

Chandrapur News : चंद्रपूर महापालिका निवडणुकीनंतर सत्तास्थापन करीत असताना मोठ्या घडामोडी घडल्या. येथील जनतेने त्रिशंकू कौल दिला होता. त्यामुळे सत्ता भाजपची येणार की काँग्रेसचा याविषयी पेच निर्माण झाला होता. त्यामुळे याठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सहा व वंचित आघाडीचे दोन व अपक्ष दोन असे एकूण दहा नगरसेवक एकत्र आले होते. त्यामुळे या दहा नगरसेवकांचा पाठिंबा सत्ता स्थापन करण्यासाठी महत्त्वाचा मानला जात होता. त्यांचा पाठींबा मिळवण्यासाठी भाजप व काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच पाहवयास मिळाली.
महापौर निवडीच्या दिवसापर्यंत आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस व उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यामधील बोलणी फिस्कटली. त्यानंतर ठाकरे सेनेच्या पाठिब्यांवर भाजपचा महापौर झाला तर उपमहापौरपद ठाकरे सेनेच्या वाट्याला आले होते. त्यानंतर आता स्थायी समिती सभापतीपदी निवडीवेळी चुरस पाहवयास मिळाली. समसमान मतांमुळे स्थायी समिती सभापती निवडीत पेच निर्माण झाला होता.
चंद्रपूर महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाची निवड सोमवारी झाली. त्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नगरसेविका मनस्वी गिऱ्हे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली होती. तर काँग्रेसचे वसंत देशमुख यांना रिंगणात उतरवले होते. स्थायी समितीचे भाजप, उद्धव ठाकरे यांची शिवसेना मिळून आठ सदस्य होते. तर काँग्रेस व स्थानिक जनविकास आघाडी मिळून आठच सदस्य होते.
सोमवारी झालेल्या निवडीवेळी ठाकरे सेनेच्या मनस्वी गिऱ्हे व काँग्रेसचे वसंत देशमुख या दोघांनाही समसमान आठ मते पडली होती. त्यानंतर आठ-आठ अशी समान मते दोन्ही उमेदवारांना मिळाली. त्यामुळे ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली. या ईश्वरचिठ्ठीत उद्धव ठाकरे त्यांच्या सेनेच्या मनस्वी गिऱ्हे यांच्या नावाची चिठ्ठी निघाली. त्यामुळे स्थायी समितीच्या सभापतीपदी गिऱ्हे यांची निवड झाल्याची घोषणा करण्यात आली.
चंद्रपूर महापालिकेत 66 नगरसेवक आहेत. त्यापैकी काँग्रेसचे 27, भाजप 23, उद्धव ठाकरेंची शिवसेना 06, वंचित आघाडी 2, अपक्ष 2 असा 10 जणांचा एक गट आहे. त्याशिवाय इतर व अपक्ष 6 नगरसेवक आहेत. याठिकाणी सत्तेत येण्यासाठी 34 हा मॅजिक फिगर होता. त्यामुळे भाजप व काँग्रेसला सत्तेत येण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडे असलेल्या 10 नगरसेवकांचा पाठिंबा आवश्यक होता. दुसरीकडे मात्र भाजपमध्ये माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार व आमदार किशोर जोरगेवार यांच्यात आडवा विस्तवही जात नाही तर दुसरीकडे काँग्रेसमध्ये तशीच अवस्था असून खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार विजय वडेट्टीवार यांच्यातील मतभेद सर्वश्रुत आहेत. त्यामुळे त्याठिकाणच्या निवडीबाबत उत्सुकता शिगेला पोहचली होती.
उपमहापौर पदासाठी 'ट्विस्ट'
महापौर निवडीच्या वेळी भाजप व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे समीकरण ऐनवेळी जुळले. त्यानुसार झालेल्या निवडणुकीत महापौरपदी भाजपच्या संगीता खांडेकर एक मताने विजयी झाल्या तर उपमहापौरपदी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे प्रशांत दानव विजयी झाले. उपमहापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत ठाकरे शिवसेनेचे प्रशांत दानव आणि काँग्रेस समर्थित उमेदवाराला 32-32 अशी समसमान मते मिळाली होती. त्यावेळी ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली आणि त्यात प्रशांत दानव यांचे नशीब उजळले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.