Mumbai News : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. मात्र, जिल्हा परिषद निवडणुकीत बहुमत असतानाही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला काही ठिकाणी तडजोड करावी लागली, अशी खंत स्थानिक शिवसैनिकांकडून व्यक्त केली जात असतानाच आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. त्यामुळे महायुतीमधील धडधड वाढली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी दुपारनंतर अचानक दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामुळे शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.
राज्यात पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले आहे. तर दुसरीकडे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पदाधिकारी निवड करत असताना अनेक ठिकाणी शिवसेनेला (Shivsena) सत्तेपासून दूर ठेवले जात असल्याचा प्रकार पुढे आला आहे. काही ठिकाणी दुजाभाव केल्याने सत्तेपासून दूर राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शिवसेनेत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हे सोमवारी अचानक दिल्लीला गेले असल्याची माहिती सूत्रांने दिली.
नितीन नबिन, अमित शाह यांची शिंदे घेणार भेट
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) या दिल्ली दौऱ्यामध्ये भाजपचे अध्यक्ष नितीन नबिन, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. यावेळी ते नुकत्याच झालेल्या निवडणुकीबाबतची माहिती वरिष्ठाना देणार असल्याचे समजते. त्यामुळे आता दिल्ली दरबारी याबाबत काय निर्णय होणार याची उत्सुकता आता सर्वाना लागली आहे.
तीन महिन्यापूर्वी घडल्या होत्या घडामोडी
दरम्यान, तीन महिन्यापूर्वी झालेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये भाजपने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का दिला होता. शिवसेना शिंदे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला होता. यावरून देखील शिवसेना शिंदे गटात नाराजी होती. त्यानंतर महापालिका निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौरा केला. या दौऱ्यानंतर भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे महापालिका निवडणुकीसाठी अनेक ठिकाणी युती झाली होती. तर दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या कार्यकर्त्यांना पक्षात प्रवेश द्यायचा नाही, असे देखील त्यावेळी ठरले होते.
शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याकडे लागले लक्ष
महिनाभरापूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला यश मिळाले. ठाणे, कल्याणमध्ये शिंदे यांच्या शिवसेनेचा महापौर झाला तर मुंबई, पुणे, नागपूर नाशिकसह अनेक ठिकाणी भाजपचा महापौर झाला. दुसरीकडे त्यानंतर पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजप हा नंबर एकचा पक्ष ठरला तर शिंदेंच्या शिवसेनेला देखील चांगले यश मिळाले. मात्र,निवडणुकीत भाजप, शिवसेनेची युती होती. मात्र, निकालानंतर सत्तेपासून दूर ठेवले जात असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात येत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांचा हा दिल्ली दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.