकांची संख्या वाढू शकते. त्यामुळे त्यावर बरेच काही अवलंबुन असणार आहे.
काय होता 2017 चा पॅटर्न?
2017 मध्ये भाजप आणि शिवसेना यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत दोन्ही पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केली होती आणि जवळजवळ समान ताकद दाखवली होती. त्यावेळी शिवसेनेने 84 जागा तर भाजपने 82 जागा जिंकत वर्चस्व सिद्ध केले होते. या स्पर्धेने दोन्ही पक्षांचे स्वतंत्र अस्तित्व अधोरेखित केले होते आणि निवडणुकीत एक प्रकारची चुरस निर्माण झाली होती. याच जोरावर तेव्हा शिवसेना सत्ता स्थापन करण्यात यशस्वी ठरली होती. गेल्या पाच वर्षापासून भाजप आणि ठाकरे गटाची युती तुटल्यापासून दोन्ही गटांनी स्वतंत्र राजकारण सुरू केले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गट आणि भाजप यांच्यातील युतीमुळे भाजप स्वबळावर लढणार की शिंदेच्या शिवसेनेला सोबत घेणार यावर बरेच काही अवलंबुन असणार आहे. त्यामुळे आगामी काळात भाजप आणि ठाकरे गट दोघेही स्वतंत्रपणे आणि आक्रमकपणे निवडणुकीत उतरू शकतात. मराठी मतदारांमध्ये ठाकरे गटाला सहानुभूती मिळू शकते. भाजपला राष्ट्रीय मुद्दे आणि संघटनशक्तीचा लाभ होऊ शकतो. मतांचे विभाजन झाल्यास काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि इतर पक्षांना संधी मिळू शकते.
2017 सालचे राजकीय गणित काय होते ?
त्यावेळी शिवसेना एकसंघ पक्ष, सत्तेत होता. त्यावेळी भाजप, शिवसेना वेगळे लढले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्याकाळी कमकुवत होते. त्याचा फायदा स्वबळावर लढलेल्या भाजप, शिवसेनेला झाला. त्या निवडणुकीत मनसे व अपक्ष उमेदवारांचा मर्यादित प्रभाव होता. शिवसेना-भाजप युती तुटलेली होती, पण दोघेही प्रबळ प्रतिस्पर्धी होते. तर काँग्रेस-राष्ट्रवादी बॅकफुटवर होते. त्यावेळी मतदारांमध्ये प्रादेशिक अस्मिता आणि मराठी मतांची विभागणी झाली होती.
काय असणार २०२५ चे बदललेले राजकीय गणित :
भाजप व शिवसेना शिंदे गटाला आता केंद्र व राज्य सरकारचा सत्तेचा पाठिंबा आहे. ठाकरे गटाला पक्ष फुटल्यानंतर मुंबईत सहानुभूती आहे मराठी अस्मिताच्या मुद्द्यावर पाठींबा मिळण्याची शक्यता. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट एकत्र लढणार की स्वबळावर यावर समीकरण अवलंबुन असणार आहे. मनसे व अपक्ष पुनरागमनाचा प्रयत्न करणार आहेत.
दोन निवडणुकीतील महत्त्वाचे फरक
गेल्या निवडणुकीत शिवसेना एकसंघ पक्ष होता आता दोन गटांत शिवसेना विभागली गेली आहे. ठाकरे विरुद्ध शिंदे गट असा संघर्ष पाहवयास मिळणार आहे. भाजप स्वतंत्र ताकदीने लढला होता आता त्यांच्या पाठीशी शिंदे गटाची ताकद असणार आहे. अधिक मजबूत यंत्रणा असल्याचा फायदा होणार आहे. शिवसेना शिंदे गट, भाजप, उद्धव ठाकरे गट यांच्यामध्ये मराठी मतांचे विभाजन होणार आहे. विरोधी पक्ष कमकुवत असल्याने इंडिया आघाडी एकत्र लढल्यास जनतेची सहानुभूती ठाकरे गटाकडे जास्त असण्याची शक्यता आहे.
या निवडणुकीत कोणाला होणार फायदा ?
आगामी पालिका निवडणुकीसाठी भाजप व शिंदे गट एकत्रित आल्यास संघटन, निधी, आणि यंत्रणेमुळे प्रभावी ठरू शकतात. मात्र, शिंदे गटाला मर्यादित ओळख आणि जनाधार असल्याने भाजपचा तोटा होऊ शकतो. ठाकरे गट जर स्वतंत्रपणे निवडणूक लढविल्यास सहानुभूती मिळण्याची शक्यता आहे. त्यासोबतच बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा व मराठी मतांचे समर्थन मिळू शकते पण यंत्रणेचा अभाव असणार असल्याचा तोटा सहन करावा लागू शकतो. तर काँग्रेस व शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रित निवडणूक लढविल्यास सुसंगत नेतृत्वाची कमतरता, पण मुस्लिम व पारंपरिक मतदारांचे समर्थन त्यांना मिळू शकते.
मुंबई महापालिकेच्या 2025 मध्ये होत असलेल्या निवडणुकीत भाजप, ठाकरे सेना, काँग्रेस, मनसे या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळवणं कठीण होईल. मतांचे तुकडे जास्त झाल्यामुळे निवडणूक निकालानंतर दोन पक्षांना एकत्रित यावे लागणार आहे. शिवसेनेतील फूट, शिंदे गटाचा जनाधार, ठाकरे गटाची सहानुभूती आणि भाजपचं संघटन या बाबी मुख्य निर्णायक घटक ठरणार आहेत. त्यामुळेच या निवडणुकीची उत्सुकता आतापासूनच शिगेला पोहचली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.