Pratap Sarnaik  Sarkarnama
महाराष्ट्र

Pratap Sarnaik : धाराशिवचे राजकारण ठाण्याच्या सरनाईकांना झेपेना; पालकमंत्रीपद सोडण्याचा निर्णय घेणार?

Dharashiv politics News : प्रताप सरनाईक यांना धाराशिव जिल्ह्यात विकासाचे व्हिजन राबवायचे आहे. त्यासाठी ठाणे सोडून धाराशिवमध्ये आले आहेत. मात्र, प्रत्येक गोष्टीत राजकारण केले जात असल्याने ते वैतागले आहेत.

सरकारनामा ब्यूरो

Dharashiv News : धाराशिवमध्ये दोन दिवसापूर्वी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या भर बैठकीतच खासदार ओम राजेनिंबाळकर व आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्यात पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या समोरच वाद झाला. गेल्या चार महिन्यापासून धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून बैठकीत विकास कामापेक्षा राजकीय चर्चा अधिक होत आहे. प्रताप सरनाईक यांना धाराशिव जिल्ह्यात विकासाचे व्हिजन राबवायचे आहे. त्यासाठी ठाणे सोडून मी धाराशिवमध्ये आलो आहे. मात्र, या ठिकाणी प्रत्येक गोष्टीत राजकारण केले जात असेल तर पालकमंत्रीपद सोडायला तयार असल्याचे स्पष्ट केले आहे.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवेळी ओमराजे (om rajenimabalkar) यांनी जिल्ह्यातील निधी वाटपाला स्थगिती कोण दिली? या सर्व प्रकारामागे नेमका कोणाचा हात आहे? अशी विचारणा करीत पालकमंत्र्यांना धारेवर धरले. तर दुसरीकडे आमदार राणा पाटील यांनी कामांना स्थगिती मुख्यमंत्री पातळीवर देण्यात आली आहे. ज्यांना उत्तर हवे, त्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना भेटून स्थगितीचे कारण जाणून घ्यावे, असा टोला लगावला. त्यामुळे सभागृहातील वातावरण चांगलेच तापले होते. त्यामध्ये पालकमंत्री सरनाईक यांनी मध्यस्थी करीत सर्व माइक बंद करायला लावले. त्यानंतर बैठकीत काही मुद्द्यावर चर्चा पार पडली.

राज्यातील विधानसभा निवडणूक झाली. त्यानंतर महायुती सरकारची सत्ता आल्यांनतर गेल्या पाच महिन्यातील ही दुसरी बैठक आहे. यापूर्वीची पाहिली बैठक २६ जानेवारीनंतर झाली होती. यावेळची बैठक सुरळीत पार पडली होती. मात्र, एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले खासदार ओमराजे व आमदार राणा पाटील एकमेकांना विरोध करण्याची एकही संधी सोडत नाहीत.

चार दिवसापुर्वीच खासदार ओमराजे यांच्या संपर्क कार्यालयासाठी जागा देण्यात न आल्याने त्यांनी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांना धारेवर धरले होते. त्याचवेळी त्यांनी जिल्हाधिकारी यांना देखील निधीवाटपास कोणी स्थगिती दिला असा सवाल विचारला होता. त्यामुळेच १ मे ला होत असलेल्या बैठकीत या विषयावरून खडाजंगी होणार याची चाहूल काही जणांना लागली होती. बैठकीत त्यानुसारच घडले.

बैठक सुरु होताच ओमराजेंनी निधी वाटप व ड्रग्ज प्रकरणावरून सत्ताधारी मंडळीला घेरले. तर त्याला प्रत्युत्तर देताना राणा पाटलांनी तुळजापुरची जाणून-बुजून बदनामी केली जात आहे. हे प्रकरण मी उघडकीस आणले आहे. याप्रकरणी पोलीस अधीक्षकांना कारवाई करण्याची मीच मागणी केली असल्याचे राणा पाटील यांनी स्पष्ट केले तर ओमराजे निंबाळकर यांनी या ड्रग्ज प्रकरणातील आरोपी पत्रकार परिषद घेऊन माझा बाप काढतात, अशी तक्रार पालकमंत्री सरनाईक यांच्याकडे केली. त्यामुळे बैठकीतील वातावरण चांगलेच तापले.

भर बैठकीतच दोघांनाही माईक बंद न ठेवता एकमेकांवर ताशेरे ओढणे सुरूच ठेवल्याने पालकमंत्री सरनाईक (Pratap Sarnaik) यांना दोघांनाही थांबवण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला. मात्र, दोघेही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसल्याने पालकमंत्री सरनाईक यांनी शेवटी सर्वांचे माईक बंद ठेवायला सांगत जिल्ह्याचा विकास कामाचा निधी लॅप्स होणार नाही व ड्रग्ज प्रकरणातील एकही आरोपी सुटणार नसल्याचे स्पष्ट करीत दोघांना शांत केले.

त्यानंतर धाराशिव येथील जलव्यवस्थापन कृती पंधरवडा कार्यक्रमप्रसंगी एकमेकांवर पॉलिटिकल वॉर पहावयास मिळाले. जलव्यवस्थापनाच्या कार्यक्रमात राजकीय वातावरण पाणी प्रश्नावरून तापले होते. खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार राणा पाटील यांनी एकमेकाचे नाव न घेता बोचरी टीका केली. निवडणुकीच्या तोंडावर फक्त पाणी येणार सांगितले जात, दोन पिढ्यांपासून हेच सुरू असल्याची टीका ओमराजे निंबाळकर यांनी केली तर राणा पाटील यांनी या पाणी येण्यात काही झारीतील शुक्राचार्याने अडथळे आणल्याची टीका केली.

त्यामुळे येत्या काळात ओमराजे- राणा पाटील यांच्यातील संघर्ष कधी कमी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतून जिल्ह्यातील विकास कामांचा व नियोजनाचा आराखडा ठरत असतो. मात्र, या ठिकाणी बैठकीतच दुसरे विषय काढून बैठकीला वादग्रस्त करू नका. येत्या काळात राजकारण सोडून एकत्र येऊन विकास कामे करू यात, असे आवाहन पालकमंत्री सरनाईक यांनी केले होते.

जिल्हा नियोजन समितीच्या कामाला १ एप्रिलला स्थगिती दिली असल्याचे समजताच स्थगिती कोणी दिली का दिली? याचे उत्तर शोधण्यात महिन्याचा कालावधी गेला. त्यानंतर आता नूतन जिल्हाधिकारी यांनी स्थगिती कोणी दिली माहिती नाही मी फक्त आदेशाची अमंलबजावणी केली असल्याचे त्यांनी सांगितले.

गेल्या चार महिन्यातील या ठिकाणच्या घटना घडामोडीमुळे मंत्री सरनाईक चांगलेच वैतागले आहेत. बैठकीत विकास कामावर चर्चा होणे परक्षित असताना याठिकाणी वादविवादातच जादा वेळ गेल्याने पालकमंत्री सरनाईक चांगलेच वैतागले आहेत. त्यामुळेच त्यांनी येत्या काळात नेते मंडळींच्या काम करण्याच्या कार्य पद्धतीत बदल न झाल्यास राजीनामा देण्याची तयारी केली असल्याचे समजते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT